१९ एप्रिलच्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत सुरू असलेल्या अटकळांमध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ठाकरे चुलतभावांमधील युतीचा भाजपाच्या निवडणूक भवितव्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय जनता पक्षाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. तसंच पुणे आणि ठाण्यासह इतर प्रमुख महानगरपालिका निवडणुकांसाठीदेखील तयारी करत आहेत. या निवडणुका वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळपास दोन दशकांपासून एकमेकांपासून वेगळे आहेत. राज ठाकरे यांनी आणि त्यानंतर उद्ध ठाकरेंनीही केलेल्या वक्तव्यांमुळे क्षुल्लक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून ते हातमिळवणी करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र येणे कठीण नाही, असे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी म्हटले आहे; तर दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणाले की, ते क्षुल्लक भांडणं बाजूला ठेवण्यास तयार आहेत. जर महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्यांना संधी दिली गेली नाही तर महाराष्ट्रासाठी ही हातमिळवणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र, सहा महिन्यांनंतर दोन्ही पक्षांनी राज्य विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती.
“ठाकरे चुलतभावांच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता भाजपाने उद्धव-राज युतीचा मुंबईच्या निवडणूक दृश्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचं मूल्यांकन करण्यासाठी एक सविस्तर सर्वेक्षण केले”, असे भाजपाच्या एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. अंतर्गत मूल्यांकनाच्या निष्कर्षांनुसार त्यांच्या संभाव्य युतीमुळे मुंबईत भाजपाच्या संभाव्यतेला धक्का बसण्याची अजिबात शक्यता नाही, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
भाजपा कायम मजबूत स्थितीत
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आल्याप्रमाणे, तीन महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे भाजपाची स्थिती कायम मजबूत राहणार असल्याचे समोर आले आहे. ते म्हणजे :
१. पारंपरिक मतदारांचा विश्वास.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नेतृत्व.
३. गेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाची चांगली कामगिरी.
पारंपरिक मराठी मतदारांचा आधार असलेल्या भागातही भाजपाचा पाठिंबा स्थिर आहे. सर्वेक्षणातून असे समोर आले होते की, ठाकरे बंधूंमधील युतीचा पक्षाच्या जागांच्या संख्येवर प्रतिकूल परिणाम होणार नाही”, असे सूत्रांनी सांगितले. या मूल्यांकनातून असे दिसून येते की, २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंचा प्रभाव कमी झाला आहे. पक्षाचे जवळजवळ निम्मे नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंचा प्रभावदेखील मर्यादित असल्याचे दिसून येते अशी माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने एकूण २२७ पैकी १५० जागा लढवल्या तर त्यांना फायदा होईल, असे एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा रंगत आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेतेदेखील याबाबत दररोज वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. आज राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही यावर वक्तव्य केलं आहे. “युती होणे किंवा एकत्र येण्याबाबत दोन भावांनी (राज ठाकरे व उद्धव ठाकरे) बोललं पाहिजे. करोना काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता. त्या काळात आमचा पक्ष त्यांच्या सरकारबरोबर होता. मी अनेकदा राज ठाकरे यांना पहिला फोन करताना पाहिलं आहे. मात्र, यावेळी केवळ माध्यमांवर चर्चा घडवून आणल्या जात आहेत. माध्यमांसमोर बोलून, वर्तमानपत्रात लिहून युत्या होत नाहीत”, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी माध्यमांना दिली आहे