सगळीकडून वाढत्या पाऱ्याची आकडेवारी येतेय. रणरणत्या उन्हात जिवाची काहिली होत असताना कितीही थंड पाणी प्यायलं तरी समाधानच वाटत नाही. पाणी पिऊन पिऊन पोटाला त्रास व्हायला लागतो. पण तहान काही संपत नाही. शहरांमध्ये घरोघरी फ्रिजचं पाणी. उन्हाळ्यात तर अतिथंड पाणी पिऊच नका, असं डॉक्टर लोक सांगतात. त्यामुळे उन्हाळा आला की माठांचीही खरेदी होत असते. माठाच्या पाण्यात पूर्वी वाळा किंवा मोगऱ्याची फुलं घालून ठेवायचे. वाळ्याचा सुगंध आणि माठाचं थंड नव्हे, पण शीतल पाणी..

आता कुठूनही येऊन भस्कन फ्रिजमधलं थंड पाणी प्यायलं जातं. किंवा जाहिरातीत दाखवतात तसं कोल्ड्रिंक घटाघटा पितात लोक. पण पूर्वी म्हणे कुणी उन्हातून आलं की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं. त्या पाण्यातही गवताच्या काडय़ा घातलेल्या असायच्या. आधी तो गूळ तोंडात टाकायचा. तो चघळायचा. मग पाण्याचा तांब्या तोंडाला लावायचा. त्यात गवताच्या काडय़ा असायच्या. त्या निगुतीने बाजूला करत ते पाणी प्यायलं जायचं.

हे सगळं कशासाठी, तर उन्हातून आल्या आल्या लगेचच थंड पाणी पिऊ नये, यासाठी. गूळ चघळण्यात थोडा वेळ जातो, पाण्यातल्या गवताच्या काडय़ा बाजूला करण्यात थोडासा वेळ जातो, तोवर उन्हातून आलेलं माणूस थोडं निवलेलं असतं. एकदम ऊन, एकदम थंड हा बदल शरीराला त्रासदायक ठरतो. ते टाळण्यासाठी हा सगळा खटाटोप.

आता आपण असला काही विचारही करत नाही. फ्रिजमधलं थंड पाणी, कोल्ड्रिंक, विकतचं आइसक्रीम यांचा शरीरावर मारा करत राहतो. त्याने खरोखरच तहान भागते का हा मुद्दा वेगळा. पण टीव्हीवरच्या जाहिरातींचा मारा लहान मुलांना खेचून घेतो आणि मग नकळत सगळेचजण त्या भोवऱ्यात अडकत जातात.

खरं तर उन्हाळ्यासाठी आपले देशी पर्याय कितीतरी साधे, स्वस्त आणि आरोग्यदायी. पण त्यांचा मारा जाहिरातीच्या माध्यमातून होत नाही. ग्लॅमरच्या दुनियेपासून हे पर्याय लांब राहतात आणि मग ते आपोआपच बाजूला पडतात.

उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वी घरोघरी तांदळाच्या, ज्वारीच्या किंवा नाचणीच्या पिठाची आंबील केली जायची. आणि करायला तर ती चहापोक्षाही सोपी. अतिशय चविष्ट, पोटभरीची अशी आंबील दिवसातून दोनतीनदा प्यायली की उन्हाळा बाधणारच नाही. पण आता आंबील फारशी माहीतही नाही.

आंबील करण्यासाठी तांदूळ, नाचणी किंवा ज्वारीचं चार चमचे पीठ घेऊन ते पाण्यात कालवायचं आणि त्याची पेस्ट करायची. दुसरीकडे गॅसवर पातेल्यात चार भांडी पाणी घेऊन ते उकळायला ठेवायचं. त्या पाण्यात चवीपुरतं मीठ घालायचं. पाणी उकळायला लागलं की त्यात तयार करून बाजूला ठेवलेली पेस्ट घालायची. आणि हे मिश्रण चांगलं शिजू द्यायचं. साताठ मिनिटांतच ते चांगलं शिजतं.  शिजल्यावर ते झाकून बाजूला ठेवून द्यायचं. थंड झालं की त्यात ताक घालायचं आणि रवीने चांगलं घुसळायचं. हवी तर त्यात चवीला लसूण, किंवा किसलेला कांदा किंवा जिरे पूड घालायची. आवडत असेल तर चिमूटभर साखर घालायची. कोथिंबिरीची ताजी पानं बारीक चिरून घालायची. फ्रिजमध्ये ठेवून द्यायची. नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळी घरी आल्यावर किंवा रात्रीच्या जेवणात ही आंबील प्यायची. शरीराला एकदम थंडावा मिळतो. चहाकॉफी कोल्ड्रिंकपेक्षा जिभेला छान चवही मिळते. हल्ली शुगरमुळे खूपजणांना चहा-कॉफी घेता येत नाही. अशा सगळ्यांसाठी आंबील म्हणजे एकदम गर्मी मे कूल कूल एहसास. उन्हाळ्यात खूपदा भूक लागत नाही, किंवा भूक लागते, पण काही खावंसं वाटत नाही. फारसं खाल्लंही जात नाही. पोटात खूपदा कुरतडल्यासारखं एक विचित्र फीलिंग असतं. दिवसातून किमान दोनदा आंबील प्यायली तर उन्हाळ्याचा त्रास खोरखरच कमी जाणवतो.

अतिशय आकर्षक जाहिराती, ग्लॅमर या सगळ्यामुळे मंतरलेली आजची पिढी देशी पर्याय बाजूला ठेवत कोल्ड्रि्ंकचे कॅन किंवा टेट्रा पॅक तोंडाला लावत फिरते. पण कोणत्याही कोल्ड्रिंकपेक्षा निव्वळ चवीपुरतं मीठ घातलेला थंडगार ताकाचा ग्लास फक्त शरीरालाच नाही तर मनालाही थंडावा देतो. त्या ताकात कोथिंबीर किंवा पुदिना घातलेला असेल तर चवीचा स्वर्गच. कुणाकुणाकडे अजूनही हिंगाष्टक घरी केलं जातं, नियमित खाल्लं जातं. ते तर ताकाला आणि पोटाला एकदम तरतरी देतं. एरवी जराही न चालणारं किंचित आंबट ताक उन्हाळ्याच्या दिवसात मजा आणतं.  खूपदा हॉटेलमध्ये मिळणाऱ्या ताकाला आलं आणि हिरवी मिरची वाटून लावलेली असते.  ती मात्र एखाद्याला पोटासाठी त्रासदायक ठरू शकते.

उन्हाळ्याच्या देशी पर्यायांमध्ये कोणत्याही कोल्ड्रिंकच्या तोंडात मारण्याची क्षमता आहे, ती आपल्या थंडगार पन्ह्य़ामध्ये. चव, थंडावा, आरोग्यदायी गुणधर्म या सगळ्या गोष्टींमध्ये ते खरंतर कोणत्याही कोल्ड्रिंकपेक्षा सरस आहे. पन्ह्य़ात वापरले जाणारे कैरी आणि गूळ हे दोन्ही घटक आपल्याच पर्यावरणातले. शिवाय कैरी याच ऋतूमधलं फळ. म्हणजे याच ऋतूमध्ये आवर्जून खाल्लं पाहिजे असं.  पन्हं करणं मात्र आंबिलीच्या तुलनेत थोडं कौशल्याचं काम. त्यासाठी आधी चांगल्या कैऱ्या बघून आणायच्या. त्या उकडून घ्यायच्या. गार झाल्या की सोलून त्यांची साल आणि बी किंवा कोय काढून टाकायची. बी किंवा कोयीभोवतीचा गर काढून घ्यायचा. त्यामध्ये गराच्या तिप्पट गोड घालायचं. काहीजण नुसती साखर किंवा नुसता गूळ घालतात, तर काहीजण निम्मी साखर निम्मा गूळ घालतात. त्याशिवाय त्यात मीठ, वेलची पावडर, केशर घालून ते मिश्रण थोडा वेळ ठेवून द्यायचं. सगळं एकजीव झालं की पुन्हा एकदा गॅसवर ठेवून कढ द्यायचा. थंड झाल्यावर एखादी ट्रायल घेऊन आपणच प्रमाण ठरवायचं. म्हणजे एक ग्लास पन्हं करायला किती चमचे गर घालावा लागेल, ते ठरवायचं. म्हणजे चार ते पाच चमचे गर आणि एक ग्लास पाणी असं माप आपलं आपल्यालाच ठरवता येतं. काहीजण साखर- गूळ मिसळून झाल्यावर पुन्हा कढ देण्याऐवजी ते मिश्रण मिक्सरमधून काढून पूर्ण एकजीव करतात आणि मग ते गर आणि पाणी यांच्या प्रमाणानुसार मिसळतात. कैरीचा आंबटपणा गूळ-सारखेने कमी करून ते पाण्यात मिसळलं की सगळं मिळून शीतल, सुगंधी, चविष्ट पन्हं तयार होतं आणि पिणारा म्हणतो, वा.. क्या बात है…
वैशाली चिटणीस –