BJP Santosh Dhuri on MNS Sandeep Deshpande : मनसेच्या कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष धुरी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदांचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई महापालिका निवडणुकींच्या धामधुमीत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मनसेला मोठा धक्का बसला. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून संतोष धुरी त्यांच्या पक्षात कार्यरत होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. यादरम्यान भाजपात प्रवेश केल्यानंतर संतोष धुरी यांनी ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतून त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. त्यानंतर देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्याविषयीचा हा आढावा…
संतोष धुरी मनसेतून कशामुळे बाहेर पडले?
संतोष धुरी हे मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, जागावाटपात हा प्रभाग शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्याने धुरी यांची कोंडी झाली. उद्धव ठाकरे यांनी या प्रभागातून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याने संतोष धुरी नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर मंगळवारी त्यांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. धुरी यांच्या पक्ष प्रवेशांनांतर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने प्रसिद्धीपत्रक काढून धुरी यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. यापुढे त्यांचा कामगार सेनेच्या कुठल्याही युनिटशी आणि व्यवस्थापनाशी काहीही संबंध नसेल, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले. संतोष धुरी यापूर्वी मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
प्रश्न : संदीप देशपांडे यांच्या मनात नेमके काय आहे?
मी कालपण सांगितले होते आणि आजपण तेच सांगतो आहे. पक्षात (मनसे) आमच्या दोघांवरही अन्याय झालेला आहे. दोघांनाही बांद्र्याच्या बंगल्यावरून (उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान) लाथाडण्यात आले आहे. माझे मन एवढे मोठे नाही की अपमान होऊनही मी तिथे थांबेन. अजून कशात काहीच नसताना आम्हाला अशी वागणूक मिळाली आहे. जर उद्या ते (ठाकरे बंधू) सत्तेत आले तर आम्हाला कशी वागणूक मिळेल? असा प्रश्न मला पडला होता आणि हीच बाब लक्षात घेऊन मी मनसेतून बाहेर पडलो आहे. संदीप देशपांडे यांचे मन खूप मोठे असल्यामुळे ते मनसेत थांबलेले आहेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही, असे संतोष धुरी म्हणाले.
आणखी वाचा : भाजपाचे ४ राज्यांतील मुख्यमंत्री अडचणीत? जनतेचा रोष कशामुळे वाढला? कारण काय?
प्रश्न : तुम्ही वेगळ्या पक्षात गेल्यामुळे संदीप देशपांडे यांच्याबरोबर तुमची मैत्री तशीच राहील का?
हो नक्कीच… आमची मैत्री यापुढेही तशीच कायम राहणार आहे. खरेतर मनसे सोडण्याचा विचार केल्यानंतर काही दिवस मी संदीप देशपांडे यांना भेटणे टाळले होते. परंतु, भाजपात प्रवेश केल्यानंतर मी त्यांना फोन केला आणि भेट घेण्याबाबत बोललो. त्यावेळी संदीप यांनीही मला भेटण्यास होकार दिला. सध्या आम्ही दररोज एकत्र मॉर्निंग वॉकला जात असलो तरी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांबरोबर फिरणे टाळतो, असे धुरी यांनी स्पष्ट केले.
प्रश्न : संदीप देशपांडे माध्यमांसमोर सध्या मनमोकळेपणाने बोलत नाहीत, ते मनसेत नाराज आहेत का?
तुम्ही हा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारायला हवा, पण ते यावर उत्तर देतील असे वाटत नाही. कारण अजूनही ते मनसेत काम करीत आहेत. पक्षाचा एक हुशार आणि प्रमुख प्रवक्ता आज जर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत असेल तर तुम्ही त्याचा अर्थ काढला पाहिजे. आमच्यावर अनेक बंधने लादण्यात आलेली होती. पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नव्हते. आम्हाला उमेदवारीदेखील नाकारण्यात आली होती. आज संदीप देशपांडे मनसेचे प्रमुख प्रवक्ते असूनही माध्यमांसमोर का बोलत नाहीत, याचा विचार तुम्ही करायला हवा, असे संतोष धुरी यांनी म्हटले आहे.
प्रश्न : संदीप देशपांडे भाजपाच्या वाटेवर आहेत का?
तुम्ही मला जो प्रश्न विचारला की- संदीप देशपांडे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास का टाळाटाळ करीत आहेत. कदाचित त्यांच्यावर मनसेकडून तशी बंधने घालण्यात आली असतील, असा दावा धुरी यांनी केला आहे. संदीप देशपांडे हेदेखील मनसेला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर उत्तर देणे त्यांनी टाळले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेपासून संदीप देशपांडे आणि तुम्हाला लांब ठेवण्याची नेमकी कारणे काय होती? असा प्रश्न विचारला असता- कार्यकर्त्यांसाठी भांडणारा आणि वेळोवेळी आक्रमक होणारा नेता म्हणून संदीप देशपांडे यांची ओळख आहे. युतीच्या चर्चेवेळी संदीप यांना जर बैठकीत घेतले असते तर त्यांनी प्रत्येक विधानसभेत किमान दोन महापालिकेच्या जागा मागितल्या असत्या, त्यामुळेच कदाचित युतीची चर्चा फिस्कटली असती. हीच बाब ठाकरे बंधूंना नको होती आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला युतीच्या चर्चेपासून लांब ठेवल्याचे धुरी यांनी सांगितले.
हेही वाचा : भाजपाच्या मित्रपक्षांचा तीव्र संताप; मुस्तफिझूर रहमानच्या हकालपट्टीवरून राजकारण का तापलंय?
प्रश्न : मनसेत अजून किती नेते आणि पदाधिकारी नाराज आहेत?
मनसेत मी नाराज होतो म्हणूनच बाहेर पडून भाजपात सामील झालो. पक्षात अजूनही कितीतरी लोक नाराज असून ते १६ जानेवारीची वाट पाहत आहेत. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. भाजपात प्रवेश केल्यानंतर मला बऱ्याच लोकांकडून अभिनंदनाचे फोन आले. आम्हालाही भाजपात सामावून घ्या, अशी विनंती ते करीत आहेत. परंतु, मी सर्वांना सांगितले आहे की कोणीही माझ्याशी सध्या संपर्क साधायचा नाही. १६ जानेवारीला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले. यादरम्यान संतोष देशपांडे भाजपात येणार की नाही हे ‘देवा’लाच माहिती असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
संदीप देशपांडे नेमके काय म्हणाले?
यादरम्यान संतोष धुरी यांनी केलेल्या दाव्यानंतर संदीप देशपांडे यांनी गुरुवारी जाहीर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी मला पक्षाने दिली आहे. माझ्याविषयी कुणीही विनाकारण अफवा पसरवू नये, अशी विनंतीदेखील त्यांनी यावेळी केली. संतोष धुरी काय बोलतात त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीचा वेगळा दृष्टीकोन असतो. धुरी यांनी मनसे सोडण्याचा निर्णय बरोबर होता की चुकीचा यामध्ये मला जायचे नाही. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसे प्रमुखांनी मला तिकीट दिले होते. त्यावेळीही उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक होते. तेव्हा मी त्यांना हे विचारले नाही की त्यांना डावलून मलाच का तिकिट दिलं? मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे, असे सांगत देशपांडे यांनी आपल्या नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला.
