मुंबईतील दादर परिसरातल्या शिवाजी पार्क मैदानावर गेल्या रविवारी ठाकरे बंधूंची ऐतिहासिक सभा पार पडली. या संयुक्त सभेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपासह महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. एकेकाळी दुरावलेल्या या दोन्ही भावांनी आपल्या भाषणातून मराठी एकजूट पुन्हा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्राच्या हातातून मुंबई निसटत असल्याचा इशारा देताना त्यांनी भारतीय जनता पार्टीवर सूडाच्या राजकारणाचा आरोप केला. १५ जानेवारी रोजी होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी अस्मितेसाठी लढाई असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू खरंच भाजपाला रोखू शकतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

आयआयटी–दिल्ली येथील वरिष्ठ संशोधन अभ्यासक निखिल संजय-रेखा आडसुळे यांनी अलीकडेच दी इंडियन एक्स्प्रेससाठी एक लेख लिहिला. या लेखातून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक, ठाकरे बंधूंचे २० वर्षांनंतरचे मनोमिलन आणि त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने उभे केलेले आव्हान या विषयावर आपले मत मांडले. निखिल लिहितात- मुंबईतील शिवाजी पार्कवर अलीकडेच एक अनपेक्षित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना घडली. जवळपास २० वर्षांनंतर दुरावलेले चुलत बंधू शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पुनर्मिलनाने राज्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवारी झालेल्या संयुक्त सभेत ठाकरे बंधूंनी केलेले भावनिक आवाहन मुख्यतः मराठी माणूस या मुद्द्यावर केंद्रित होते. हीच भावनात्मक राजकारणाची संकल्पना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा कणा होती. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला ही राजकीय संकल्पना प्रामुख्याने दक्षिण भारतीयांविरोधात वापरण्यात आली होती. पुढे १९८० आणि १९९० च्या दशकात एकसंध शिवसेनेने भाषेच्या राजकारणात धर्माची सांगड घालून आपली राजकीय उपयुक्तता आणि प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु अलीकडील ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाकडे केवळ मराठी अस्मितेचा मुद्दा म्हणून पाहता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा जपण्यासाठी त्यांच्यासमोरील ही निर्णायक लढाई आहे.

आणखी वाचा : मतदानाआधी ठाकरेंना मोठा धक्का; खासदार पुत्रावर पैसे वाटपाचा आरोप, काय चाललंय महाराष्ट्रात? वाचा ५ घडामोडी…

मुंबईतील मराठी माणूस ही संकल्पना सर्व मराठी भाषकांमध्ये भावनिक आवाहन निर्माण करते. तिची पाळेमुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून रोवली गेली आहेत. तत्कालीन बॉम्बे राज्यातून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असावी, या मागण्यांमधून ही संकल्पना उदयास आली आहे. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन नेतृत्वाने या मागणीला विरोध करीत मुंबई महाराष्ट्राला देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. आजचा ‘मराठी माणूस’ हा मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू मराठी भाषकांचा एक संमिश्र गट आहे. ठाकरे बंधूंनी आपल्या भाषणातून भाजपावर हिंदी लादणारा पक्ष, असा आरोप केला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार मुंबईचे ‘अदानीकरण’ करीत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

ठाकरे बंधूंच्या या नव्या एकजुटीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीतून ‘मुंबईचा राजा कोण’ या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. हा प्रश्न ‘सत्या’ चित्रपटातील भिकू म्हात्रे (मनोज बाजपेयी) यांच्या प्रसिद्ध संवादाची आठवण करून देणारा आहे. मुंबई हा ठाकरे कुटुंबीयांचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. २५ वर्षांपासून येथील महापालिकेवर एकसंध शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सुमारे ७४,५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका देशातील सर्वांत श्रीमंत मानली जाते. ठाकरे कुटुंबासाठी मुंबई नेहमीच प्रतिष्ठेचा विषय राहिली आहे. या महापालिकेमुळेच त्यांना राज्यासह राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव टाकता आला आहे. त्यामुळेच ही निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक ही ‘मराठी माणूस’ या राजकीय संकल्पनेसाठीची अखेरची लढाई ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ या राजकीय नीतीचा वापर करून भाजपाकडून ठाकरे ब्रँडला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत पडलेली फूट हे याचे ठळक उदाहरण मानले जाते. भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण- मुंबई महापालिकेत विजय मिळवल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशावर आपला नैसर्गिक हक्क पुन्हा प्रस्थापित करण्याची त्यांना एक महत्त्वाची संधी आहे.

‘मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांचीच’ या भावनिक आवाहनाला ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मोठी गती मिळताना दिसत आहे. त्यातच भाजपाचे नेते के. अन्नामलाई यांच्या एका वक्तव्याने या वादात आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नसून, ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे विधान करून अन्नामलाई यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी मुंबईचा उल्लेख थेट ‘बॉम्बे’ असा केल्यामुळे मराठी मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे बंधूंनी याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाला लक्ष्य केले आहे. भाजपाचे नेते सर्रासपणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा अपमान करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे वक्तव्य “चुकीचे आणि अयोग्य” असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Eknath Shinde Interview : मुंबईत सत्ता मिळाल्यास महापौर कोणाचा? भाजपाचा की शिवसेनेचा? एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. त्यापैकी शिवसेना ठाकरे गट १६५ व मनसे ५२ जागांवर निवडणूक लढवीत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा भाग असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी १० जागा सोडण्यात आल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने १३७ प्रभागांत आपले उमेदवार उभे केले आहेत; तर शिवसेना शिंदे गट ९० जागांवर निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसने या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर युती केली आहे. दोन्ही पक्ष अनुक्रमे १४३ आणि ९० जागांवर निवडणूक लढवीत आहेत. त्याशिवाय सहा जागा त्यांनी मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत ९४ जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. गुरुवारी महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे मुंबईवर नेमकी कोणाची सत्ता येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.