नांदेड : भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांचा बंडाचा पवित्रा गेल्या आठवड्यातच समोर आला होता. त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातील आपल्या अपक्ष उमेदवारीचे निशाण धर्माबादजवळच्या पवित्र धार्मिक स्थळी फडकविले. खतगावकर बहुधा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. नांदेड जिल्हा भाजपातील खासदार अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर या नेत्यांसह पक्षाचे काही आमदार आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्याच्या तयारीला लागलेले असताना दुसरीकडे वयाची ८० पार केलेल्या खतगावकरांना सुनबाईंच्या आमदारकीसाठी स्वतंत्रपणे जुळवाजुळव आणि धावाधाव करावी लागत आहे. भाजप नेत्यांकडून आश्वासन भंगाचा अनुभव आल्यानंतर खतगावकर व त्यांच्या समर्थकांनी डॉ. मीनल यांना नायगाव मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरविण्याचा संकल्प धर्माबादजवळच्या संगमेश्वर देवस्थान परिसरात सोडला. आणखी वाचा-आरोग्य विम्यावरील १८ टक्के जीएसटी मागे घेण्याची विरोधकांची मागणी नायगाव मतदारसंघ मागील ५ वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असून पक्षाचे विद्यमान आमदार राजेश पवार हे निवडणूक तयारीला लागलेले असले, तरी पक्षातील प्रमुख कार्यकर्ते त्यांच्या विरोधात एकवटले आहेत. त्यांतील राम पाटील रातोळीकर, शिवराज पाटील होटाळकर, मारोतराव कवळे प्रभृतींनी पक्षाकडे उमेदवारी मागण्याची तयारी चालवली असताना नायगावच्या राजकीय आखाड्यात आता डॉ. मीनल खतगावकर यांचेही नाव नोंदले गेले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ. मीनल यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर भाजपा नेते देवेन्द्र फडणवीस यांनी खतगावकर यांच्याशी दोनवेळा चर्चा करून त्यांच्या सुनबाईंना विधान परिषदेवर घेण्याबाबत आश्वस्त केले होते. गेल्या महिन्यात झालेल्या परिषद निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांच्या यादीत मीनल पाटील यांना स्थान मिळाले नाही. त्यानंतर अलीकडेच खतगावकर यांनी आपली तीव्र भावना अशोक चव्हाण व चिखलीकर यांच्या कानी घातल्या होत्या.. त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासनही दिले. पण त्या दिशेने कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मीनल पाटील व खतगावकर परिवाराने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. आणखी वाचा-अशोक चव्हाणांचे जुने सहकारी काँग्रेसमध्येच कायम राहणार खतगावकरांची मान्यता खतगावकर परिवारातर्फे सोमवारी धर्माबादजवळ आयोजित केलेल्या कार्यक्रमास त्यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. भाजपाकडून न्याय मिळणार नसेल तर डॉ.मीनल यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी, अशी भावना बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तेथे व्यक्त केल्यानंतर त्यास भास्करराव खतगावकर यांनी आपल्या मनोगतात संमती दिली. अशोक चव्हाण व खतगावकर यांची गेल्या आठवड्यातच भेट झाली होती. दोघांदरम्यान राजकीय चर्चाही झाली.