समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता|young politician sameer rajurkar bjp district general secretary of aurangabad entered politics through abvp | Loksatta

समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका.

समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सुहास सरदेशमुख

औरंगाबाद: राजकीय पक्ष कोणताही असो तेथे होयबांची गर्दी असतेच. त्यात अभ्यासूपणे कायद्याच्या आधारे शहर विकासाचं बोलणारा, आपला मुद्दा महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपंचायत अधिनियमांच्या आधारे मांडत महापालिकेतील अनागोंदीला किमान शिस्त लागावी यासाठी काम करणारा नेता अशी औरंगाबाद येथील समीर राजूरकर यांची ओळख. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामातून विद्यापीठाच्या राजकारणात लक्ष घालत समीर राजूरकर यांनी शहर विकासाचं राजकारण केलं.

दिवंगत वसंतराव भागवत, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव असणारे ४३ वर्षांचे राजूरकर सुधारणावादी राजकीय व्यवस्था उभी राहावी यासाठी प्रयत्न करतात. भाजपमध्ये स्वत:च्या कामाची छाप असणारे राजूरकर सध्या सरचिटणीस पदावर काम करीत आहेत. अभ्यासू कार्यकर्ता घडविणे आणि त्याला नेतेपदापर्यंत पोहोचविणे हे एखाद्या पक्षाचे किमान १५ वर्षांचे काम असू शकते. अर्थात ते आजच्या काळात कोण करेल? पण समीर राजूरकर यांच्यावर राजकीय कार्यकर्तापणाचे भाजपनेही संस्कार केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हनुमान नगर शाखेत असताना सामाजिक कामाचा त्यांना अनुभव मिळत गेला. १९९३ साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरातील भूकंपानंतर लिंबाळा हे गाव पुनर्वसनात त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग दिला. पुढे १९९५ साली समर्थनगर वाॅर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

हेही वाचा: इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता

२००४ मध्ये आसामच्या मार्गारेटा विधानसभा मतदारसंघात ३५ दिवस त्यांनी मुक्काम करून पक्षबांधणीचे काम केले. शहरातील समांतर पाणीपुरवठा योजनेचा प्रत्येक कागद समीर राजूरकर यांच्याकडे उपलब्ध आहे. कंत्राटदारधार्जिणे कायदे बनविणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी सारे समीर राजूरकरांना वचकून असतात. प्रश्न मग पाणीपुरवठ्याचा असो की भूमिगत गटार योजनेचा. शहर विकास आराखडा नियमानुसार व्हावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि तो जिंकलाही. शहर विकास आराखड्यात घोळ घालून अनेक जागा बळकावण्याच्या कामातील अनेकांचे त्यामुळे धाबे दणाणले.

हेही वाचा: रणजीतराजे भोसले : अभ्यासू नेता

एका बाजूला सभागृहातील लढाई लढतानाच रस्त्यावरची लढाई ते करतात. एका आंदोलनात त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर त्यांना ९ दिवस सरकारी रुग्णालयात काढावे लागले होते. राजकारणात आता हुशारी हा निकष तसा बाजूला पडत असल्याने अजूनही राजूरकर यांचा संघर्ष सुरू आहेच. औरंगाबाद शहराच्या विकासात सुशिक्षितांची एक फळी उभी राहावी, अशी राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन सुधारणावादी विचाराने झटणारा कार्यकर्ता अशी राजूरकर यांची ओळख कायम राहील.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 09:57 IST
Next Story
Gujarat Election 2022: “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश