लक्ष्मण राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना : अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जालना जिल्हापातळीवर आयोजित अधिकारी- लोकप्रतिनिधींच्या बैठकीत पालकमंत्री अतुल सावे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यात वाद झाला. सावे आणि आमदार बबनराव लोणीकर भाजपचेच. परंतु त्यांच्यातील खडाजंगी अधिकाऱ्यांना बैठकीतच पाहावी लागली. या वादास कारण ठरले सावे यांनी बैठक आटोपती घेण्याच्या संदर्भात केलेले वक्तव्य!

जालना जिल्ह्यात पाचपैकी तीन विधानसभा सदस्य भाजपचे आहेत. खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेही भाजपचे आहेत. खासदार दानवे आणि संतोष दानवे तसेच नारायण कुचे या दोन भाजप आमदारांपासून आमदार लोणीकर हे वेगळे असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आलेले आहे. अनेकदा लोणीकर यांनी आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. पालकमंत्री सावे यांची बैठक आटोपती घेण्याची सूचना लोणीकर यांना आवडली नाही आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. लोणीकर यांचे म्हणणे असे की, तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले. तसेच मागील वर्षातील पीक नुकसानीचे अनुदान, पीक विम्याचा मोबदला, पंतप्रधान किसान सन्मान योजना इत्यादी संदर्भात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. परंतु त्याकडे लक्ष वेधण्यासाठी बैठकीत बोलणे आवश्यक होते. परंतु पालकमंत्र्यांना बैठक आटोपती घेण्याची घाई होती. त्यांच्या सूचनेप्रमाणे पाच मिनिटांत बैठक गुंडाळली तर शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही कुठे मांडायचे? त्यामुळेच आपण पाच मिनिटांत बैठक गुंडाळण्याच्या सूचनेस विरोध केला आणि त्याकडे दुर्लक्ष करत बैठकीत शेतक ऱ्यांच्या समस्या मांडल्या. पालकमंत्री उद्योगपती आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशी आपली अपेक्षा होती. त्यामुळे आमच्यात वाद झाला. बैठकांमध्ये वेळ मिळत नाही. काही आमदार बैठकांना येत नाहीत, असा आरोपही लोणीकरांनी केलेला आहे.

हेही वाचा… कन्या प्रणितीसाठी सुशीलकुमार शिंदे झाले सक्रिय !

पालकमंत्री सावे यांच्या कार्यपद्धतीविषयी त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने यावेळेस तक्रार केलेली असली तरी यापूर्वी महायुतीमधील शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे घटक पक्षांच्या जिल्हापातळीवरील पुढाऱ्यांनीही जाहीर तक्रारी केलेल्या आहेत. ६ ऑगस्ट २०२३ रोजी शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर त्याचप्रमाणे भाऊसाहेब घुगे आणि मोहन अग्रवाल या दोन जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सावे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातच घेराव घातला. सावे यांना अडवून घोषणाबाजी केली. विकासकामांच्या निधी वितरणात सावे यांच्याकडून भेदभाव होत असून त्यांच्याकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार घेराव घालणाऱ्यांची होती. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या युवकांच्या मेळाव्यातही पालकमंत्री सावे सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार करण्यात आली. राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी यावेळी राष्ट्रवादीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पालकमंत्री सावे यांना केले. पालकमंत्री राष्ट्रवादीबाबत पक्षपात करीत नसल्याचा अनुभव आम्हाला त्यांच्या कार्यपद्धतीतून येत नाही, असा अनुभवही चव्हाण यांनी सांगितला होता. महायुतीमधील तिन्हीही घटक पक्षांतून कार्यपद्धतीवर तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री सावे म्हणाले, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीस बबनराव लोणीकर यांच्याशिवाय दोन आमदारही उपस्थित होते. त्यांनाही बोलण्यासाठी वेळ मिळावा असे आपणास वाटत होते. लोणीकर बोलल्यानंतर मागील वर्षांची बाकी असलेली पिकांची नुकसानभरपाई आणि पीकविम्याच्या संदर्भात बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मागील चार दिवसांतील अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. महायुतीमधील भाजपाशिवाय अन्य दोन्ही घटक पक्षांतील काही बाबींची नाराजी गैरसमजातून झाली होती.

More Stories onअकोलाAkola
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Within party people disappointed against guardian minister atul save print politics news asj
First published on: 06-12-2023 at 12:24 IST