X

गोबेल्सचे ‘आक्रमण’

हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे

हिटलरच्या प्रोपगंडाला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर पहिल्यांदा हिटलर कोणत्या मातीचा बनलेला आहे हे समजून घेणे आवश्यक होते. त्यासाठी अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक सव्र्हिसेस’ने वॉल्टर सी. लँगर या तेव्हाच्या आघाडीच्या मनोविश्लेषणतज्ज्ञाचे साह्य़ घेतले. त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने हिटलरचा मनोविश्लेषणात्मक गोपनीय अहवाल तयार केला. हिटलरचे स्वत:बद्दलचे मत, त्याच्या भूमिका, त्याच्या मित्रांचे त्याच्याविषयीचे मत असे सर्व समजून घेतल्यानंतर लँगर यांनी काही निष्कर्ष मांडले होते. त्यातला एक होता हिटलरच्या आत्महत्येच्या शक्यतेबद्दलचा.  हे सांगण्याचे कारण म्हणजे यातून या २८१ पानी अहवालाची उंची आणि दर्जा लक्षात यावा. या अहवालात एके ठिकाणी  लँगर यांनी हिटलर आणि त्याचा एक मित्र अर्न्स्ट हँफस्टँगल यांच्यातील संभाषण दिले आहे. त्यात हिटलर म्हणतो – ‘मेंदूत फार कमी जागा असते.. आणि तुम्ही ती तुमच्या घोषणांनी भरून टाकली, की मग विरोधकांना तेथे नंतर कोणतेही चित्र ठेवायला जागाच उरत नाही, कारण मेंदूचे ते अपार्टमेन्ट तुमच्या फर्निचरनेच भरून गेलेले असते.’

या घोषणा कशा हव्यात? त्या प्रोपगंडाचे स्वरूप कसे हवे? तर तो माणसाच्या मनात खोलवर असलेल्या शिकारी कुत्र्याला – येथे हिटलरने ‘श्वाइनहुंड’ म्हणजे डुकरांमागे धावणारा कुत्रा असा शब्द वापरला आहे. तर अशा प्रत्येकाच्या मनात असलेल्या कुत्र्याला – हा प्रोपगंडा भावला पाहिजे. त्यात फक्त दोनच बाजू असल्या पाहिजेत. काळी आणि पांढरी. चांगले किंवा वाईट. आता असा प्रचार करायचा, तर तो सुसंस्कृतता, सभ्यता यांपासून दूरच असणार. हरकत नाही. तो अशिष्ट वाटला तरी चालेल. तथाकथित सभ्य सुशिक्षितांनी त्याला नाके मुरडली तरी त्याची फिकीर करण्याचे कारण नाही. कारण अखेर हा प्रोपगंडा, या घोषणा, ही टीका-आरोप हे सारे सर्वसामान्यांच्या झुंडीच्या मनातील सतानाला जागृत करण्यासाठीच तर करायचे होते. त्या मनाला हे किंवा ते अशा ‘बायनरी’मध्येच विचार करता येतो. साधू आणि सतान या दोन्हींच्या मते एखादा ‘माणूस’ असू शकतो असे त्याला सांगितले, तर तो गोंधळतो. त्याच्या मेंदूला ते पचवताच येत नाही. त्यामुळे विरोधक असेल, तर तो डाकूच. त्यानेच सगळी वाट लावली. सगळी संकटे, सगळी दु:खे याला कारणीभूत तोच, असेच ओरडून आणि तेही सतत-सतत सांगायचे. हा सगळाच भावनांचा आणि श्रद्धेचा खेळ. जोसेफ गोबेल्सचे म्हणणे असे, की हाच खेळ धर्मानेही खेळलेला आहे. ऑगस्ट १९२७ मध्ये नाझींच्या एका मेळाव्यात बोलताना तो म्हणाला होता, ‘कोणतीही तात्त्विक चळवळ कशी उभी राहते, तर ती ज्ञानाच्या नाही तर श्रद्धेच्या जोरावर.’ याच संदर्भात त्याने एके ठिकाणी लिहिले होते – ‘आपल्या पहाडावरील प्रवचनांत येशूने कुठेही पुरावे दिलेले नाहीत. त्यात त्याने फक्त दावे केलेत. स्वयंसिद्ध सत्ये पुराव्याने शाबीत करण्याची आवश्यकता नसते.’ नाझींच्या माध्यमी प्रचाराचा पाया होता तो हाच. विवेक, तर्क, बुद्धिनिष्ठता हे सारे पदभ्रष्ट करायचे. ‘इंटेलेक्चुअल’, विचारवंत असे शब्द तर शिवीसारखेच वापरायचे. आणि उत्सव साजरा करायचा तो केवळ भावनांचा. विचाराऐवजी ‘वाटणे’ हे महत्त्वाचे. याच तत्त्वावर नाझींची वृत्तपत्रे काम करीत होती. त्यात आघाडीवर होती ‘डेर अँग्रीफ’, ‘फोकशुओ बोबाख्तर’ आणि ‘डेर स्टुर्मर’ ही नाझींची मुखपत्रे. वस्तुत: नाझी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रोपगंडा मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वच वृत्तपत्रांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला लावली. जे पत्रकार, प्रकाशक झुकले नाहीत, त्यांना देशोधडीला लावले. बाकीच्या अनेक वृत्तपत्रांची, मासिकांची मालकमंडळी बदलली; परंतु ते जाहीर केले नाही. वर्तमानपत्रांची नावे तीच राहिली. त्यामुळे वाचकांना या बदलांची जाणीवच झाली नाही. ही सर्व वृत्तपत्रे आता सरकारला आवडेल तेच आणि गोबेल्स सांगेल तेच छापू लागली. यातील ‘डेर अँग्रीफ’ (आक्रमण) हे तर गोबेल्सचेच बाळ होते.

बद-नामीकरण

पीटर लाँगेरीच यांचे ‘गोबेल्स’ हे त्याचे अधिकृत चरित्र मानले जाते. त्यात या वृत्तपत्राबद्दल ते लिहितात, अधम असभ्य ज्यूविरोध हे त्याचे एक वैशिष्टय़ होते. त्याचे एक उदाहरण त्यांनी दिले आहे. मॅक्समिलन हार्डेन हे एक डावे उदारमतवादी गृहस्थ. जन्माने ज्यू. ते वारल्यानंतर ‘डेर अँग्रीफ’ने लिहिले होते, ‘फुप्फुसाच्या दहनाने त्यांचा वध केला. त्यांच्या निधनाने जगातील एक सर्वात नीच, अत्यंत पाजी गृहस्थ आपल्यातून निघून गेला आहे.’ आपल्या विरोधकांचे राक्षसीकरण करायचे, त्यांचे चारित्र्यहनन करायचे हे प्रोपगंडातील डेमनायझेशन तंत्र. त्याचा गोबेल्सने सातत्याने वापर केला. लाँगेरीच यांनी त्याचे आणखी एक उदाहरण दिले आहे. प्रतिमाहननाचा प्रोपगंडा पाहण्यासाठी ते समजून घेतले पाहिजे. मार्च १९२७ मध्ये वायमार सरकारने बर्लिनचे पोलीस उपायुक्त म्हणून डॉ. बर्नहार्ड वेस यांची नियुक्ती केली. ते जन्माने ज्यू. व्यवसायाने वकील. डाव्या आणि उजव्या कट्टरतावादाचे ठाम विरोधक आणि संसदीय लोकशाहीचे कट्टर पुरस्कत्रे. नाझींच्या कारवाया खपवून न घेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. त्यामुळे ते गोबेल्सच्या तिरस्काराचे लक्ष्य बनणे स्वाभाविकच होते. गोबेल्सने आपल्या वृत्तपत्रातून त्यांच्याविरुद्ध आघाडीच उघडली. वेस यांचा उल्लेख ते सतत ‘इसिडोर वेस’ या नावाने करू लागले. हे ज्यूंमधील एक लोकप्रिय नाव. त्याचा सतत वापर करून गोबेल्सने वाचकांच्या मनात अशी प्रतिमा निर्माण केली, की वेस यांना त्यांचे जर्मन बर्नहार्ड हे नाव वापरण्याची लाज वाटते. तेव्हा त्यांनी ज्यू नाव स्वीकारले आहे. नाझींनी ज्यूंचे एक एकसाची चित्र रंगविले होते. सहाच्या आकडय़ासारखे दिसणारे नाक. वाकलेला कणा. डोळ्यांत क्रूर, लोभी असे भाव. वेस यांच्या व्यंगचित्रांतूनही त्यांची अशीच ठोकळेबाज प्रतिमा समोर आणण्यात येत होती. वायमार प्रजासत्ताक हे कसे ज्यूंचा अनुनय करते, त्यावर ज्यूंचेच कसे नियंत्रण आहे हे सतत ‘आर्य’वंशीय नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा गोबेल्सचा प्रयत्न असे. बर्लिनच्या पोलीस अधिकाऱ्याच्या अशा व्यंगचित्रातून तो हे साधत होता. हा प्रोपगंडा पुढे इतका टोकाला गेला, की इसिडोर वेस हे सर्वनामच बनले. गोबेल्सने वेस यांची बदनामी करण्यासाठी एक पुस्तकही लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते, की ‘इसिडोर ही कायदेशीर अर्थाने कोणी व्यक्ती नाही. तो एक प्रकार आहे, ती मानसिकता आहे, चेहरा आहे, थोबाडे (फिझोग) आहेत.’

आता अशा प्रकारच्या प्रोपगंडाला विरोध कसा करायचा? डॉ. वेस हे त्याविरोधात अगदी न्यायालयात गेले. त्यावर ‘डेर अँग्रीफ’च्या अग्रलेखातून गोबेल्सने सवाल केला, की ‘आमच्यावर कारवाई करण्यासाठी वेस एवढे आतुरले का आहेत? इसिडोर हे ज्यूंचे एक नाव आहे म्हणून? याचा अर्थ असा समजायचा का, की ज्यू असणे ही काही तरी हीन बाब आहे?’ हा सगळा नेम कॉलिंगचा – बद-नामकरणाचा – एक प्रकार होता. त्याचबरोबर यातून गोबेल्स ज्यूविरोधाला एक चेहरा देत होता. एखाद्या व्यक्तीचे नाव हे भ्रष्टाचाराचे, अविश्वासार्हतेचे, मूर्खतेचे प्रतीक बनविले जाते, त्यातलाच हा प्रकार. तेव्हा प्रश्न असतो, तो वस्तुस्थिती समजून घेण्याचा; परंतु गोबेल्सच्या प्रोपगंडाचे एक तत्त्व होते. तो म्हणायचा, ‘निरपेक्ष वस्तुनिष्ठता’ असा काही प्रकार नसतोच. त्यामुळेच नेहमीच नाझींचा प्रयत्न असा असतो, की वस्तुनिष्ठ माहितीचे पर्यायी स्रोत पहिल्यांदा नष्ट करायचे किंवा त्यांचे बद-नामकरण करायचे.

हिटलर लोकांच्या मनातील शिकारी कुत्र्याचा विचार करतो. विचारांपेक्षा भावनांना आवाहन करणे महत्त्वाचे असे सांगतो. गोबेल्स संपूर्ण वस्तुनिष्ठता नसते असे सांगतो. हा सर्व विचार, आज राज्यशास्त्रात लोकप्रिय असलेल्या सत्योत्तरी सत्याचा – पोस्टट्रथचा – आहे हे लक्षात घेतले म्हणजे आजचे जग आणि तिशीतली जर्मनी यांत आपल्याला साम्य का दिसते हे समजते. सत्त्योत्तरी सत्य हा नाझींच्या प्रोपगंडाचा एक मुख्य भाग होता. परंतु हा सर्व प्रोपगंडा ‘नकारात्मक’च होता का? आपली ‘कौम’ सातत्याने धोक्यात आहे ती ज्यूंमुळे, ज्यूंनी राष्ट्राला दुबळे बनविले, आर्य रक्त हे शुद्ध. त्यात भेसळ करण्याचा प्रयत्न ज्यू करतात. ते चोर, लुटारू, क्रूर.. हे वारंवार सांगणे हा झाला नाझी प्रचाराचा एक भाग. त्यातून त्यांनी जर्मन नागरिकांची मने द्वेष, तिरस्काराने बधिर करून टाकली; परंतु हिटलरचे दैवतीकरण करण्याचा उद्योगही नाझी प्रोपगंडाने केला आहे. ‘हॅलो बायस’ हे त्यातील एक महत्त्वाचे तंत्र होते..

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

First Published on: September 18, 2017 3:00 am