Youth Representation in Politics : राजधानी दिल्लीतील जंतरमंतर, रांची आणि आता पाटणा येथे तरुण त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहेत. जुलैपासून देशाच्या विविध भागांत तरुणांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलनं केली. त्यांच्या या सक्रियतेची दखल घेत भाजपापासून काँग्रेसपर्यंत राजकीय पक्षांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. पण, तरुणांना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मात्र खडतरच आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने मांडलेल्या आकडेवारीतून हाच मुद्दा अधोरेखित होतो. तरुणांसाठी राजकारणातील प्रवेशाची वाट अजूनही सोपी नाही आणि राजकीय घराण्याची पार्श्वभूमी असेल तर ही वाट तुलनेने सुकर होते.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये सध्या १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेल्या जेन झी तरुणांची संख्या केवळ २६ आहे. या वयोगटातील ६ खासदार आणि २० आमदारांचा त्यात समावेश आहे.

यातील १३ जण राजकीय घराण्यांमधून आलेले आहेत. लोकसभेतील सहा जेन झी खासदारांपैकी पाच जण आणि २० आमदारांपैकी आठ जण राजकीय घराण्यातून आले आहेत; म्हणजेच तरुण वयात राजकारणात प्रवेश करणाऱ्यांमध्येही घराणेशाहीचा प्रभाव दिसतो.

यामध्ये एक कायदेशीर मर्यादाही आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान २५ वय पूर्ण असावं लागतं, त्यामुळे जेन झीमधील मोठा वर्ग अद्याप निवडणूक लढवण्यास पात्र ठरत नाही. मात्र, ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या नेत्यांकडे पाहिलं तरी चित्र फारसं बदललेलं दिसत नाही. या गटातील ३८४ पैकी १४५ म्हणजे ३७.८ टक्के नेते राजकीय घराण्यांमधून आलेले आहेत.

पक्षनिहाय चित्र पाहिलं तर तरुण खासदारांमध्येही राजकीय घराणेशाहीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. भाजपाच्या २४० लोकसभा खासदारांपैकी नऊ खासदार ४० वर्षांखालील आहेत. त्यापैकी पाच जण राजकीय घराण्यांमधून आले आहेत. काँग्रेसच्या ९८ खासदारांपैकी सात जण ४० वर्षांखालील असून त्यापैकी चार जणांची राजकीय पार्श्वभूमी आहे, तर समाजवादी पक्षाच्या ३७ खासदारांपैकी सात जण या वयोगटात येतात आणि त्यापैकी सहा जण राजकीय घराण्यांशी संबंधित आहेत. तेलुगू देसम पक्षाच्या १६ खासदारांपैकी चार जण ४० वर्षांखालील आहेत आणि विशेष म्हणजे हे चारही खासदार राजकीय घराण्यांतून येतात.

भाजपाची सध्या २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता आहे. भाजपाची काही राज्यांत एकहाती सत्ता आहे तर काही राज्यांत युतीचे सरकार आहे. भाजपा आणि मित्रपक्षांचे एकत्र असे एकूण १,८११ आमदार आहेत, यापैकी १२१ आमदार ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. यापैकी ४१ आमदार राजकीय घराण्यांतून येतात.

काँग्रेसची सध्या चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता आहे, तर एका राज्यात आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या ६६२ आमदारांपैकी ५२ आमदार ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. या गटातील २३ आमदारांना राजकीय वारसा आहे.

लोकसभेतील चित्र काय?

लोकसभेत सध्या ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे ४० खासदार आहेत. यामध्ये सहा जेन झी खासदार आहेत. या सहा जेन झी खासदारांपैकी पाच जण राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्याचवेळी ३० ते ४० वयोगटातील ३४ खासदारांपैकी १९ खासदारांची राजकीय पार्श्वभूमी आहे.

राजकीय वारसा असलेले खासदार

अभिषेक बॅनर्जी (वय ३८) – तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत.
यदुवीर वाडियार (वय ३४) – भाजपाचे खासदार आणि म्हैसूरच्या माजी राजघराण्यातील सदस्य. ते माजी खासदार श्रीकांतदत्त नरसिंहराजा वाडियार यांचे दत्तक पुत्र आहेत.
रक्षा खडसे (वय ३९) – महाराष्ट्रातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून आहे.
करण भूषण सिंह (वय ३५) – भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र.
प्रियांका जारकीहोळी (वय २९) – काँग्रेसच्या खासदार आणि कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या आहेत. त्या जारकीहोळी या राजकीय कुटुंबातून येतात.
चंदन चौहान (वय ३७) – राष्ट्रीय लोक दलाचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री नारायण सिंह यांचे नातू आहेत.
आदित्य यादव (वय ३८) आणि अक्षय यादव (वय ३९) – समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. ते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे पुतणे आणि अखिलेश यादव यांचे नातेवाईक आहेत.
श्रीकांत शिंदे (वय ३९) – शिवसेनेचे खासदार आणि पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आहेत.
जी. एम. हरीश बालयोगी (वय ३५) – तेलुगू देसम पक्षाचे खासदार आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे पुत्र आहेत.
भारत मथुकुमिल्ली (वय, ३७) – आंध्र प्रदेशातील माजी खासदारांचे नातू आहेत. ते राज्यातील प्रसिद्ध नंदामुरी-नारा या राजकीय आणि चित्रपट कुटुंबाचे जावई आहेत.
पुष्पेंद्र सरोज (वय २७) आणि प्रिया सरोज (वय २७) हे समाजवादी पक्षाचे खासदार असून ते अनुक्रमे कौशांबी आणि मच्छलीशहर मतदारसंघातून येतात.
शांभवी चौधरी (वय २८) – लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) समस्तिपूरमधील खासदार आहेत.

यामध्ये ११ महिला प्रतिनिधींचा समावेश असून त्यापैकी आठ जणी राजकीय घराण्यांतून येतात.

विधानसभेत तरुणांचे प्रतिनिधित्व किती?

देशातील ३१ विधानसभांमध्ये ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे ३४४ आमदार आहेत. त्यापैकी १२१ आमदार म्हणजेच ३५.२ टक्के आमदार राजकीय घराण्यांतून येतात. हे देशातील एकूण ४,१३१ आमदारांच्या तुलनेत, तरुण आमदारांचा वाटा ८.३ टक्के आहे.

मात्र, तरुण आमदारांचं प्रतिनिधित्व सर्व राज्यांमध्ये सारखं नाही. तीन राज्यांमध्ये ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाचा एकही आमदार नाही, तर आणखी दोन राज्यांमध्ये या वयोगटातील एकाही आमदाराला राजकीय वारसा नाही.

घराणेशाहीचं चित्रही राज्यागणिक बदलतं. सात राज्यांमध्ये ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या आमदारांमध्ये राजकीय घराण्यांतून आलेल्यांची संख्या जास्त आहे, तर २१ राज्यांमध्ये या वयोगटातील बहुसंख्य आमदारांना राजकीय वारसा नाही.

राजकीय घराण्यांतील आमदारांची सर्वाधिक संख्या ओडिशात आहे. ४० किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या १६ आमदारांपैकी १४ आमदारांना राजकीय वारसा आहे. त्यानंतर महाराष्ट्रात १६ पैकी १२, उत्तर प्रदेशात ३२ पैकी २३, तर कर्नाटक आणि हरियाणात प्रत्येकी नऊपैकी पाच आमदार राजकीय घराण्यांतून आलेले आहेत.

मात्र, काही राज्यांमधील चित्र वेगळं आहे. तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये तरुण आमदारांची संख्या मोठी असली तरी राजकीय घराण्यांतील आमदारांची संख्या कमी आहे. तामिळनाडूतील ४७ तरुण आमदारांपैकी केवळ तीन जण राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ४५ पैकी पाच, तर केरळमध्ये १६ पैकी केवळ एका आमदाराला राजकीय वारसा आहे. पंजाबमध्येही ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या १२ आमदारांपैकी फक्त एक आमदार राजकीय घराण्यातून आलेला आहे.

विधानसभेच्या एकूण संख्येच्या तुलनेत पाहिलं तर तामिळनाडूमध्ये ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या आमदारांचं प्रमाण सर्वाधिक २०.१ टक्के आहे. त्यानंतर मेघालय १८.३ टक्के, पश्चिम बंगाल १५.३ टक्के, बिहार १३.२ टक्के आणि केरळ ११.४ टक्के आहे. मात्र, १६ राज्यांमध्ये तरुण आमदारांचं प्रमाण विधानसभेतील एकूण आमदार संख्येच्या १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

घराणेशाहीची काही ठळक उदाहरणे

बिहारमधील ३६ वर्षीय तेजस्वी यादव हे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी स्थापन केलेल्या आरजेडीचे सध्या प्रमुख आहेत. हरियाणातील काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचे २७ वर्षीय पुत्र आदित्य हे राज्यातील एकमेव जेन झी आमदार आहेत. इंडियन नॅशनल लोक दलचे ३४ वर्षीय अर्जुन चौटाला हे माजी मुख्यमंत्री ओ. पी. चौटाला यांचे नातू आहेत.

हिमाचल प्रदेशातील ३६ वर्षीय मंत्री विक्रमादित्य सिंह हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा प्रतिभा सिंह यांचे पुत्र आहेत. जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या ३१ वर्षीय देवयानी राणा या केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या भाची आणि माजी आमदार देवेंद्र राणा यांच्या कन्या आहेत.

मध्य प्रदेश काँग्रेसचे ४० वर्षीय जयवर्धन सिंह हे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे पुत्र आहेत. काँग्रेसचे ३४ वर्षीय अभिजीत शाह हे मक्राईच्या माजी राजघराण्यातील आहेत.

महाराष्ट्रातील भाजपाच्या खासदार श्रीजया चव्हाण (वय ३४) या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या, तर आमदार आदित्य ठाकरे (३६) हे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ वर्षीय रोहित पाटील हे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र असून राज्यातील एकमेव जेन झी आमदार आहेत.

ईशान्य भारतातील मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचे पुत्र सूरजकुमार ओकराम (वय ३८) काँग्रेसचे आमदार आहेत. मेघालयात माजी मुख्यमंत्री डोंकुपर रॉय यांचे पुत्र बालाजिद कुफर सिनरेम (वय ३८) आणि माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांची कन्या मियानी शिरा (वय ३६) आमदार आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांचे पुत्र आदित्य गोले (वय ३६) हेही आमदार आहेत.

ओडिशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांचे पुत्र सागर चरण दास (वय ३४) हे आमदार आहेत, तर उत्तर प्रदेशात भाजपाचे ३८ वर्षीय प्रतीक भूषण सिंह हे बृजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत. समाजवादी पक्षाच्या कुटुंबातील तेज प्रताप सिंह (वय ३८) हेही आमदार आहेत. निषाद पक्षाचे संस्थापक संजय निषाद यांचे पुत्र सरवन निषाद (वय ३६) आणि अब्बास अन्सारी (वय ३४) हेही आमदार आहेत.