काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती, एक पद’ या उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी केली जाईल, या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपद विराजमान होण्याची सचिन पायलट यांची इच्छा पूर्ण होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. पण काँग्रेस अध्यक्षपदाबरोबरच त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कायम राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तशी विधाने त्यांच्या समर्थकांनी केली आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केरळमधील भारत जोडो यात्रेदरम्यान पक्षात ‘एक व्यक्ती, एक पद’ या उदयपूर घोषणापत्राची पूर्तता केली जाईल, असे स्पष्ट केल्याने गोहलोत यांना स्पष्ट संदेश गेला आहे.गोहलोत यांना मुख्यमंत्रीपद कायम हवे आहे. हे पद सोडण्याची त्यांची इच्छा नाही. पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडून दबाव आलाच तर मुख्यमंत्रीपद आपल्या मर्जीतील नेत्याकडे सोपवावे, अशी त्यांची भूमिका असेल.गेहलोत आणि सचिन पायलट या दोन नेत्यांमध्ये अजिबात सख्य नाही.

हेही वाचा : रायगडात शिंदे गटाची जोरदार मोर्चेबांधणी ; भाजप सोबत स्थानिक निवडणूकीत युतीचे संकेत

दोन वर्षांपूर्वी सचिन पायलट यांनी केलेले बंड फसले होते. तेव्हा त्यांना भविष्यात मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते, असे सांगण्यात येते. यानुसार मुख्यमंत्रीपद पायलट यांना मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे.काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवर पायलट यांचे सारे भवितव्य अवलंबून असेल. गेहलोत यांच्या दबावाला बळी पडून गांधी कुटुूंबियांनी त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद कायम ठेवले वा अन्य कोणा नेत्याची निवड केल्यास पायलट यांची पुन्हा कोंडी होऊ शकते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will sachin pilots wish be fulfilled congress one man one post print politics news tmb 01
First published on: 23-09-2022 at 13:27 IST