13 August 2020

News Flash

जिलबी बिघडली…

चायनीज फ्राइड राईसपासून गुरगुटय़ा मेतकूट भातापर्यंतचा हा असा कॉन्टिनेन्टल प्रवास होतो.

‘हरिच्या नैवेद्याला केली
जिलबी बिघडली..’

असं एक भोंडल्याचं प्रसिद्ध गाणं आहे. त्यातलं पीठ उरल्यावर त्याचं काय केलं, तूप उरल्यावर त्याचं काय केलं, पाकाचं काय केलं असं सगळं ती त्या गाण्यात क्रमवार सांगत जाते. भोंडल्याची गाणी म्हणजे तेव्हाच्या दबलेल्या माहेरवाशिणीसाठी एक प्रकारे व्यक्त व्हायची संधी.. आता मुलींना, स्रियांना ‘आवाज’ आहे, त्यामुळे भोंडल्याची गाणी एक प्रकारे कालबाह्य़ झाली आहेत, पण या गाण्यातली बिघडलेल्या पदार्थाचं काही तरी करून ते साजरं करायचं, काही वाया जाऊ द्यायचं नाही, ही वृत्ती मात्र तीच आहे.

अगदी खरं सांगायचं तर ही कला आहे. बिघडलेल्या पदार्थातून एखादा नवीन पदार्थ करायचा आणि खाणाऱ्याला तो बिघडलेल्या पदार्थापासून झालेला आहे याची भनकही लागू द्यायची नाही, इतका तो बेमालूम उत्तम करायचा ही कलाच आहे.

खूपदा याची सुरुवात भातापासून होते. कधी भातात पाणी कमी पडतं आणि तो टसटशीत शिजतो. मग कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी दोनचार सॉसेस घालून त्याचं रुपडे पालटून टाकलं जातं आणि तो चायनीज फ्राईड राईस होऊन तुमच्या ताटात येतो, तर कधी याच भातात पाणी जास्त होतं मग तो आणखी पाणी घालून आणखी शिजवला जातो आणि मेतकूट, तूप, लिंबू यांच्यासह आटवल भात होतो. चायनीज फ्राइड राईसपासून गुरगुटय़ा मेतकूट भातापर्यंतचा हा असा कॉन्टिनेन्टल प्रवास होतो.

अर्थात एखादा पदार्थ बिघडण्याचा संबंध तुम्ही तो बनवण्यात एक्सपर्ट आहात की नाही याच्याशी नसतो. तुमचा हातखंडा असलेला एखादा पदार्थ सगळं नीट जमूनही बिघडतो म्हणजे बिघडतोच. तुम्ही उपमा करण्यात एकदम तरबेज आहात, तुमच्या हातचा उपमा सगळ्यांना आवडतो, त्याची वाखाणणी होते. ‘उपमा खावा तर तुझ्याच हातचा’ असं कौतुकही नेहमी होतं पण एखादा दिवस असा उजाडतो की बघता बघता मऊ मोकळा उपमा न होता त्याची तिखटामिठाची खीरच होते. पाणी कमी पडलं असेल तर ते वरून घालता येतं पण जास्त पडलं तर काय करायचं. पाणी जास्त झालेला उपमा शांतपणे बाहेर झाकून किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. दुसरा पटकन होईल असा पदार्थ करायचा. दोनतीन तासांनी उपम्यातलं पाणी आळून येत. तो घट्ट होतो आणि खाता येतो. किंवा चक्क त्या उपम्यात वेगवेगळी पीठं घालायची आणि त्याचे चवीनुसार पराठे किंवा थालपीठं किंवा धपाटे करून टाकायचे.

डाळी, आमटी, रस्सा भाज्या यांच्या बाबतीत येणारा नेहमीचा अनुभव म्हणजे मीठ जास्त पडणं. अशा वेळी चक्क दुधाला, सायीला किंवा अजिबात आंबट नसलेल्या दह्य़ाला थोडं डाळीचं पीठ लावून ते त्या डाळीत किंवा भाजीत घालून उकळी दिली की खारटपणा कमी होतो. पोह्य़ांचा चिवडा खारट झाला म्हणून कुणी हात लावत नसेल तर कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, खोवलेला ओला नारळ, असं सगळं घालून त्याचे दडपे पोहे केले की चटकन संपतात.

इडलीचं पीठ चुकून पातळ झालं की त्यात आयत्या वेळी दुसरं पीठ किंवा तांदळाचा घालून काहीच उपयोग नसतो. त्या पातळ पिठाच्या इडल्याही थोडय़ा लिबलिबीत होण्याची शक्यता असते. त्यांना कोण हात लावणार असा प्रश्न असतो. अशा वेळी तशाच लिबलिबित इडल्या होऊ द्यायच्या. दोनेक तास ठेवून द्यायच्या. गॅसवर फ्रायपॅन चढवायचा. त्यात तेल घालायचं. त्यात मोठेमोठे कापलेले सिमला मिरचीचे तुकडे, कांदे, बटाटे, कांदापात, फ्लॉवर, गाजर असं सगळं मोठमोठं चिरून चांगलं परतून घ्यायचं. बटाटा चांगला शिजून द्यायचा. बाकीचे घटक अर्धेकच्चे शिजले तरी चालतात. ते बाहेर काढून ठेवायचे. मग पुन्हा तेल घालायचं.  तूप घातलं तर फारच उत्तम. इडल्यांचे सुरीने आपल्याला हव्या त्या आकाराचे तुकडे करायचे. कढईत चांगले परतून घ्यायचे. त्या आधीच्या परतलेल्या भाज्या घालायच्या. मीठ भुरभुरायचं. आणि शेंगदाणे, तीळ अशा कोरडय़ा चटण्या त्यावर चवीनुसार भुरभुरायच्या. दाक्षिणात्य पद्धतीची चटणीपूड असेल तर फारच चांगलं. कढईच्या कडेने थोडं लोणी सोडायचं. डिशमध्ये घालताना वरून सॉस पांघरायचा. इडल्यांचं काय बिघडलं होतं, कुणाला पत्ताही लागत नाही.

कधीकधी आपण सगळ्या पिठांची एकत्र धिरडी करायला घेतो आणि त्या दिवशीच नेमकं काय बिनसतं माहीत नाही, काही केल्या धिरडी उठत नाहीत. फ्राय पॅनमधून उलटताना ती त्या पॅनशी अशी काही दोस्ती करतात की उलटत तर नाहीतच, पण उलटायला गेलं की त्यांचा गोळा व्हायला लागतो. अशा वेळी आपला जीव अजिबात गोळा होऊ द्यायचा नाही. शांतपणे त्या पिठात तांदुळाचा किंवा गव्हाचा रवा घालायचा. अर्धा तास ठेवून द्यायचं. मग चक्क कुकरच्या भांडय़ाला तेलाचा हात लावून ते पीठ कूकरमधून उकडून घ्यायचं आणि गार झाल्यावर त्याच्या वडय़ा पाडून त्या फोडणीत परतून घ्यायच्या. वरून लाल तिखट, मीठ भुरभुरायचं. हवी तर कोथिंबीर पेरायची. सगळ्या वडय़ांचा चट्टामट्टा होतो.

हमखास बिघडणारा पदार्थ म्हणजे पाकातले लाडू. पाक एकतर पक्का तरी होतो किंवा कच्चा तरी. पक्का झाला तर ते लाडू खायला हातोडा घेऊन बसावं लागतं आणि कच्चा झाला तर चमचा घेऊन. पण पाक जमला तर लाडू इतके सुंदर होतात की त्या मोहापोटी पाक करायचा प्रयत्न करायचा धोका पत्करायला हरकत नाही. पाक पक्का झाला आणि त्यातच रवा मिसळला तर पुढच्या पंधरा मिनिटांतच, लाडू वळायच्या आधीच ते सगळं मिश्रण त्या पातेल्यातच कडक होऊन बसतं. मग चक्क ते गॅसवर ठेवायचं, त्याच्यावर पाण्याचे हळूवार हपके मारायचे की खालून उष्णता आणि वरून पाणी यामुळे ते थोडं थोडं सुटं व्हायला लागतं. मग ते खाली काढून ठेवायचं आणि गार झाल्यावर चक्क मिक्सरमधून काढायचं. तुपाचा हाल लावून लाडू वळून घ्यायचे.

पाक कच्चा झाला तर ते मिश्रण पातळसर होतं. त्याचे लाडू वळताच येत नाहीत. मग एक उपाय म्हणजे चक्क त्यात मिल्क पावडर मिसळायची आणि लाडू वळायचे. किंवा दुसरा उपाय म्हणजे ले पातेल तसंच झाकून ठेवायचं आणि एकदीड दिवसासाठी विसरून जायचं. या काळात ते पातेलं पंखा सुरू असतो अशा खोलीत ठेवून द्यायचं. एकदीड दिवसात रवा पाकात छान आळून येतो. लाडू पाकात मुरतात आणि  जिभेवर विरघळतात.
वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2016 1:05 am

Web Title: jilebi
Next Stories
1 चाहत चहाची!
2 बटाटेवडा
3 खमंग उपवास
Just Now!
X