02 March 2021

News Flash

केळी, बंड आणि प्रोपगंडाभूल..

आज युरोप-अमेरिकेत चिक्विटा ब्रॅण्डचा गोल निळा-पिवळा स्टिकर चिकटलेली केळी हल्ली सर्रास दिसतात.

ग्वाटेमालातील सीआयएच्या कटावर आधारलेल्या ‘ग्लोरिओसा व्हिक्टोरिया’ या दिएगो रिव्हिएरा यांच्या चित्रातील एक भाग.

 

 

शीतयुद्ध चरमसीमेवर असल्याचा तो काळ. ग्वाटेमालात कामगार, शेतकरी यांच्या हिताची धोरणे राबविली जात होती. उद्योजक-व्यावसायिकांना चाप लावला जात होता. पुन्हा सरकारमध्ये एक घटक पक्ष कम्युनिस्ट हाही होता. हे सारे एकत्र केले, की त्यातून साम्यवादच दिसत होता; पण ते खरे नव्हते..

‘बनाना रिपब्लिक’ हा शब्द आपल्या नेहमीच्या ऐकण्यातला. जेथे लोकशाही नावापुरतीच असते. जेथे नांदत असते अधिकारशाही. भ्रष्ट, स्वार्थी आणि विकाऊ. तो देश म्हणजे बनाना रिपब्लिक. आता प्रश्न असा पडतो, की केळीचा आणि प्रजासत्ताकाचा नेमका संबंध काय? तो समजून घ्यायचा असेल तर मध्य अमेरिकेतील देशांकडे पाहावे लागेल. त्यातही खास करून ग्वाटेमालाकडे. अमेरिकेचा नकाशा समोर धरलात, तर त्या खाली हत्तीच्या सोंडेसारखा भाग दिसतो. तो मेक्सिको आणि त्याला खेटूनच खालच्या बाजूला येतो तो ग्वाटेमाला. एके काळची ही स्पॅनिश वसाहत. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १०० वर्षे आधी स्वतंत्र झाला हा देश; पण साम्राज्यवाद्यांनी विकून खाल्लेल्या गरीब, भरपूर लोकसंख्येच्या, शेतीप्रधान अविकसित देशांना क्वचितच स्वातंत्र्य पचवता येते. देश उभा राहता राहता मोडून पडतो. हुकूमशाहीला पोषकच असते ते. ग्वाटेमालाचेही हेच झाले. स्वातंत्र्यानंतर पहिली शंभर वर्षे एकामागून एक हुकूमशाहा पाहिलेल्या या देशात प्रथमच मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली ती १९४४ साली. १९५१ला तेथे कर्नल हाकोवो आर्बेझ गुझमन हे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. ते उदारमतवादी. अनेक सुधारणा राबविल्या त्यांनी. त्यातील एक महत्त्वाची होती ती म्हणजे ‘कसेल त्याची जमीन’. आपले सामाजिक स्थान, पैसा आणि सत्तेचा पाठिंबा या जोरावर जमीनदार बनलेल्यांना हे सहन होणे कठीणच.. येथून पुढे सुरू होते ती ग्वाटेमालातील बंडाची कहाणी. खरे तर ती प्रोपगंडाचीच कहाणी. या गोष्टीतले एक महत्त्वाचे पात्र होते युनायटेड फ्कूट कंपनी आणि सूत्रधार होते एडवर्ड बर्नेज आणि मंडळी.

आज युरोप-अमेरिकेत चिक्विटा ब्रॅण्डचा गोल निळा-पिवळा स्टिकर चिकटलेली केळी हल्ली सर्रास दिसतात. युनायटेड फ्कूट हा या चिक्विटा कंपनीचा पूर्वावतार. तिचा प्रारंभ झाला १८७० मध्ये. लोरेंझो डो बेकर हा एका जहाजाचा कप्तान. जमैकात तो छान दारू पीत बसला असताना त्याला एक स्थानिक केळीविक्या भेटला. त्याच्याकडून याने कच्च्या केळीचे १६० लोंगर घेतले, २५ सेंटला एक याप्रमाणे आणि ते न्यूयॉर्कमध्ये विकले सव्वा तीन डॉलरला एक याप्रमाणे. सौदा चांगलाच फायद्याचा होता. त्याने मग तो व्यापारच सुरू केला. पुढच्या १५ वर्षांत त्याच्या कंपनीची ११ जहाजे अमेरिकेत वर्षांला एक कोटी लोंगर आणू लागली. ही युनायटेड फ्कूट कंपनी. साठच्या दशकापर्यंत या कंपनीचे रूपांतर एका सामथ्र्यवान बहुराष्ट्रीय कंपनीत झाले होते. तेथील अनेक देशांचे अर्थकारणच नव्हे, तर राजकारण आणि समाजकारणही या कंपनीच्या दावणीला बांधलेले होते. इतके, की लॅटिन अमेरिकेत तिला एक पल्पो म्हणत. म्हणजे ऑक्टोपस. ग्वाटेमालातील सुमारे ४२ टक्के जमीन या कंपनीच्या ताब्यात होती. तेथे केळीची लागवड केली जाई. त्यासाठी आयते स्थानिक मजूर असतच. ते कंपनीचेच गुलाम. केळी बंदरापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीची सोय हवी. त्यासाठी रेल्वेमार्ग उभारण्यात आले. ते कंपनीच्या मालकीचे. बंदरे कंपनीची. जहाजसेवा कंपनीची. ग्वाटेमालातील राजकारणी या कंपनीच्याच खिशात. त्यांचे कंपनीला खुले आवतण असे – ‘मेक इन ग्वाटेमाला’. आपल्या देशाचा ‘विकास’ करण्यासाठी त्यांनी या कंपनीला करमाफी दिली. जमिनीचा प्रश्नच नव्हता. तिच्यावर कधीच सामान्य शेतकऱ्यांचा हक्क नव्हता. यूएफसीला स्वस्तात जमीन देण्यात आली. ती किती, तर सुमारे ३० लाख एकर आणि भाव एका एकराला दीड डॉलर. त्यातील अवघ्या एक लाख ३८ हजार एकरावर केळीच्या बागा. बाकीची जमीन तशीच पडून. यातून कंपनीला प्रचंड फायदा होत होता आणि ग्वाटेमालाला? कॉफी आणि केळी हे त्याच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ, पण त्यावर कब्जा विदेशी कंपन्यांचा. त्यांचा दर ठरविण्याचा अधिकारही सरकारला नव्हता. विकासाच्या नावाखाली देशाची लूट सुरू होती आणि त्यात हुकूमशाही सरकारेही सामील होती. केळीच्या बागांपायी सुरू झालेल्या या भ्रष्टाचारातून देश ‘बनाना रिपब्लिक’ बनला होता.

अशा परिस्थितीत अर्बेझ सत्तेवर आले. त्यांनी शेती सुधारणा कायदा केला. त्याअंतर्गत मार्च १९५३ पर्यंत कंपनीकडून दोन लाख १० हजार एकर पडीक जमीन काढून घेऊन सुमारे एक लाख गरीब शेतकऱ्यांना वाटली. त्याची भरपाईही दिली त्यांनी, पण ती कंपनीने दिलेल्या दराच्या प्रमाणात. कंपनीची मागणी होती एकरी ७५ डॉलरची. कंपनीचे यात मोठेच नुकसान झाले. शिवाय ग्वाटेमाला सरकारने कामगार कायदे केले. त्यांना संपाचा अधिकार दिला. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे देशातील महत्त्वाचे उद्योग, वीजनिर्मिती हेही खासगी अमेरिकी कंपन्यांच्या ताब्यात गेले होते. त्याला सरकारी स्पर्धा निर्माण करण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले. हे सारे अमेरिकेच्या आणि विशेषत: यूएफसीच्या हितसंबंधांच्या विरोधात होते. ते वाचविणे आवश्यक होते.

खरे तर बर्नेज यांनी हे असे होणार हे आधीच या कंपनीच्या लक्षात आणून दिले होते. या कंपनीचे जनसंपर्काचे काम बर्नेज यांच्याकडे होते. त्यानिमित्ताने ते १९४७ मध्ये ग्वाटेमालात महिनाभर राहून आले होते. तेथे त्यांनी जे पाहिले, त्यावरून त्यांनी कंपनीला सावधगिरीचा इशारा देणारा अहवालही सादर केला होता. कंपनीचे ‘गुडविल’ खराब आहे.. ग्वाटेमालात बदल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.. इराण सरकारने ब्रिटिशांकडील तेलविहिरींचे राष्ट्रीयीकरण केले होते. ही वाईट प्रथा पडली आहे. याचे परिणाम अन्यत्रही होऊ  शकतात, या त्यांच्या इशाऱ्याकडे तेव्हा कंपनीने दुर्लक्ष केले. आता मात्र काही तरी करणे आवश्यक होते. बर्नेज यांनी ते काम हातात घेतले.

जमीनजप्तीविरोधात रान पेटवणे हा त्यांच्या योजनेचा पहिला भाग होता. त्यासाठी त्यांनी कंपनीला एक योजना सुचविली. तिचे लक्ष्य होते अमेरिकी नागरिक. पहिल्यांदा या जप्तीविरोधात लॅटिन अमेरिकेतील काही वरिष्ठ अधिकारीच बोलतील असे करायचे. प्रतिष्ठित विद्यापीठांतून या धोरणांबाबत परिसंवाद आयोजित करायचे. या आव्हानाचा मुकाबला कसा करायचा याची दिशा त्यातून ठरवायची. यानंतर अमेरिकी सरकारने यावर भूमिका घ्यावी यासाठी वृत्तपत्रांतून लेखांचा मारा करायचा. वेगवेगळ्या पत्रांतून वेगवेगळे लेख. विषय मात्र एकच. ग्वाटेमालातील समस्या. काही लेख त्या-त्या पत्रातील पत्रकारांनी लिहायचे. त्यासाठी त्यांना माहिती पुरवायची. काही लेख कंपनीनेच लिहून घ्यायचे. हळूहळू ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘न्यू यॉर्क हेराल्ड ट्रिब्यून’, ‘टाइम’, ‘न्यूजवीक’ अशा प्रतिष्ठित पत्रांतून ग्वाटेमालावर लेख येऊ  लागले. या सर्व लेखांचा सूर एकच होता. तो म्हणजे ग्वाटेमालात साम्यवादांचा वाढता प्रभाव.

शीतयुद्ध चरमसीमेवर असल्याचा तो काळ. साम्यवाद हा भांडवलशहांचा, जमीनदारांचा शत्रू क्रमांक एक. प्रस्थापित आर्थिक व्यवस्थेला सामान्यांच्या हिताकरिता जराही धक्का लावणे म्हणजे साम्यवाद हे समीकरण तोवर रूढ करण्यात आले होते. बर्नेज यांनी याच द्वेषभावनेचा वापर ग्वाटेमालाच्या संदर्भात केला. तेथील सुधारणावादी धोरणे म्हणजे साम्यवादाची चाहूल असे वातावरण त्यांनी निर्माण केले. ते खोटे होते का? ग्वाटेमालात कामगार, शेतकरी यांच्या हिताची धोरणे राबविली जात होती. उद्योजक-व्यावसायिकांना चाप लावला जात होता. पुन्हा सरकारमध्ये एक घटक पक्ष कम्युनिस्ट हाही होता. हे सारे एकत्र केले, की त्यातून साम्यवादच दिसत होता; पण ते खरे नव्हते. अर्बेझ हे साम्यवादी नव्हते. ते धोरणे राबवीत होते ते त्यांच्या आधीच्या सरकारची आणि ते सरकार तर चक्क ‘आध्यात्मिक समाजवादा’वर विश्वास ठेवणारे होते. असे सगळे असूनही अमेरिकेतील बडय़ा बडय़ा पत्रकारांना मात्र ग्वाटेमालातील साम्यवादाचा वाढता प्रभावच स्पष्ट दिसत होता. १९५० मध्ये ‘न्यू यॉर्क हेराल्ड ट्रिब्यून’चा एक बातमीदार ग्वाटेमालात जाऊन आला होता. नंतर त्याने लिहिलेल्या लेखाचा मथळा होता – ‘कम्युनिझम इन द कॅरेबियन’. ‘न्यू यॉर्क टाइम्स’नेही आपला बातमीदार तेथे पाठविला होता. त्याचे वृत्तान्तही असेच होते. ते बनावट कहाण्या तर सांगत नव्हते; पण वस्तुस्थितीही सांगत नव्हते. मग हे जे छापून येत होते, ते नेमके काय होते? ती प्रोपगंडाभूल होती.

बर्नेज यांनी कोणती तंत्रे वापरून पत्रकारांनाही ती भूल घातली, सामान्य जनतेला बनवले आणि अमेरिकी अध्यक्षांना, सीआयएला ग्वाटेमालातील राजवट उलथवून लावण्यास प्रोत्साहित केले हे आपण पुढच्या भागात पाहू. आजच्या प्रोपगंडासंपृक्त पर्यावरणात ते समजून घेणे फारच महत्त्वाचे आहे..

ravi.amale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2017 12:39 am

Web Title: banana republic america political issue history of banana republic
Next Stories
1 ‘पीआर’चे पर्व..
2 मनांची मशागत
3 ‘किस’ – एक तंत्र!
Just Now!
X