नाशिक – लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीचा दणदणीत विजय झाल्याने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून आतापासूनच चाचपणी सुरु झाली आहे. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य हे तीनही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून पैकी दोन महिला आमदार असलेल्या नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या मतदारसंघांमधील विधानसभेचे गणित लोकसभा निवडणुकीने बदलून टाकले आहे.

लोकसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघात ८८,७१७ तर प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना ८४,९०६ मते मिळाली. वाजे यांना गोडसेंपेक्षा ३, ८०६ मते अधिक मिळाली. या मतदारसंघात भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे या आमदार आहेत. अल्पसंख्यांक, दलित आणि मागासवर्गीयांची एक ते सव्वा लाख मते असलेल्या या मतदारसंघात मविआला मिळालेली आघाडी भाजपसाठी चिंताजनक म्हणावी लागेल. या मतपेढीने यावेळी मविआला साथ दिल्याने फरांदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. मविआत मात्र मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाईल, हे अनिश्चित आहे. शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांनी या मतदारसंघातून यापूर्वी विजय आणि पराभव असा मिश्र अनुभव घेतला आहे. मतदारसंघातील अल्पसंख्यांक, दलित आणि मागासवर्गीय ही त्यांची मतपेढी आहे. या मतपेढीच्या जोरावर आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीत गिते हे उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ठाकरे गटाच्या वाट्याला हा मतदारसंघ येईल काय, हे प्रश्नचिन्ह आहे.

हेही वाचा – नाराज मराठा समाजाला आपलेसे करण्यासाठी महायुतीच्या आमदारांचा खटाटोप

भाजपच्या महिला आमदार असलेला नाशिक पश्चिम हा दुसरा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मविआचे वाजे यांना ९३, ६१३ तर, महायुतीचे गोडसे यांना १, २४, ८२७ मते मिळाली. गोडसे यांना ३१, २१० मताधिक्य मिळाले असले तरी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मताधिक्य ७२ हजार मतांनी घटले आहे. त्या निवडणुकीत गोडसे यांची आघाडी एक लाख चार हजारांची होती. प्रामुख्याने कामगारवस्ती असलेल्या या मतदारसंघात महायुतीचे २५ नगरसेवक असतानाही अशी स्थिती झाल्याने भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यासाठी विधानसभेतील विजयाचा रस्ता निर्धोक नसल्याचेच हे चिन्ह आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील हेही विधानसभेसाठी याच मतदारसंघात उमेदवारीच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, मविआकडून ठाकरे गट या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यासाठी राऊत ही जागा मागून घेतील, असेच दिसते.

हेही वाचा – डॉ. हेमंत सावरा (पालघर – भाजप) : वडिलांची पुण्याई

विधानसभेसाठी नाशिक पश्चिमची जागा ठाकरे गटाला सोडल्यास नाशिक मध्यच्या जागेवर मविआतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करु शकतील. नाशिक मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारीची तयारी करणारे वसंत गिते यांची त्यामुळे अडचण होऊ शकते. लोकसभा निवडणूक निकालातून बोध घेऊन महायुतीच्या दोन्ही महिला आमदारांना स्थानिक पातळीवरील धार्मिक आणि जातीय लोकसंख्या लक्षात घेऊन प्रचाराची दिशा निश्चित करावी लागणार आहे.