प्रशांत देशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : दहा वर्षांपूर्वी विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर होता. अशा स्थितीत पुण्या-मुंबईत संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांचे मन शेतकरी बांधवांवरील संकटाने द्रवले. आपणही काहीतरी केले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. अशा अस्वस्थ युवकांची मोट बांधण्याचे काम अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या ४0 वर्षीय अभिजीत फाळके यांनी केले. आपल्या उत्पन्नातील काही वाटा या कार्यासाठी राखून ठेवण्याची वृत्ती जोपासत विविध उपक्रम अमलात आले.

युवकांनी फाळकेंच्या मदतीने सर्वप्रथम विदर्भातल्या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा संकल्प केला. १२९ शेतकऱ्यांना स्वत: बँकेत नेऊन त्यांचा सातबारा कोरा केला. ग्रामीण भागातील प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी आत्महत्याग्रस्त ५६ गावांत फाळके यांच्या नेतृत्वात संवाद यात्रा काढण्यात आली. पुरेसा पैसा गोळा झाल्यावर आत्महत्याग्रस्त ७४३ कुटुंबांना शिवणयंत्र व पीठ गिरणीची भेट देण्यात आली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून पुण्यातील आयटी कंपनी परिसरात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या युवकांच्या ‘आपुलकी’ संघटनेमार्फत झाले. त्याचा उत्पादकांना लाभ झाला.

हेही वाचा: समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देणे, रोजगार मेळावे, गरजू विद्यार्थ्यांना विविध मार्गाने मदत, ग्रामीण भागातील सात शाळा ‘डिजिटल’ करून देण्याचे कार्य फाळके यांनी केले. हे काम सुरू असतानाच शेतकऱ्यांचे आधुनिक शेतीसाठी प्रबोधन करणे आवश्यक वाटले म्हणून विविध गावांत उड्डाण या नावाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांना आणून सहा हजारांवर शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. याचा पुढील काळात सकारात्मक परिणाम दिसून आला. २०१० पासून केवळ सामाजिक कार्याचे ध्येय ठेवलेल्या युवकांनी मग थेट राजकारणातच प्रवेश करण्याचे ठरवले. सर्वसमावेशक म्हणून काँग्रेसचा पर्याय निवडला. मात्र पक्षांतर्गत एका निवडणुकीत डावलले जाण्याचा अनुभव आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असे त्यांनी नमूद केले. शरद पवार यांच्या कार्याचा प्रभाव होताच. त्यांनी पक्षात नसतानाही आमच्या संघटनेची एकदोन कामे मार्गी लावली होती. त्यांचे व जयंत पाटील यांचे आशीर्वाद घेऊन काम सुरू केले. करोना साथीच्या काळात सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मदत केली.

हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता

भूमिपुत्र संघर्ष वाहिनी ही संघटना स्थापन करून २३८ दुर्बल कुटुंबांना प्रत्येकी हजार रुपये देण्यात आले. करोना टाळेबंदीमुळे विविध घटक संकटात सापडले होते. अशांना वस्तू व रोख स्वरूपात मदत केली, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. संकटाचे सावट दूर झाल्यावर पुन्हा शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले. कारंजा व खरांगणा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, चना खरेदीला मुदतवाढ मिळवून देणे, पीक कर्ज वाटपातील दिरंगाईविरोधात बँकांपुढे आंदोलन, फवारणी पंपाचे वाटप असे दिलासा देणारे उपक्रम राबवले. विधायक वृत्तीने राजकारण केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात, वर्धा जिल्ह्यात त्यांचे काम सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा सल्ला शिरोधार्य मानून वाटचाल करणार असल्याचा निर्धार फाळके व्यक्त करतात. पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्याचा आग्रह सहकारी करतात. पण पक्षशिस्तीला धरूनच काम करणार असल्याचे फाळके यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young politician at ncp in wardha abhjit falke resolved to make farmers in five districts of vidarbha debt free print politics news tmb 01
First published on: 03-12-2022 at 09:49 IST