X

विदेशी बाटली, देशी ‘बायनरी’

ही ‘लंडन फिल्म्स’ कंपनीची निर्मिती.

गुरुवार, १ सप्टेंबर १९३८. मुंबईतील काही चित्रपटगृहांमध्ये ‘द ड्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ही ‘लंडन फिल्म्स’ कंपनीची निर्मिती. दिग्दर्शक झोल्टन कोर्डा. बहुतेक प्रमुख कलाकार ब्रिटिश होते, पण त्या चित्रपटाचे एक आकर्षण होते – साबू दस्तगीर. हे पहिले लोकप्रिय भारतीय आंतरराष्ट्रीय अभिनेते. ब्रिटनमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मुंबईतही तो गर्दी खेचत होता, पण चित्रपट पाहून परतणाऱ्या लोकांच्या मनात काही वेगळ्याच भावना उमटत होत्या, चीड आणि संतापाच्या. साधारणत: आठवडा गेला आणि त्या संतापाने पेट घेतला. त्या चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने सुरू झाली. फोर्ट भागात दंगलच उसळली. अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. आठ दिवस ते आंदोलन सुरू होते. त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली, तेव्हा कुठे ते शांत झाले.

असे काय होते त्या चित्रपटात? ‘कलोनियल इंडिया अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ एम्पायर सिनेमा’ या प्रेम चौधरी यांच्या पुस्तकात या चित्रपटावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. त्यात ते सांगतात, एकात्म भारताच्या प्रतिमेमधून मुस्लिमांना वेगळे काढण्याचे ब्रिटिशांचे धोरण मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. एडवर्ड बर्नेज हे प्रोपगंडाला अदृश्य सरकारची कार्यकारी शाखा म्हणतात. येथे तर सरकार दृश्यच होते. त्याने साम्राज्यशाहीच्या रक्षणासाठी भारतीय जनतेविरोधात प्रोपगंडायुद्ध सुरू केले होते. त्यातलेच ते एक अस्त्र होते. चित्रपटाची कथा काल्पनिक होती. वायव्य सरहद्द प्रांतानजीकचे कुठलेसे संस्थान. तेथे बंड शिजत होते. तेथील राजाशी ब्रिटिशांनी शांतता करार केला. त्यामुळे राज्यातील जनता खूप आनंदी झाली. नाचगाणे केले त्यांनी; पण त्या राजाच्या दुष्ट भावाने, गुलखान याने राजाचा खून केला. राजपुत्र अझीम (साबू दस्तगीर) याच्या हत्येचाही त्याचा डाव होता; पण दयाळू, शांतीप्रिय आणि शूर ब्रिटिशांनी राजपुत्राला वाचवले. सैतान गुल खान याचा नाश केला. यातील काळी-पांढरी ‘बायनरी’ स्पष्ट आहे. ब्रिटिशांच्या बाजूने असलेले मुस्लीम चांगले. विरोधात असलेले वाईट, क्रूर. गुलखान हा तर हिंदूंच्या मनातील मुस्लीम आक्रमकाची तंतोतंत प्रतिमाच. काफिरांची कत्तल करून, संपूर्ण जग इस्लाममय करण्याचे स्वप्न पाहणारा तो. हिंदू-मुस्लीम संघर्षांत हेच भय उगाळले जाते. ‘द ड्रम’मधून त्याच देशी ‘बायनरी’ला उद्गार देण्यात आला होता.

अशा प्रकारचा प्रोपगंडा परिणामकारक ठरतो, याचे एक कारण म्हणजे तो प्रचार नव्हे, तर वैश्विक सत्य आहे, अशी लोकांची धारणा बनलेली असते. त्याला कारणीभूत असतो तो त्यांचा महाअसत्यावरील विश्वास आणि त्या-त्या समाजात लोकप्रिय असलेले पारंपरिक समज. अशा समजांना बाह्य़ पुराव्यांची आवश्यकताच नसते. वेळप्रसंगी इतिहास खणून तसे पुरावे बनविता येतात. त्याच्या परिणामकारकतेचे आणखी एक कारण तर हिटलरनेच सांगून ठेवलेले आहे. तो म्हणतो- ‘‘बहुसंख्य राष्ट्रांचे स्वरूप आणि त्यांचे दृष्टिकोन बायकी असतात. त्यामुळे संयमी विचारबुद्धीऐवजी त्यांचे विचार आणि वर्तन यांवर राज्य करते ती भावनाशीलता.’’ लोकांच्या मनातील भावनाही फार गुंतागुंतीच्या नसतात. ते केवळ प्रेम आणि द्वेष, चांगले आणि वाईट, खरे आणि खोटे अशा ‘बायनरी’मध्येच विचार करू शकतात. त्यांच्या भावना नेहमीच टोकाच्या असतात. त्यांची तार छेडण्यासाठी चित्रपटासारखे उत्तम प्रोपगंडा माध्यम नाही. त्यासाठी फक्त ‘किस अर्थात किप इट सिंपल स्टय़ुपिड’ हे तंत्र वापरले म्हणजे झाले.

‘द ड्रम’नंतर पुढच्याच वर्षी आलेला ‘गंगादीन’ हा असाच एक प्रोपगंडा चित्रपट. रुडयार्ड किप्लिंग यांची ‘गंगादीन’ नावाची कविता आणि एक कथा यांवर बेतलेला. कॅरी ग्रँट, डग्लस फेअरबँक्स यांच्यासारखे नावाजलेले अभिनेते त्यात होते. गंगादीनची भूमिका केली होती सॅम जेफ यांनी. याचे कथानकही वायव्य सरहद्द प्रांतातच घडते. तीन ब्रिटिश सैनिक, त्यांच्यासोबत असलेला गंगादीन हा भिश्ती यांनी ठगांच्या टोळीशी दिलेला लढा अशी ती कहाणी. गंगादीन या पाणक्याचे स्वप्न एकच असते. त्याला ब्रिटिश सैनिक बनायचे असते. मोठय़ा श्रद्धेने तो ब्रिटिशांना मदत करतो. ठगांच्या लढाईत मरता-मरता आपल्या सैनिकसाहेबांचे प्राण वाचवतो. त्याच्यावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात येतात, तेव्हा पडद्यावर त्याचा आत्मा दिसतो आपल्याला- ब्रिटिशांच्या गणवेशात सॅल्यूट करीत असलेला.

भारतीयांनी ब्रिटिश सैन्यात सामील व्हावे याकरिता ब्रिटिश सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच्या काळातला हा चित्रपट. गांधींच्या काँग्रेसचा याला विरोध होता. त्याचे प्रतिबिंब या चित्रपटातही दिसते. साधारणत: एक गंगादीन सोडला तर या चित्रपटातले सगळे नेटिव्ह म्हणजे आपमतलबी, क्रूर, पाठीत खंजीर खुपसणारे असेच दिसतात. ठगांचा गुरू तर त्या सगळ्यांचा बाप. अत्यंत क्रूर षड्यंत्रकारी. त्याला या चित्रपटात वेशभूषा दिली होती महात्मा गांधींसारखी. हेतू हा, की त्यास पाहून प्रेक्षकांना गांधी आठवावेत. दोघेही सारखेच, तेव्हा त्यांचे दुर्गुणही सारखेच असे वाटावे. हे बद-नामकरणाचे प्रोपगंडा तंत्र अतिशय कौशल्याने आजही वापरले जाताना दिसते. हा चित्रपटही ब्रिटन आणि अमेरिकेत चांगला चालला; पण भारतात मात्र त्यालाही लोकरोषाचा सामना करावा लागला. बंगाल आणि बॉम्बे प्रांतात त्यावर बंदी घालण्यात आली (गंगादीनमधील काही प्रसंगांची उजळणी करणारा ‘इंडियाना जोन्स अ‍ॅण्ड द टेम्पल ऑफ डून’ हा चित्रपटही भारतात वादग्रस्त ठरला होता. पाश्चात्त्य जगतातील भारताची साचेबद्ध प्रतिमा बनविण्यात अशा चित्रपटांचा मोठा वाटा आहे.). भारतातील चित्रपट प्रोपगंडाचे अभ्यासक फिलिप वूड्स यांच्या मते, पहिल्या महायुद्धानंतरच ब्रिटन आणि भारतातील अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले होते, की भारतासाठी हे योग्य प्रोपगंडा माध्यम आहे. कारण- ‘पौर्वात्यांचा कॅमेऱ्याच्या सच्चाईवर ठाम विश्वास असतो.’ तरीही हे प्रोपगंडापट येथे वादग्रस्त ठरले. याचे कारण- त्यातील उघडानागडा प्रोपगंडा. पडद्यावरचा प्रोपगंडाही पडदानशीनच हवा. ब्रिटिश शासन अन्यायकारी आहे हे दिसत असताना, त्यांना न्यायरत्न म्हणून पेश करणे हे न पचणारेच होते. शिवाय हा असा प्रोपगंडा लोकांच्या मनावर वारंवार, सतत आदळवायचा असतो. ते त्या काळात अशक्य होते. त्यापेक्षा भित्तिचित्रे आणि पत्रके हे अधिक प्रभावी माध्यम होते.

ब्रिटिश सरकारने ते भारताविरोधात मोठय़ा प्रमाणावर वापरले. आझाद हिंद सेना जपानच्या साह्य़ाने दोस्त राष्ट्रांच्या विरोधात उभी राहिल्यानंतरचे एक पोस्टर आहे. त्यात सुभाषबाबू भारतमातेला दोरखंडाने बांधून तो दोर जपानी सेनाधिकाऱ्याच्या हाती देत आहेत, असे त्यात दाखविले होते. त्या जपानी अधिकाऱ्याच्या हातात रक्ताळलेला सुरा आहे. त्याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. जपान, जर्मनी आणि आझाद हिंद सेनेतर्फे जगभरात जेथे जेथे भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते तेथे विमानातून टाकण्यात येणाऱ्या पोस्टरांत नेताजींचे सैनिकी गणवेशातील चित्र वापरण्यात येत असे. ब्रिटिश प्रोपगंडात ते जाणीवपूर्वक टाळलेले आहे. त्यात नेताजींच्या डोक्यावर चक्क गांधीटोपी आहे. चेहऱ्यावर स्मित आहे आणि या पोस्टरवर उर्दू आणि इंग्रजीत लिहिले आहे – ‘क्विसलिंग सन ऑफ इंडिया’. क्विसलिंग हा नॉर्वेचा सैन्याधिकारी. तो नंतर नाझींना सामील झाला. थोडक्यात आपला ‘सूर्याजी पिसाळ’. (हाही एक महाअसत्य तंत्राचा नमुना. सूर्याजी गद्दार नसल्याचे आता सिद्ध झाले आहे, पण लोकमानसात त्याची हीच प्रतिमा कायम आहे.). आपला देशांतर्गत विरोधक हा शत्रुराष्ट्राचा हस्तक, असे विकृत चित्र यातून लोकांसमोर आणले जात होते. भारतमातेच्या चित्राचा वापर करून त्यात राष्ट्रवादाचाही रंग भरण्यात आला होता. दुसरीकडे याच राष्ट्रवादाचा वापर जपान आणि जर्मनीच्या भारतीय प्रोपगंडातही करण्यात येत होता. तेथे ब्रिटिश हे क्रूर, अत्याचारी, रक्तपिपासू असे दाखविण्यात येत असे. अशा एका पोस्टरमध्ये कसायासारखा चर्चिल एका भारतीय कामगाराचे हात तोडताना दाखविला आहे. चित्रात पाश्र्वभूमीला दिसतो आगीत जळत असलेला कापड कारखाना.

हे चित्रपट, ही चित्रे.. पहिल्या महायुद्धापासून आजतागायत.. दिसतात सारखीच. व्यक्तिरेखा, प्रसंग, मांडणी भिन्न असेल, परंतु त्यातील प्रोपगंडाची जातकुळी, त्यामागील तंत्रे सारखीच आहेत. त्यांचा परिणामही अगदी तसाच होताना दिसतो. आज तर तो अधिक गडद झाला आहे. याचे कारण आज प्रोपगंडा अधिक तीव्र आणि शास्त्रशुद्ध झालेला आहे. त्याचबरोबर त्याच्या साधनांनी आपल्याला वेढून टाकलेले आहे. उदाहरणार्थ दूरचित्रवाणी.

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

First Published on: November 6, 2017 2:40 am