महेश सरलष्कर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेची औपचारिक सुरुवात बुधवारी झालेली असली तरी, प्रत्यक्ष भारत भ्रमणाला मात्र गुरुवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. दीडशे दिवसांच्या पदयात्रेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी साडेतीन हजार किमी.चा पल्ला पार करणार असून त्यांच्यासह जणू ‘एक गाव’ आता ‘भारत जोडो’च्या यात्रेवर निघाले आहे!

राहुल गांधी आणि त्यांचे ११८ सहकारी यात्रेकरू दररोज वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करतील. हे यात्रेकरू एकटे नसतील, त्यांच्यासह भलामोठा ताफा मजल-दरमजल करत निघालेला आहे. दररोज सुमारे २२ किमी.ची पदयात्रा केली जाईल. त्यामध्ये सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी सात ते साडेदहा या वेळेत विविध नागरी संघटना, संस्था, शेतकरी- महिला- मच्छिमार-कामगार यांच्या संघटनेचे प्रतिनिधी- गट, सामान्य नागरिक यांच्याशी चर्चा करत, गप्पा मारत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पुढे जात राहतील. दुपारी तीन ते संध्याकाळी सातवाजेपर्यंत पदयात्रेच्या दुसऱ्या सत्रामध्ये जनसहभाग मोठा असेल. दररोज किमान २५ ते ५० हजार लोकांची गर्दी असेल असा अंदाज काँग्रेसचे नेते व्यक्त करतात.

हेही वाचा… सार्वजनिक गणेश मंडळांना भाजपचे ‘सांस्कृतिक’ पॅकेज, महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून नवी क्लृप्ती

कन्याकुमारीहून निघालेली ही ‘भारत जोडो’ यात्रा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जम्मू आणि नंतर काश्मीर खोऱ्यात पोहोचेल. दीडशे दिवस पदयात्रा काढायची असेल तर, दळवळणाची संपूर्ण यंत्रणा उभी करावी लागणार होती. त्यासाठी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या समितीच्या बैठका झाल्या. पदयात्रेसाठी पाच पर्यायी मार्ग सुचवण्यात आले होते. डोंगर-दऱ्या, नद्यांचे अवघड वळण टाळून सरळ रेषेत १२ राज्यांमधून जाणारा मार्ग अखेर निश्चित केला गेला. त्यामुळे ‘भारत जोडो’ यात्रेला कुठेही बुटीतून, रेल्वेतून प्रवास करावा लागणार नाही.

दळणवळणामध्ये सर्वात महत्त्वाची आहे, राहण्याची, खाण्या-पिण्याची सुविधा. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ५८ ट्रकचे रुपांतर अत्याधुनिक कंटेनरमध्ये करण्यात आलेले आहे. दोन कंटेनर राहुल गांधींसाठी राखीव असतील. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कंटेनरमध्ये १२ खाटा आहेत. कंटनेर वातानुकुलित असून त्यात शौचालयांची सुविधा आहे.

हेही वाचा.. भाजपच्या ‘मिशन बारामती’ची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून

राहुल गांधी यांचे सुरक्षारक्षक हेही सहप्रवासी असतील. संपूर्ण यात्रेत राहुल गांधींसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. काँग्रेसचे पवन बन्सल, कन्हैया कुमार, चांडी ओमान, विजय इंदर सिंगला आदी नेतेही पदयात्रेत सातत्याने राहणार आहेत. काँग्रेसच्या माध्यम विभागाची संपूर्ण व्यवस्था व त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ चोवीस तास उपलब्ध असेल. पदयात्रेचे थेट प्रसारण ‘भारतजोडोयात्रा डॉट इन’ या संकेतस्थळावरून केले जात आहे. माध्यमांना सातत्याने माहिती पुरवली जात आहे.

ही पदयात्रा १२ राज्यांतून जाणार असल्याने त्या-त्या राज्यातील पदयात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर सोपवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्याकडे बारीक-सारीक आखणी करण्याचे काम देण्यात आले आहे. प्रत्येक राज्यामध्ये प्रदेश काँग्रेसचे कार्यकर्तेही राहुल गांधींच्या यात्रेकरूंसह पदयात्रेत सहभागी असतील. त्या-त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनी वा लोकप्रतिनिधींवर किमान पाच हजार लोकांना एकत्र करून पदयात्रेच्या दुसऱ्या सत्रात मोठी गर्दी जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. राहुल गांधी व त्यांचे ११८ सहकारी दररोज पदयात्रा करतीलचपण, त्यांच्या यात्रेत तिथले सामान्य नागरिकही असतील. त्यामुळे एकाचवेळी राहुल गांधीच्या चमूतील तीनशे जणांसह हजारोंचा समूह मैलोन मैल चालत निघालेला दिसेल.

हेही वाचा… ‘भारत जोडो’ यात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीला अशोक चव्हाणांच्या हजेरीमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला अर्धविराम

‘भारत जोडो’तील सहयात्री एका कुटुंबाप्रमाणे राहतील. ते स्वतःच स्वयंपाक करतील, सकाळचा नास्ता, भोजन, रात्रीचे स्नेहभोजन एकत्र घेतील. राहुल गांधीही या स्नेहभोजनामध्ये सहभागी होतील. अर्थात सहयात्रींच्या मदतीला स्थानिक काँग्रेसची कुमकही असेल. सगळा लवाजमा घेऊन पदयात्रा पुढे निघाल्याने सगळ्यांसाठी कंटेनर पुरेसे पडणार नाहीत हे लक्षात घेऊन मोठे तंबू ठोकले जातील. तिथे लोकांना विश्रांती घेता येऊ शकेल. त्यांच्या राहण्याचीही व्यवस्था या तंबूंमध्ये करण्यात आलेली आहे. पदयात्रा दररोज ठरलेल्या मार्गाने पुढे निघेल, नव्या ठिकाणी मुक्काम असल्याने कंटेनर पदयात्रा मुक्कामी पोहोचण्याआधीच तिथे पोहोचलेले असतील. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास मदतीसाठी वैद्यकीय चमूही असेल.

‘भारत जोडो’ यात्रेत छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते वा नागरिक सामील होतील पण, संपूर्ण दीडशे दिवस ११९ सहयात्री प्रवास करणार आहेत. ते लोकांशी थेट संवाद साधणार असल्याने त्यांची निवडही काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. ‘यात्रेकरूं’च्या निवडीसाठी दोन प्रमुख निकष ठेवण्यात आलेले होते. पदयात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे काँग्रेसच्या विचारांबाबत स्पष्टता असली पाहिजे. वैचारिक भूमिकेवर लोकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांना निःसंदिग्धपणे प्रत्युत्तर देता आले पाहिजे व ही व्यक्ती दीडशे दिवस पदयात्रा करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. या दोन अटी पूर्ण करू शकतील अशा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नावांची यादी पाठवण्याची सूचना दिग्विजय सिंह यांच्या समितीने राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेसला केली होती. त्यानुसार, यादी पाठवली गेली, निकष पूर्ण करू शकतील अशा ११८ सहयात्रेकरूंची निवड करण्यात आली. त्यांच्याकडून आवश्यक अर्ज भरून घेण्यात आले. पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवकांचा उत्साह वाढत असून दररोज नवनवे अर्ज भरले जात आहेत, पण, एकावेळी किती जणांना सहभागी करून घेणार, असा सुखावणारा पण, अडचणीचाही प्रश्न काँग्रेसच्या पदयात्रेच्या व्यवस्थापन गटापुढे निर्माण झालेला आहे. हा प्रचंड प्रतिसाद पाहता ‘भारत जोडो’ यात्रेत ‘अख्खे गाव’ पदभ्रमण करू लागले असावे असे वाटावे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी कन्याकुमारीहून पदयात्रा निघालेली आहे. या यात्रेतील वयाने सर्वात मोठे सहयात्री आहेत, राजस्थानमधील ५८ वर्षीय विरेंद्रसिंह महलावत तर, सर्वात लहान २५ वर्षीय अरुणाचल प्रदेशचे अजाम जोम्बला व बेम बाई. ११९ ‘यात्रेकरूं’मध्ये २८ महिला आहेत. ‘भारत जोडो’ यात्रा प्रामुख्याने कन्याकुमारी (तामीळनाडू), थिरुवनंतपुरम, कोची, निलांबूर (केरळ), म्हैसूर, बेळ्ळारी, रायचूर (कर्नाटक), विकाराबाद (तेलंगणा), नांदेड, जळगाव जामोद (महाराष्ट्र), इंदौर (मध्य प्रदेश), कोटा, दौसा, अलवर (राजस्थान), बुलंदशहर (उत्तर प्रदेश), दिल्ली (दिल्ली), अंबाला, पठाणकोट (पंजाब), जम्मू आणि काश्मीर (जम्मू-काश्मीर) अशा १२ राज्ये, २ केंद्रशासित प्रदेशातील २० शहरांमधून मार्गक्रमण करेल. हा मार्ग सरळ रेषेत असल्याने गुजरात, बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल वा ईशान्येकडील राज्यांना वगळण्यात आले आहे. मात्र, ज्या राज्यांमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा जाणार नाही, त्या राज्यांमध्ये यात्रेशी निगडीत कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With rahul gandhi villages are joined bharat jodo yatra for 150 days print politics news asj
First published on: 08-09-2022 at 16:13 IST