नाश्त्याला गरमागरम पराठा डिशमध्ये आला, की सहसा मराठी घरातले नवरेबुवा आठवायचा प्रयत्न करायला लागतात की काल कुठली बुवा भाजी उरली होती? पराठा या अत्यंत रुचकर, पोटभरीच्या, पौष्टिक पदार्थाशी मराठी माणसाचं नातं आहे ते असं. कुरकुरीत डोसे, गुबगुबीत उत्तपे, टेस्टी पराठे आणि अगदी यम्मी पिझ्झा जरी समोर आला तरी आपलं, मराठी माणसांचं खरंखुरं जिवाभावाचं मेतकूट आहे, ते थालीपिठाशीच. त्यामुळे उत्तर भारतात कमालीचा लोकप्रिय असलेला पराठा आपल्या दृष्टीने मात्र वेळेला उपयोगी पडणारा, कशात तरी काही तरी घालून करायचा प्रकार.

अर्थात हे कशात तरी काही तरी म्हणजे कणकेत कोणत्या ना कोणत्या भाज्या घालून केलेल्या पोळ्यांचा प्रकार म्हणजे पराठे. जिला किंवा ज्याला कुणाला हा प्रकार पहिल्यांदा सुचला असेल त्याच्या कल्पकतेला तोड नाही. (हा पदार्थ एखाद्या स्त्रीला सगळ्यात आधी सुचला असेल तर त्याचं प्रेरणास्थान कोणतीही भाजी कितीही चांगली करा, तिला नावं ठेवणारे नवरे आणि ती न खाणारी मुलं हेच असणार हे नक्की) कारण त्या सुचण्यापासून पुढे पराठय़ांचे अगणित प्रकार तयार होत गेले आहेत. उत्तर भारतात तर तो सगळ्यात लोकप्रिय नाश्ता आहे. कुठल्याही गल्लीबोळापासून धाब्यांपर्यंत कुठेही गेलं तरी निदान आलू पराठा तरी मिळणारच. मैद्याचे गोळे घेऊन, ते पसरून, त्यात बटाटय़ाचं सारण भरून ते लाटलं, तव्यावर बटर वगैरे सोडून खरपूस भाजून घेतलं, की झाला गरमागरम आलू पराठा तयार. याच पद्धतीने मग वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे करता येतात. पोळ्यांपेक्षा जाडसर आणि आत भरलेल्या भाज्या हे पराठय़ांचं वैशिष्टय़. हा शब्दच मुळात तयार झालाय तो पर्त आटा या दोन शब्दांवरून. पर्त आटाचं झालं पर्ताटा आणि पर्ताटाचं हळूहळू झालं पराठा.

आपल्याकडे मराठी घरांमध्ये सहसा केले आणि खाल्ले जाणारे पराठे म्हणजे आलू पराठा आणि मेथीचा पराठा. कणकेच्या गोळ्यात खळगा करत जायचं आणि त्या खळग्यात बटाटय़ाचं सारण भरायचं. आता या सारणात तुम्ही काय काय घालता यावर तुमच्या पराठय़ाची चव ठरणार. त्यात मिरची-लसूण वाटून घातली आणि कोथिंबीर चिरून घातली, की मिरची-लसणाचा स्वाद आणि कोथिंबिरीचा स्वाद आणि रंग यांचं एक अफलातून कॉम्बिनेशन तयार होतं. त्यामुळे एरवी दोन पोळ्या आणि वाटीभर बटाटय़ाच्या भाजीत दमणारेसुद्धा तीन-चार गरमागरम आलू पराठे सहज खाऊ शकतात. खूप घरांमध्ये पोटाला सोसत नाही म्हणून हिरवी मिरची खाल्ली जात नाही. तिथे लाल तिखटाचा वापर केला जातो. त्याला काही पर्यायही नाही, पण हिरव्या मिरचीच्या चवीला तोड नाही.

आलू पराठे करण्याचा हा सर्वमान्य प्रकार; पण खूपदा तो किचकटपण ठरतो. कारण कधी कधी माणसं, बटाटय़ाचं सारण यांचं प्रमाण गडबडतं. कधी सारण कमी पडतं, तर कधी पीठ. कधी माणसंच जास्त होतात किंवा कधी कधी हे सारण सैल होतं, मग ते पिठात भरल्यावर नीट लाटता येत नाही. सगळेच अंदाज चुकतात किंवा माणसं खूप असतील तर असे पराठे करण्यात वेळही बराच जातो. त्याच्यावरचा सोपा उपाय म्हणजे बटाटे उकडल्यावर स्मॅश करून घ्यायचे आणि त्या बटाटय़ांमध्ये मिरची लसूण, मीठ, कोथिंबीर, कणीक घालून ते नेहमीच्या कणकेसारखं मळून घ्यायचं आणि त्याचे पराठे लाटायचे. कोथिंबिरीऐवजी त्यात बारीक चिरलेला पालक, मेथी किंवा मुळ्याची पानं घातली तरी वेगळी चव येते. बटाटय़ाची उरलेली सुकी भाजी, रस्सा भाजी, अगदी पावभाजी उरली असेल तर तीही मिक्सरमधून फिरवून त्यात कणीक मिसळून असा पराठा केला तर तो टेस्टी म्हणून सहज खपून जातो.

मेथीचे आणि पालकाचे पराठेही असेच नेहमी होणारे. कधी आदल्या दिवशीच्या भाज्या उरतात म्हणून, तर कधी ताज्या भाज्या वापरून हे पराठे केले जातात. हे पराठे करताना फक्त कणीक न घेता त्यात डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ अशी घरातली वेगवेगळी पिठं घातली तर पराठा टेस्टीही होतो आणि पौष्टिकही. अशा कोणत्याच भाज्या न वापरता फक्त भरपूर कोथिंबीर वापरून केलेला पराठाही तोंडाला चव आणतो.

पांढरा मुळा किसून परतून घेतला, त्याची पानं धुऊन बारीक चिरून घेतली, की मग त्यात अशीच उपलब्ध पिठं आणि मीठमसाला घातला, की हिंदी सिनेमात फेमस असलेला ‘मूली दा पराठा’ करता येतो.  तसाच कोबीचा पराठा. कोवळा, अंगापिंडाने घट्ट असा कोबी निवडून तो किसून घेऊन त्यात वेगवेगळी पिठं, मीठमसाला, कोथिंबीर मिसळली तर कोबीचा पराठा करता येतो, पण कधी कधी भाज्या आणि पिठं मिसळल्यावर ते मिश्रण सैल व्हायची शक्यता असते. म्हणून मग कोबी किसल्यावर परतून घेतलेला बरा.

असाच पण थोडा वेगळा पराठा गाजराचा. गाजरं किसून ती परतून घ्यायची. त्यात दाण्याचं कूट कोथिंबीर, मीठ, लाल तिखट वगैरे घालून त्याचं सारण करून घ्यायचं आणि ते सारण पिठात भरून त्याचे पराठे करायचे किंवा गाजरं किसून, परतून त्यात दाण्याचं कूट आणि बाकी सगळं घालून वेगवेगळी पिठं घालूनही गाजराचा पराठा करता येतो. याशिवाय लाल भोपळ्याचा, दुधीभोपळ्याचा, पनीरचा, कांद्याचा, अंडय़ांचा, पुदिन्याचा, रताळ्याचा, बिटाचा, कच्च्या पपईचा, कच्च्या केळ्यांचा, मटारचा, फ्लॉवरचा. त्याशिवाय यातल्या कशाचंही कशाहीबरोबर कॉम्बिनेशन करत पराठे करता येतात ते वेगळेच आणि त्यातल्या कशालाही चीजची जोड दिली की मिळणारा चवीचा बोनस वेगळाच.
वैशाली चिटणीस
response.lokprabha@expressindia.com, Twitter – @cvaishali