08 August 2020

News Flash

दुप्पट खाशी…

एरवी उपवासाच्या खाद्यपदार्थामधली राणी म्हणजे साबुदाण्याची खिचडी.

उपवास खरं तर दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे निर्जळी आणि दुसरा एकादशी दुप्पट खाशी प्रकारातला. आपण कुठल्या प्रकारात बसतो हे उपवास करणाऱ्या ज्याने त्याने ठरवावं. तरीही अगदी पाणी न पिता उपवास करणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे निर्जळी उपवास करणाऱ्यांना या चच्रेतून थोडं बाजूला काढून ठेवू या. एरवी उपवासाच्या खाद्यपदार्थामधली राणी म्हणजे साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा किती भयंकर पद्धतीने तयार केला जातो याची एक पोस्ट व्हॉट्स अ‍ॅपवर नेहमी फिरत असते. पण साबुदाण्याची खिचडी आवडत असेल तर दृष्टीआड सृष्टी हा नियम लागू करायचा आणि तयारीला लागायचं. खिचडीची सगळ्यात पहिली तयारी म्हणजे शेंगदाण्याचं कूट. खिचडी पांढरीशुभ्र हवी असेल तर दाण्याचं कूट पांढरंशुभ्र हवं. त्यासाठी दाणे अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचे. गार झाल्यावर त्यांची सगळी सालं काढून टाकायची. या कामाचा जाम कंटाळा येणं साहजिक आहे. पण अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता तसं आपल्याला पांढरीशुभ्र खिचडी दिसत असेल तर तेवढं करायलाच हवं. आता हे दाणे मिक्सरमधून बारीक करायचे. पण ते बारीक करताना मिक्सर भस्सकन लावला फिरवला की झालं असं अजिबातच करायचं नाही. तसं केलं तर अगदी अध्र्या मिनिटातही त्या कुटाचा गच्च गोळा तयार होतो आणि मग उपवासाला साबुदाण्याच्या खमंग खिचडी ऐवजी दाण्याचा लाडू खायची वेळ येते. त्यामुळे मिक्सरमध्ये दाणे घातल्यावर मिक्सर सुरू करताना बटण अर्धा सेकंद फिरवायचं, पॉझ घ्यायचा, असं दोन-तीन वेळा केलं की मिक्सर उघडून बघायचा. आपल्याला दाण्याचा कूट करायचाय पण तो एकदम गुळगुळीत नकोय, भरडसर हवाय. मिक्सर असा अर्धवट फिरवला की हवा तसा भरडसर कूट मिळतोच. तो खिचडीमध्ये दाताखाली येतो तेव्हा चावून खाताना खिचडीची मजा आणखी वाढते.

आता पुढचा टप्पा साबुदाण्यांचा. ते भिजत घालणं आणि ते हवे तसे मऊसूत भिजणं प्रत्येकीलाच साधतं असं नाही. त्यासाठी हवा तेवढा मापात साबुदाणा एका खोलगट भांडय़ात घ्यायचा. पहिल्यांदा पाणी घालून धुऊन घ्यायचा. सगळं पाणी काढून टाकायचं आणि मग त्यात साबुदाणा बुडेल इतपत किंवा साबुदाण्याच्या वर एक पेर राहील एवढं पाणी घालायचं. अशा पद्धतीने साबुदाणा साधारण तीन ते चार तासांत भिजतो. दुपारी बारा वाजता खिचडी करायची असेल तर सकाळी सात-साडेसात-आठला साबुदाणा भिजत घातला तरी छान भिजतो. कुणीकुणी एकदा साबुदाणा धुतला की सगळं पाणी काढून टाकतात आणि तसाच ठेवून देतात. त्यामुळे खिचडी टचटचीत होण्याची शक्यता असते. कुणीकुणी हा साबुदाणा पाण्याऐवजी दुधात भिजत घालतात. त्यामुळे खिचडी एकदम टेस्टी होते म्हणे.

आता खिचडीला लागणारे बाकीचे जिन्नस म्हणजे तूप, जिरे, हिरवी मिरची, िलबू, बटाटे. भिजलेल्या साबुदाण्यात दाण्याचं कूट, मीठ, हवी असेल तर चवीनुसार साखरेची चिमूट घालून सगळं मिसळून घ्यायचं. कढईत तूप तापत ठेवायचं. त्यात जिरे, मिरची घालायची. ज्यांना खिचडीला तिखटाचा चटका हवा असतो, ते मिरची वाटूनही घालतात. पण ती सगळ्यांच्याच पोटाला सोसते असं नाही. म्हणून मग मिरची पोट फोडून, मोठे तुकडे करून घ्यायची आणि मग तुपात घालायची. म्हणजे तिखटपणाही येतो आणि ती बाजूलाही काढता येते. काहीजण मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालूनही खिचडी करतात. तीही खमंग होते. आता बटाटे. ते हवे तर आधीच उकडून घ्यायचे किंवा अयत्या वेळी सालं काढून बारीक काप करून जिऱ्याच्या फोडणीत घालायचे. ते शिजले की साबुदाणा घालायचा आणि चांगला परतायचा. उपवासाला धणे चालत नाहीत असं मानलं जात असल्यामुळे कोिथबीरही चालत नाही. ज्यांना चालते त्यांनी कोिथबरी, खवलेल्या ओल्या नारळाचा कीस पेरायला हरकत नाही. त्याबरोबरच िलबू पिळलं तर खिचडीची गंमत आणखी वाढते. उपवास करणाऱ्याला हमखास खिचडीचा कंटाळा आलेला असतो आणि तो न करणाऱ्यांना खिचडी खायची संधीच पाहिजे असते.

खरं तर साबुदाणा हा काही मूळचा भारतीय पदार्थ नाही, तरीही त्याला उपवासाच्या पदार्थात कसं स्थान मिळालं हे एक कोडंच आहे. त्यात आत्मशुद्धी किंवा शरीरशुद्धी अशा कोणत्याही कारणासाठी उपवास केला तरी साबुदाणा हा पिष्टमय पदार्थ. त्यात दाण्याचा कूट, तूप, बटाटे, हिरवी मिरची हे सगळं घातल्यावर तो टेस्टी लागत असला तरी हे सगळेच घटक पचायला जड असल्यामुळे पोटाला विश्रांती मिळण्याऐवजी पचनसंस्थेवर ताण येण्याचीच शक्यता जास्त. उपवासाला सहसा दिवसातून एकदाच खाल्लं जात असताना, त्यात हे सगळे घटक असलेले पदार्थ खाऊन पित्त होण्याचीही शक्यता वाढते. तरीही उपवासाच्या पदार्थाच्या लोकप्रियतेमध्ये खिचडी आपलं स्थान टिकवून आहे. ज्यांना भरपूर श्रमाचं काम करायचं असतं, त्यासाठी भरपेट नाश्त्याची गरज असते, त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी हा खरं तर उत्तम नाश्ता असू शकतो. पण त्याला स्थान मिळालंय उपवासाच्या पदार्थामध्ये. एका नामांकित शेफच्या मते जगात इतरत्र साबुदाण्याचं पीठ करून त्या पिठाचा वापर पदार्थाच्या बाईंिडगसाठी वगरे केला जातो. भारतात बनवली जाते तशी साबुदाण्याची खिचडी जगात कुठेही बनवली जात नाही. पण वेगवेगळे घटक घालून आपण त्या साबुदाण्याला जी अफलातून चव देतो ती जगाला माहीतच नाही. म्हणून साबुदाण्याच्या खिचडीचं नीट मार्केटिंग व्हायला हवं.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2016 1:05 am

Web Title: ekadashi fast sabudana khichadi
Next Stories
1 सगळीकडे बटाटा!
2 कवतिक कैरीचं
3 गुऱ्हाळ रसाचं
Just Now!
X