28 January 2020

News Flash

सूप पिताना…

एके काळी थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या सारांचे भुरके मारतानाही मन कसं चविष्ट होऊन जायचं.

एके काळी थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या सारांचे भुरके मारतानाही मन कसं चविष्ट होऊन जायचं. कोकमाचं सार, चिंचेचं सार, टोमॅटोचं सार, मुगाचं कढण, कुळथाचं कढण, त्यांना दिलेली कढीपत्ता, तूप, जिऱ्याची फोडणी सगळं घर दरवळून टाकायची. आता बहुतेक ठिकाणी सारांची जागा सूपने घेतली आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर सार मिळणं शक्यच नसतं. तिथे मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची सूप्स घरोघरी कधी शिरली ते कळलंही नाही. त्यामुळे आताच्या पिढीला थंडीच्या दिवसात गरमागरम सूपने जेवणाची सुरुवात करायला आवडतं.

सूप म्हटलं की जिभेला सगळ्यात आधी जाणीव होते, ती कधीही कुठेही मिळणाऱ्या अशा टोमॅटो सूपची. आख्खे टोमॅटो पाण्यात घालून ते पाणी उकळलं की गॅस बंद करायचा. पाणी गार झालं की टोमॅटो बाहेर काढून त्याची सालं काढून टाकायची. उरलेला गर मिक्सरमधून फिरवायचा. त्यात चवीला मीठ, काळी मिरी आणि किंचित साखर घालायची. हे अगदी बेसिक टोमॅटो सूप. त्याची चव वाढवायला, ते सजवायला मग आणखी किती तरी गोष्टी येतात. त्याला किंचित आल्याचा हात लावा. सव्‍‌र्ह करताना वर एक-दोन हिरवीगार तुळशीची पानं घाला. आणखी वेगळी चव हवी असेल तर टोमॅटो सूपमध्ये मिरी न घालता अगदी चवीपुरता गोडा किंवा गरम मसाला घातला की त्याची चव एकदम बदलून जाते. हॉटेलांमध्ये टोमॅटो सूपमध्ये अगदी बारीक चौकोनी आकाराचे टोस्टचे तुकडे घातलेले असतात. ते तुकडे टोमॅटो सूप शोषून घेतात, पण लगेचच्या लगेच मऊ पडत नाहीत. त्यामुळे टोमॅटो सूप पिणं आणि ते तुकडे खाणं अशी एक गंमतच तयार होते. टोमॅटो सूप सव्‍‌र्ह करताना बोलमध्ये त्याच्यावर किसलेलं चीज घातलं की मग तर त्याची चव आणि रंगरूप एकदमच बदलून जातं.

टोमॅटो सूपच्या खालोखाल आवडीने प्यायलं जाणारं सूप म्हणजे पालक सूप. पालक स्वच्छ करून, धुऊन, हलकासा वाफवून घेऊन मिक्सरमधून फिरवून घेतला की त्याची पेस्ट तयार होते. या पेस्टमध्ये योग्य प्रमाणात पाणी घालून ते मोठय़ा भांडय़ात उकळायला ठेवायचं. नुसत्या पालकाला तशी फारशी चव नसते. त्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या चवी मिसळाव्या लागतात. पण आलं लसूण लावलं तर सूप उग्र होऊन बसतं. पालक मिक्सरमधून फिरवताना हिरवी मिरची घातली तर ती कुणाकुणाला बाधूही शकते. त्यामुळे धण्याजिऱ्याची पूड, मिरी पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आणि सूप उकळून गॅस बंद केला की एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सूपला एकदम वेगळी चव येते. ती थोडी सौम्य करायची असेल तर सूप उकळत असतानाच त्यात चीज घालायचं. त्यामुळे सूपचा हिरवागार रंग कमी होतो. पण चीजमुळे ते एकदम टेस्टी होऊन जातं. पण हेच चीज जास्त पडलं तर मात्र सूपची चव एकदम नको नको होऊन जाते. पालकाच्या सूपला खमंग चव हवी असेल तर ते सूप राहणार नाही, पण होईल एकदम टेस्टी. त्यासाठी तुपात जिरे घालून फोडणी करायची. त्यात पालकाचा पल्प आणि पाणी घालून उकळायचं. किंचित हिरवी मिरची वाटून लावायची. धण्याची पूड, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एवढय़ावर हे सूपवजा सार जिभेला एकदम चव आणतं.

हॉटेलमध्ये जाणाऱ्यांना सहसा क्लिअर सूप, मानचाऊ सूप, स्वीट कॉर्न सूप अशा सूप्सची सवय असते.  त्यासोबत दिली जाणारी कुरकुरीत मैद्याची शेव, वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असा सगळा जामानिमा तिथे असतो. पण ते सगळं पोषक असतंच असं नाही. पोषक सूप प्यायचं असेल तर घरच्या घरी अनेक पर्याय असतात. नुसत्या गाजराचं सूप, गाजर-टोमॅटो सूप, गाजर-बीट सूप, फ्लॉॅवर-पालकाचं सूप, लाल भोपळ्याचं सूप अशी किती तरी प्रकारची सूप करता येतात.

यातलं लाल भोपळ्याचं सूप तर एकदम चविष्ट आणि पोषक असतं. अनेकदा पोटाला आराम द्यायचा असतो, पण त्याच वेळी पोटभरीचंही काही तरी हवं असतं. अशा वेळी लाल भोपळा उकडून घ्यायचा. त्याची साल काढून टाकायची. उरलेल्या गराची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची. त्या पेस्टमध्ये पाणी आणि दूध घालून सगळं एकत्र करून उकळायचं. मिरी पावडर घालायची. दूध घातलेलं असल्यामुळे मीठ अगदी शेवटी सूप गॅसवरून खाली उतरवल्यावर घालायचं. बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची. भोपळ्याच्या अंगभूत चवीमुळे आणि दुधामुळे या सूपला एकदम छान क्रिमी चव येते. किंचित आलं लावलं तर हे सूप आणखी टेस्टी होतं.

गाजर, बीट, फ्लॉवर या भाज्यांपासून सूप तयार करताना या भाज्यांचा उग्रपणा घालवायची गरज असते. त्यासाठी नेहमी दोन दोन भाज्या एकत्र करून सूप करावं, म्हणजे म्हणजे गाजर-टोमॅटो असं एकत्र सूप केलं तर टोमॅटोचा आंबटपणाही कमी होतो आणि गाजराचा उग्रपणाही कमी होतो. काहीजणांना या सूपला काहीसा दाटपणाही हवा असतो. कुठल्याही सूपमध्ये थोडासा फ्लॉवर घातला की सूपला दाटपणा येतो. पण त्यासाठी फ्लॉवरच्या काहीशा उग्र वासाला तोंड द्यायची तयारी ठेवावी लागते.

या सगळ्या सूपमध्ये आणखी पोषण मूल्य हवं असेल तर त्यात डाळींचा समावेश करायचा. म्हणजे गाजर-टोमॅटो सूप करायचं असेल तर त्याचा पल्प मिक्सरमधून काढताना त्यात दोन-तीन चमचे उकडून घेतलेली मुगाची डाळ घालायची. अर्थात कधी मुगाची डाळ, कधी चमचाभर उकडून घेतलेली तुरीची डाळ आणि त्याच्या जोडीला चमचाभर साय या सगळ्यामुळे सूप छान दाट आणि क्रीमी होतंच शिवाय त्याचं पोषणमूल्यही वाढतं. सूपला दाटपणा आणण्यासाठी काही जण त्यात उकडून मिक्सरमधून फिरवलेला बटाटाही घालतात. चांगली शिजवून घेतलेली दोन-तीन चमचे मुगाची डाळ मिक्सरमधून फिरवून घेऊन त्यात भरपूर पाणी घालून उकळलं, चवीला मीठ-मिरी घातली, हवं असेल तर किसलेलं गाजर किंवा बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरी छान चवीचं आणि पौष्टिक सूप तयार होतं.

अशी वेगवेगळ्या भाज्यांची पौष्टिक आणि चविष्ट सूप प्यायला मिळणार असेल तर थंडी कुणाला वाजणार आहे?
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 16, 2016 1:08 am

Web Title: soup
Next Stories
1 टम्म पुरी
2 गोडधोड
3 एक चमचा गोडाचा…
Just Now!
X