नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : तत्कालीन ठाणे व सध्याच्या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात असणाऱ्या मोखाडा तालुक्यात शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये घोषणाबाजी करणारा व नंतर भाषण देणारा हा युवक आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाला आहे. प्रकाश कृष्णा निकम या ४२ वर्षीय आदिवासी समाजातील कार्यकर्त्याने आश्रम शाळेतील शिक्षणापासून सुरू करत, वाटचालीच एक नवा टप्पा गाठला आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रकाश निकम यांची मोखाडा तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा येथील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मोखाडा येथील शासकीय वसतिगृहात राहून कला शाखेतील पदवी घेतली. आरंभी किराणा दुकानात काम करत रंगकाम करत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना-भाजप युतीतर्फे काढण्यात येणाऱ्या विविध सभांमध्ये ते प्रारंभिक घोषणा देत. त्यातून ते राजकारणात आले. सन २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते सदस्य झाले. पाठोपाठ २००२ मध्ये पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर २००५ मध्ये मोखाडा पंचायत समितीचे सभापती पद मिळाले. सन २००६ मध्ये त्यांची पत्नी सारिका पंचायत समितीला निवडून गेल्या होत्या.

हेही वाचा >>>बंटी शेळके- आंदोलनातून जडणघडण

ठाणे जिल्हा विभाजनानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विक्रमगड मतदारसंघात निसटता पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या २०१४ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रकाश त्यांनी मोखाड्यातून विजय संपादन केला तर त्यांच्या पत्नी पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये ते पालघर तालुक्यातील तारापूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर विजयी झाले. शेतीसोबत ते व्यवसाय करत आहेत. आदिवासी बांधवांचा विकास साधण्यासाठी त्यांनी मोखाडा तालुक्यासह जिल्ह्यातील इतर भागांमधील काम सुरू ठेवले. विविध शासकीय योजना तळागाळात राबवण्याबरोबरच मोखाडा तालुक्यात प्रत्येक गाव तिथे शाळा उभारणे, कुपोषण कमी करण्यासाठी विविध योजना राबवणे, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी सेवाभावी संस्था व इतर घटकांची मदत घेणे, आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणे हे त्यांच्या कार्यातील वैशिष्ट्य राहिले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित असलेल्या त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आपल्या भागातील आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young politician prakash nikam district council president entered politics through shivsena amy
First published on: 02-12-2022 at 10:30 IST