13 August 2020

News Flash

नाही खमंग तरीही…

पावसाळा नुकताच सुरू होतो ते दिवस वेगळेच असतात.

पावसाळा नुकताच सुरू होतो ते दिवस वेगळेच असतात. ते असतात पावसात मनसोक्त भिजण्याचे. त्यासोबत खमंग कुरकुरीत कांदाभजी हादडण्याचे. गरम गरम बटाटेवडे गट्टम करण्याचे. भाजलेल्या कणसावर मीठ, तिखट िलबू चोळून ते चविष्ट कणीस खाण्याचे. आलं घातलेल्या वाफाळत्या चहाचा गंध भरून घेत तो पिण्याचे. पाऊस पडतोय तर चला, वेलची किंवा जायफळ घातलेली गरम गरम कॉफी घेऊया असं कुणी म्हणत नाही. तिथं हवा असतो तो गरमागरम चहाच.

पण जसजसा पावसाचा मुक्काम वाढायला लागतो, त्याचं नवीनपण संपून तो रोजचाच होऊन बसतो, त्याच्यामुळे कामं अडायला लागतात, वाहतूक खोळंबायला लागते, अपघातांच्या बातम्या यायला लागतात, तेव्हा त्याचं कौतुक कमी व्हायला लागतं. शहरातली माणसं हळूहळू इकडे कशाला पडतोस बाबा, तिकडे शेतात जाऊन पड ना, किंवा धरणाच्या क्षेत्रात पड ना असं म्हणायला लागतात. पाऊस त्याच्या मर्जीचा राजा असल्यामुळे त्याला हवा तिथेच पडत राहतो. सारखा हवा असणारा गरम चहा, भजी, वडे यांचा रतीब मात्र सुरूच राहतो. कारण हवाच अशी असते की पोटाला काय हवं यापेक्षा मनाला काय हवं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. कुंद हवा, झणझण वारा, बाहेर न पडता घरीच थांबावं, काहीही न करता मस्त उबदार बसून राहावं आणि काहीतरी खमंगटमंग खात राहावं..पावसाळा एन्जॉय करण्याची अनेकांची हीच कल्पना असते. वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स, कुरडया-पापडय़ा, मिरगुंडं, वेगवेगळे पापड हे असे तळणीचे पदार्थ खावेत असं पावसाच्या वातावरणात सारखं वाटत राहतं. पण ते खाऊन बहुतेकदा समाधान मिळत नाहीच. उलट तेलकट खाऊन अ‍ॅसिडिटी तेवढी वाढते. साहजिकच पोटाच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ले तर शरीराला त्रास, नाही खाल्ले तर मनाला त्रास अशी परिस्थिती असते.

पावसाच्या हवेत हालचाली कमी झालेल्या असतात. त्यामुळे भूकही मंदावलेली असते. त्यामुळे नेहमीचे सोयीचे पण पचायला जड असे पदार्थ टाळून आपण काहीतरी खाल्लंय असं मनाचं समाधान होईल असे पदार्थ खाणं आवश्यक असतं. ज्वारीच्या, नाचणीच्या  किंवा तांदुळाच्या पिठाची उकड हा त्यासाठीचा एकदम उत्तम पदार्थ. करायला सोपा, सुटसुटीत. पचायला हलका. त्यासाठी तांदूळ, ज्वारी किंवा नाचणीच्या पिठाची पेस्ट करून घ्यायची. साधारण वाटीभर पिठात दोन वाटी पाणी अशी. कांदा बारीक चिरून घ्यायचा. कोिथबीर, मिरची, आवडत असेल तर आलं, कढीपत्ता, िलबू ही सगळी तयारी करून घ्यायची. एका कढईत तेल तापत ठेवायचं. ते तापलं की त्यात मोहरी, िहग घालून फोडणी करायची. ते तडतडलं की कांदा, मिरची, कढीपत्ता, वाटलेलं आलं घालायचं. हे सगळं वाफलं की चार ते पाच वाटय़ा पाणी घालायचं. मीठ घालायचं. हे पाणी उकळलं की त्यात तयार केलेली पेस्ट घालायची. वर झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण चांगलं रटरट शिजू द्यायचं. तांदळाचं किंवा ज्वारीचं पीठ असं शिजलं की पारदर्शक दिसायला लागतं. कढईत त्याला जीभ यायला लागते. म्हणजे कढईत ते लागायला लागतं. परतून पुन्हा चांगली वाफ देऊन गॅस बंद करायचा. खायला देताना कोिथबीर घालून, िलबू पिळून, वर तूप घालायचं. ज्वारीची उकड करताना काहीजण ती ताकातसुद्धा करतात. उकडीने पोट तर भरतंच. शिवाय पावसाळी हवेत खा खा झालेली असते, तीही कमी होते. या उकडीचं दुसरं रूप म्हणजे पेज. एरवीची पेज वेगळ्या पद्धतीची असते. पण पावसाळी हवेत खाण्यासाठी ही उकडच भरपूर पाणी आणि पीठ कमी या स्वरूपात केली तर ती टेस्टीही होते आणि पोटही भरतं शिवाय हे खाऊ की ते खाऊ असं होत नाही.

ज्वारीच्या लाह्यंचं पीठ दूध-गूळ-तूप घालून खाल्लं तरी पोट भरतं आणि खा-खा होत नाही. ज्यांना गोड आवडत नाही, ते हे पीठ ताकातूनसुद्धा खाऊ शकतात. रताळं नुसतं उकडून किंवा त्याचा कीस करून खाल्ला तरी पोटभरीचा होतो. शिवाय तो पचायला हलका, तेलकटपणा नसलेला असा. त्यासाठी रताळ्याची सालं काढून घ्यायची. त्यांचा कीस करायचा. तूप-जिऱ्याची फोडणी देऊन त्यात तो कीस घालायचा. चांगला परतायचा आणि झाकण ठेवायचं. तीन-चार मिनिटांची वाफ दिली की त्यात दाण्याचं कूट अंदाजे घालायचं. हवं असेल तर ओलं खोबरंही घालायचं. मीठ, लाल तिखट घालून चांगलं परतून घ्यायचं. वाफ द्यायची. कोिथबीर घालून परतायचं. किसलेली रताळी वाफायला पाच-सात मिनिटंही पुरतात. हा कीस गार-गरम कसाही चांगलाच लागतो. रताळी नसतील तर नुसते बटाटे उकडून त्याच्या फोडी करून त्यावर मीठ-तिखट भुरभुरलं, कोिथबीर घातली, िलबू पिळलं तरी पावसाळ्यातलं खाणं म्हणून खायला चांगलं लागतं.

जाड पोह्यंचे किंवा पातळ पोह्यंचे दडपे पोहे हासुद्धा पटकन करता येईल आणि खाता येईल आणि मनाला आणि पोटाला आनंद देईल असा पदार्थ आहे. त्यासाठी कांदा, कोिथबीर चिरून घ्यायची. ओला नारळ, िलबू ही सगळी तयारी करून घ्यायची. एका पसरट भांडय़ात पोहे घ्यायचे. िहग मोहरीची फोडणी करून घ्यायची. त्यात कांदा परतून घ्यायचा. किंवा तो कच्चा पोह्यात तसाच घातला तरी चालतो. हवे असतील तर फोडणीत शेंगदाणेही चांगले परतून घ्यायचे. आणि ही फोडणी पोह्यवर घालायची. पोह्यात मीठ, लाल तिखट, ओलं खोबरं, कोिथबीर घालायची. िलबू पिळायचं. हवं असेल तर फोडणीत किंवा बाहेर बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेलं गाजर, किसलेला कोबी घालून पोह्यंची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवताही येते. लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीही घालता येते. आता पोहे आणि हे घटक, फोडणी हे सगळं हाताने मिसळून घ्यायचं. जाड पोह्यांचे दडपे पोहे करायचे असतील तर थोडासा दुधाचा हात लावायचा. म्हणजे पोहे जरासे मऊ होतात. खायला देताना डिशमध्ये वर पुन्हा कोिथबीर, ओलं खोबरं घालून सजवता येतं. कर्नाटकमध्ये दडप्या पोह्यंसाठीची फोडणी तेलाएवजी लोण्यात करतात. त्यानेही वेगळी चव येते.

पावसाळी हवेत काहीतरी खायचंय, पण त्याचा त्रास तर होऊ द्यायचा नसेल तर हे पदार्थ करायला हरकत नाही.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2016 1:07 am

Web Title: food 2
Next Stories
1 काय खाल?
2 जिलबी बिघडली…
3 चाहत चहाची!
Just Now!
X