‘स्टार वॉर्स’ हा चित्रपट पाहिलात? त्याच्या नंतर एवढय़ा आवृत्त्या आल्या की या पहिल्या भागाचे वेगळे नामकरण करावे लागले – ‘स्टार वॉर्स – एपिसोड फोर, ए न्यू होप’ – म्हणून. १९७७ सालच्या त्या चित्रपटातील शेवटचा भाग ओळखला जातो तो ‘थ्रोनरूम सीन’ – दरबार प्रसंग – म्हणून. गॅलॅक्टिक एम्पायरचा सैन्याधिकारी डार्थ वाडेर याच्याशी चाललेले युद्ध संपलेले आहे. बंडखोरांची आघाडी जिंकलेली आहे. आता प्रसंग आहे या युद्धवीरांच्या सत्काराचा. त्यांना दरबारात पाचारण केले जाते. आपल्याला दिसते ते दरबाराचे भलेमोठे पोलादी प्रवेशद्वार. ते उघडते आणि आपले नायक ल्यूक स्कायवॉकर, हान सोलो आणि हानचा मर्कटमानवासारखा दिसणारा साथीदार चेवी प्रवेश करतात. कॅमेरा वळून त्यांच्या पाठीमागे येतो आणि पडद्यावर दिसतो दरबाराचा भव्यपणा. दोन्ही बाजूला दगडी शिळांनी बांधलेल्या तिरप्या भिंती. समोर आकाशी निळी भव्य भिंत. तेथेच एक मोठा मंच आणि त्यामागे उंच आकाशात जाणारे प्रकाशाचे पाच खांब. मंचावर प्रिन्सेस लेईया आणि तिचे दरबारी. बाजूला शिस्तीत सैन्याच्या तुकडय़ा उभ्या. मध्ये प्रशस्त जागा. तेथून हे तिघे दूरवरच्या मंचाकडे जात आहेत..

‘स्टार वॉर्स’चे दिग्दर्शक जॉर्ज ल्युकास यांनी हा प्रसंग चितारताना कोणतीही कसर ठेवली नव्हती. तो पाहून प्रेक्षकांच्या मनावर त्या भव्यतेचे दडपणच येणार. दुसरा पर्यायच नाही. ल्युकास हे प्रतिभावंत दिग्दर्शक. पण हा प्रसंग त्यांचा नव्हता. ती नक्कल होती ‘ट्रायम्फ डे विलेन्स’मधील एका प्रसंगाची. –

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

न्यूरेम्बर्ग मेळाव्याचा तो चौथा दिवस. पडद्यावर दिसते ती स्वस्तिकावर विराजमान झालेल्या भव्य गरुडाची प्रतिमा. नाझी प्रतिमांत गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे. ते सामर्थ्यांचे प्रतीक. ते चित्र विरत जाते आणि त्यातून आपल्यासमोर प्रकटते भव्य मैदान. त्यात उभ्या आहेत सैनिकांच्या पलटणीच्या पलटणी. विमानातून उंचावरून खाली शेतांचे तुकडे दिसतात त्यासारख्या त्या तुकडय़ा. मध्ये भलामोठा रस्ता ठेवलेला आहे आणि त्यातून फक्त तिघे जण चाललेले आहेत. पाठमोरे. हिटलर, हिमलर आणि व्हिक्टर ल्युट्झ. कॅमेऱ्याने उंचावरून टिपलेला तो प्रसंग. त्यातील भव्यता अशी अंगावरच येते. हळूहळू कॅमेरा मैदानाच्या एका बाजूस येतो. हा ट्रॉली शॉट. फिरता फिरता कॅमेरा टिपतो ती मैदानाची भव्यता. दूरवर चार-पाच मजली इमारतीप्रमाणे उभे केलेले तीन पडदे आहेत. त्यांवर मध्यभागी स्वस्तिक चितारलेले आहे. आता हिटलर त्याच्या साथीदारांसह काही पायऱ्या चढून वर येतो. थांबतो. समोर दुसऱ्या महायुद्धात बळी पडलेल्या जर्मन सैनिकांच्या स्मरणार्थ एक भलेमोठे पुष्पचक्र ठेवलेले आहे. मागे सहासात फुटी भल्यामोठय़ा खांबावर, ऑलिम्पिक ज्योतीसारख्या पाच-सहा ज्योती तेवत आहेत. हिटलर त्या मृत सैनिकांना नाझी सलामी देतो. संगीत आता पूर्ण थांबलेले आहे. काही क्षणांनी तो वळतो. लष्करी बँड पुन्हा वाजू लागतो. तो पायऱ्या उतरून पुन्हा त्या पलटणींमधून दूरवरच्या मुख्य मंचाकडे निघतो..

या माहितीपटातील हा सर्वात प्रभावशाली प्रसंग मानला जातो. म्हणून तर ल्युकास यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही त्याची नक्कल करण्याचा मोह आवरला नाही. अशा सर्व प्रसंगातून दिग्दर्शक लेनी रेफेन्स्थाल हिने हिटलरला मर्त्य मानवांतून वेगळे काढले. एक भव्य प्रतिमा तयार केली त्याची. इंडियाना विद्यापीठाने त्यांच्या फिल्मगाइड मालिकेंतर्गत रिचर्ड मेरान बार्सम यांची ‘फिल्मगाइड टू ट्रम्फ ऑफ द विल्स’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात बार्सम या प्रसंगासंदर्भात म्हणतात, या चित्रपटात ‘प्रारंभी हिटलर येतो तो जणू मेघांमधून. आता तो त्याच्या लोकांमधून फिरतो आहे, जणू काही तो देवच आहे. रेफेन्स्थालने येथे दैवतीकरण केले आहे – आणि त्याच्या उलटही केले आहे. म्हणजे हिटलर त्याच्या लोकांमध्ये आला आहे तो जणू त्यांच्या विश्वासाचे मूर्त स्वरूप बनून.’ सत्तेवर आल्यानंतर न्यूरेम्बर्गला येण्याची ही त्याची दुसरी वेळ..   ख्रिस्ताच्या ‘सेकंड कमिंग’सारखी.. या मेळाव्यात तो उंच मंचावरून भाषण देतो. ख्रिस्ताच्या टेकडीवरील प्रवचनांप्रमाणे.

हा माहितीपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे समजत होते का? त्यांच्या दृष्टीने ते एक छानसा कलात्मक माहितीपट पाहात होते. त्यातील घटना खऱ्या होत्या. पण त्यांच्या मांडणीतून होणारा परिणाम हा वेगळाच होता. तो प्रेक्षकांच्या जाणिवेसाठी नव्हता. त्याचे लक्ष नेणीव हे होते. जर्मन नागरिकांच्या मनातील पारंपरिक कल्पना, सांस्कृतिक प्रतिमा यांना झंकारण्याचा छुपा प्रयत्न त्यात होता. ‘जड सीस’ हे त्याचे एक वेगळे उदाहरण. ‘ट्रायम्फ डे विलेन्स’ने हिटलरला अमानवत्व बहाल केले. ‘जड सीस’ने ज्यूंना पाशवी पातळीवर आणून ठेवले. या चित्रपटाला पाश्र्वभूमी होती ‘क्रिस्टलनाख्त’ची – ‘खळ्ळखटॅकच्या, फुटलेल्या काचांच्या रात्री’ची. नाझी पक्षाच्या एसए या निमलष्करी दलाने ९ आणि १० नोव्हेंबर १९३८ रोजी संपूर्ण जर्मनीत ज्यूविरोधी दंगल घडवून आणली होती. दिसतील तेथे ज्यूंना मारहाण करण्यात येत होती. शेकडोंची हत्या करण्यात आली होती. त्यांची प्रार्थनाघरे, घरे, दुकाने लुटण्यात येत होती. बर्लिनच्या रस्त्यांवर त्या दुकानांच्या काचांचा खच पडला होता. पण या दंगलीचा परिणाम उलटाच झाला. माध्यमांनी त्यावर टीकेची झोड उठवली. अर्थ स्पष्ट होता. हिटलरला हवे होते तेवढे द्वेषाचे जंतू अजून वातावरणात पसरलेले नव्हते. त्यामुळे हिटलर गोबेल्सवर नाराज झाला. तेव्हा त्याने ज्यूविरोधी प्रोपगंडा अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. ‘जड सीस’ त्याच प्रोपगंडाचा भाग होता. अल्डस हक्स्ले यांचे एक सुप्रसिद्ध विधान आहे, की प्रोपगंडाकारांचे काम काय असते, तर एका गटाच्या लोकांना हे विसरायला लावायचे, की दुसऱ्या गटातील लोक हीसुद्धा माणसेच आहेत. ‘जड सीस’च्या कथानकातून अतिशय पद्धतशीरपणे ते साधण्यात आले होते. महाअसत्य, राक्षसीकरण, बद-नामकरण अशी प्रोपगंडाची सर्व तंत्रे त्यात वापरण्यात आली होती.

हा चित्रपट त्याच नावाच्या एका ऐतिहासिक कादंबरीवरून बेतलेला आहे. ही कादंबरी लिऑन फॉस्टवँगर या ज्यू लेखकाची. जोसेफ सीस ओपनहायमर हा अठराव्या शतकातला दरबारी ज्यू हा तिचा नायक. त्याच्या आयुष्याची शोकांतिका त्यात मांडलेली. त्यावर ब्रिटनमध्ये ज्यू सीस नामक चित्रपटही निघाला होता. तो गोबेल्सने पाहिला आणि त्याच्या लक्षात आले, की या इतिहासाचे पुनर्लेखन केले की तीच कथा ज्यूंच्या राक्षसी, लोभी आणि देशद्रोहीवृत्तीची निदर्शक म्हणून दाखविता येऊ  शकेल. त्याने या नायकाला खलनायक बनविले. ज्यू हे अस्वच्छ, क्रूर, राष्ट्रद्रोही. पैशासाठी काहीही करणारे. त्यांचे नाक इंग्रजी सहाच्या आकडय़ासारखे. ही प्रतिमा गडदपणे रंगविण्यात आली. २४ सप्टेंबर १९४० रोजी बर्लिनमधील ८० चित्रपटगृहांतून तो एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला. पुढच्या तीन वर्षांत हा चित्रपट किमान दोन कोटी लोकांनी पाहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांना तो आवडला. याचे कारण तो त्यांच्या मनातील प्रतिमांनाच दृढ करीत होता. त्यांच्या भावनांशी खेळत होता. हिटलरच्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या मनात असलेल्या ‘श्वईनहुंड’ला – शिकारी कुत्र्याला – चुचकारत होता. त्यामुळे ज्यू हीसुद्धा माणसेच आहेत, ही भावनाच बोथट झाली. उलट ज्यूंविषयीचे तिरस्कारयुक्त भय त्यांच्या मनात निर्माण झाले. तसे अनेक जर्मनांचे ज्यूंशी चांगले संबंध होते. पण त्यांच्याही मनात संशयाचे जंतू निर्माण करण्यात या प्रोपगंडाला यश आले होते. आजवर ज्यूंवरील अत्याचाराने, अन्यायाने सामान्य जर्मनांच्या मनास टोचणी लागत असे. पण आता तो विचार करू लागला, की एखादा ज्यू चांगला असेल, पण ही जात मुळातच वाईट. ती ठेचली पाहिजे. अनेकांना आश्चर्य वाटते, की हिटलरने लाखो ज्यूंचे शिरकाण केले. पण त्याला जर्मन नागरिकांनी ‘सँक्शन’ कसे दिले? त्याचे एक कारण हे होते.

चित्रपट हे पाठय़पुस्तकांनंतरचे अत्यंत प्रभावी साधन आहे प्रोपगंडाचे. त्यातही माहितीपटापेक्षा कथात्मक आणि थेट राजकीय चित्रपटांपेक्षा अ-राजकीय चित्रपट हे अधिक परिणामकारक असतात. याचे कारण त्यातून कशाचा तरी प्रचार केला जातो हेच आपल्याला समजत नसते. डोळ्यांपुढे पडदाच येतो. म्हणजे पाहा, ‘स्टार वॉर्स’मध्ये व्हिएतनाम युद्धविरोधी प्रोपगंडा होता याची जाणीव तरी असते का आपल्याला? पण तो चित्रपट होता, ‘तांत्रिकदृष्टय़ा आधुनिक अशा एका बडय़ा साम्राज्याविरोधात’ (गॅलॅक्टिक एम्पायर) ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या छोटय़ाशा गटा’ने (रिबेल अलायन्स) पुकारलेल्या युद्धाचा!

रवि आमले

ravi.amale@expressindia.com