महायुद्ध संपले तरी प्रोपगंडा सुरूच होता. फरक एवढाच होता, की हा शांततेचा काळ होता. आता युद्ध विकायचे नव्हते. विक्रीसाठी बाजारात अनेक गोष्टी होत्या.. युद्धकालीन प्रोपगंडाच्या प्रत्यक्ष कार्यानुभवातून तयार झालेले प्रचारतज्ज्ञ आता या बाजारात उतरले होते. त्या सर्वाचे पितामह होते एडवर्ड एल. बर्नेज..

edward-bernays

Mango exports were hit hard by the Israel Palestine war Pune news
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला मोठा फटका…झाले काय?
Russia-Ukraine war tanks become obsolete in modern warfare
Russia-Ukraine War: आधुनिक युद्धात रणगाडे निकाली निघालेत का?
Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
The Vietnam War Guided Missiles chip cold wars
चिप-चरित्र: व्हिएतनाम युद्धाचा असाही लाभ..

पहिले महायुद्ध संपले आणि जगाला हळूहळू एका दु:स्वप्नातून जाग येऊ  लागली. काही तरी भयानक चुकलेय, काही तरी विचित्र घडलेय हे जाणवू लागले.

या युद्धाने जग अधिक सुंदर होईल, असे सांगण्यात आले होते. ‘वॉर टू एंड ऑल वॉर्स’ ही घोषणा देण्यात आली होती. ती हवेतच विरली आणि जग होते तेथेच राहिले हे दिसू लागले. या घोषणेने आपल्याला वाहवत मात्र नेले, हे लोकांना समजू लागले. आपण असे कसे वाहवत गेलो, असे कसे वागलो, असे प्रश्न सतावू लागले. कालपर्यंत आपल्या शेजारी राहणारा जर्मन नागरिक अचानक राक्षसासारखा कसा भासू लागला? शत्रूचे सैनिक म्हणजे पाशवी क्रौर्याचे दुसरे नाव. लहान बालकांच्या पोटात संगिनी भोसकणारे, पकडलेल्या सैनिकांना हालहाल करून मारणारे हूण.. आक्रमक. आणि आपले सैन्य म्हणजे शौर्याचे, माणुसकीचे पुतळे. या सर्वसामान्यीकरणाने आपण भारावलो कसे? अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे यालाच राष्ट्रवाद म्हणतात का? १५ सप्टेंबर १९१४च्या ‘टाइम्स’मध्ये एका इंग्लिश सैनिकाने जर्मन सैन्याच्या अत्याचारांबाबत लिहिले होते, ‘आपल्या वृत्तपत्रांत छापून येणाऱ्या या गोष्टी अपवादात्मक आहेत. असे लोक सगळ्याच लष्करांत असतात.’ पण कोणीही ते मान्य करायला तयार नव्हते. आपले सैनिक शत्रुराष्ट्राला शरण जाऊ  नयेत, म्हणूनही शत्रुसैन्य किती क्रूर आहे, पकडलेल्या सैनिकांचे कसे हालहाल करते अशा गोष्टी प्रसृत केल्या जातात हे समजून घेण्याच्या मन:स्थितीत तेव्हा कोणीही नव्हते. अशा बातम्या, बोलवा, अफवा खऱ्या मानून चालले होते. जर्मन विमानांतून लहान मुलांसाठी विषारी चॉकलेट्स टाकण्यात येतात, यावर अनेक नागरिक विश्वास ठेवून होते. कोणताही मीडिया तुम्हाला हे सांगणार नाही, परंतु आमच्या डोळ्यांनी पाहिले आम्ही ते, अशा थापा मारणारे सत्याचे दूत वाटत होते. लोक राष्ट्रवादी तर एवढे झाले होते, की आपल्या घराच्या अंगणात लावलेली ती निळ्या फुलांची – बॅचलर्स बटनची – छानशी झाडे रागाने उपटून फेकून देत होते. कारण – ते जर्मनीचे राष्ट्रीय फूल होते!

युद्धाचा ज्वर उतरला आणि हळूहळू लोकांना जाणवू लागले, आपण एका सर्वव्यापी प्रोपगंडाची शिकार बनलो आहोत. जाने. १९२०च्या ‘लंडन मॅगेझिन’मध्ये अ‍ॅडमिरल जॉन फिशर यांनी लिहिले – ‘द नेशन वॉज फूल्ड इन्टू द वॉर.’ संपूर्ण राष्ट्राचे, त्यातील मी मी म्हणणाऱ्या बुद्धिमंतांचे, विचारवंतांचे आणि ‘यह पब्लिक है, यह सब जानती है’ असे म्हणत जनतेच्या शहाणपणावर गाढ विश्वास असणाऱ्या सुशिक्षितांचे पद्धतशीर उल्लूकरण करण्यात आले होते. प्रभावी प्रोपगंडाने गाढवाचा गोपाळशेठ करता येतो आणि गोपाळशेठचे गाढव याचा अनुभव लोकांनी घेतला होता. लंडनमधील वेलिंग्टन हाऊसमधील वॉर प्रोपगंडा ब्युरो, त्याचे प्रमुख चार्ल्स मास्टरमन, क्रेवी हाऊसमधील मिनिस्ट्री ऑफ एनिमी प्रोपगंडाचे प्रमुख आणि तेव्हाचे ‘मीडियासम्राट’ लॉर्ड नॉर्थक्लिफ, अमेरिकेतील लोकमाहिती समितीचे प्रमुख जॉर्ज क्रिल यांच्या कारवाया आणि करामती आता लोकांसमोर येऊ  लागल्या होत्या. नॉर्थक्लिफ यांच्या प्रोपगंडा समितीचे उपाध्यक्ष सर कॅम्पबेल स्टुअर्ट यांनी १९२० मध्ये लिहिलेले ‘सिक्रेट्स ऑफ क्रेवी हाऊस’ हे पुस्तक आपणांस ब्रिटिश प्रोपगंडा किती महत्त्वाचा होता याची ‘गौरवशाली’ गाथा सांगते. त्याच वर्षी तिकडे अमेरिकेत जॉर्ज क्रील ‘हाऊ  वुई अ‍ॅडव्हर्टाइज्ड अमेरिका’ या पुस्तकातून त्यांनी केलेल्या प्रोपगंडाची भलामण करतात. १९१९ मध्ये ‘टाइम्स’ने ‘ब्रिटिश प्रोपगंडा इन एनिमी कंट्रीज’ हा खास अंक प्रसिद्ध केला. यातून उघड होत असलेले प्रोपगंडाचे स्वरूप वाचून लोक अस्वस्थ होत होते. प्रचारातील नैतिकतेचे प्रश्न ऐरणीवर येत होते. अमेरिकेत तर क्रील समितीविरोधात एवढे वातावरण तापले की काँग्रेसला ती बरखास्त करावी लागली. क्रील यांनी पुस्तक लिहिले ते त्या रागातून आणि आपण कसे जगाच्या कानाकोपऱ्यात ‘गॉस्पेल ऑफ अमेरिकनिझम’च पसरविण्याचे काम करीत होतो, हे सांगण्यासाठी.

युद्धकालीन प्रोपगंडाबद्दल लोकांच्या मनात एकूणच सरकारी प्रचाराबद्दल प्रचंड अविश्वास निर्माण झाला; पण त्याचाही उलटाच परिणाम झाला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरला त्यामुळे मोकळे रान मिळाले. जर्मनीत ज्यूंवरील अत्याचाराच्या कहाण्या समोर येत होत्या; परंतु त्या वाचून लोकांना पहिल्या महायुद्धातील बेल्जियमवरील अत्याचाराचा प्रोपगंडा आठवत राहिला. नाझी अत्याचाराच्या कथा हा लोकांना आपल्या सरकारी प्रचाराचाच भाग वाटू लागला; परंतु याचा अर्थ लोकमानस आता प्रोपगंडामुक्त झाले होते असे नाही. प्रोपगंडा सुरूच होता. ‘अदृश्य सरकार’ लोकमानसास हवे तसे वळवीत होते. फरक एवढाच होता, की हा शांततेचा काळ होता. आता युद्ध विकायचे नव्हते. आता विक्री करण्यासाठी बाजारात अनेक गोष्टी होत्या. वस्तू, विचार, कल्पना, राजकीय पक्ष, नेते, अभिनेते, चित्रपट, पुस्तके.. सगळेच काही. युद्धकालीन प्रोपगंडाच्या प्रत्यक्ष कार्यानुभवातून तयार झालेले प्रचारतज्ज्ञ आता या बाजारात उतरले होते. त्या सर्वाचे पितामह होते एडवर्ड एल. बर्नेज. ‘फादर ऑफ स्पिन’ एडवर्ड बर्नेज

पब्लिक रिलेशन्स – पीआर – जनसंपर्क या प्रोपगंडा शाखेचे अग्रदूत. ‘सहमती अभियांत्रिकी’ आणि ‘सहमती निर्मिती’ या संज्ञांचे जनक. ‘इनव्हिजिबल गव्हर्नमेन्ट’ ही संकल्पना उलगडून सांगणारे प्रोपगंडाचे भाष्यकार. आज आपल्याभोवती दिसणारा अवघा प्रोपगंडा, त्याचे तंत्र आणि मंत्र समजून घ्यायचे तर पुन:पुन्हा ज्यांच्या पायाशी यावे लागते असा हा प्रोपगंडापंडित. पहिल्या महायुद्धाच्या काळात ते क्रील समितीचे सदस्य होते. तेथे फार महत्त्वाची जबाबदारी नव्हती त्यांच्यावर. समितीतील विदेशी माध्यम ब्युरोच्या निर्यात विभागाचे प्रमुख आणि लॅटिन अमेरिकन सेक्शनचे उपप्रमुख म्हणून ते काम करीत होते. आघाडीवर जाऊन लढावे, अशी त्यांची इच्छा होती; पण डोळे अधू असल्याने त्यांची भरती होऊ  शकली नाही. देशासाठी काही तरी करायचे, आपल्या पत्रकारितेतील आणि जनसंपर्क क्षेत्रातील अनुभव देशकार्यासाठी वापरायचा म्हणून ते लोकमाहिती समितीमध्ये दाखल झाले. तेथील कामातही त्यांनी अशी काही चमक दाखविली, की पुढे जेव्हा लष्करातून कारकुनाच्या पदासाठी त्यांना बोलावणे आले, तेव्हा समितीचे अध्यक्ष जॉर्ज क्रील यांनी लष्करास पत्र लिहिले – ‘तुम्हाला माहितीच आहे की, लष्कराच्या कामात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही असे आमचे धोरण आहे; परंतु बर्नेज यांची बाब वेगळी आहे. त्यांची कारकुनाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु तशा कोणत्याही कामापेक्षा ते सध्या सरकारसाठी जे काम करीत आहेत ते अधिक महत्त्वाचे आहे.’

क्रील समिती बरखास्त झाली. बर्नेज बाहेर पडले आणि प्रोपगंडाच्या इतिहासातील नवे, तिसरे पर्व सुरू झाले- सहमती अभियांत्रिकीचे..

बर्नेज सांगत, की आपल्यावर कोणी तरी सत्ता राबवीत असते, आपली मने घडविली जात असतात, आपल्याला कल्पना सुचविल्या जात असतात. हे कोण करते, तर ज्यांच्याबद्दल आपण कधी काही ऐकलेलेही नसते अशा व्यक्ती. लोकशाही समाजाची रचना ज्या पद्धतीने झालेली असते, त्याचीच ही तार्किक परिणती आहे. जर असंख्य माणसांना एक उत्तम समाज म्हणून एकत्र राहायचे असेल, तर त्यांनी एकमेकांशी अशा प्रकारे सहकार्य केलेच पाहिजे.. प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक प्रश्न, व्यक्तीचे वर्तन अशा बाबतींत स्वत:हूनच विचार करून आपले मत तयार केले पाहिजे. हे सैद्धांतिकदृष्टय़ा योग्यच आहे; पण प्रत्यक्ष व्यवहारात सगळेच जर त्या प्रत्येक प्रश्नाशी निगडित असलेल्या आर्थिक, राजकीय, नैतिक दुबरेध माहितीचा अभ्यास करू लागले, तर कशावरही कुणाचे एकमत होणे अवघडच. तेव्हा आपण ते काम अदृश्य सरकारवर सोपविले. त्यांनी त्या सगळ्या माहितीचे विश्लेषण करावे, महत्त्वाच्या बाबी निवडाव्यात. म्हणजे आपल्यासमोरचे निवडीचे पर्याय हाताळता येण्याजोग्या पातळीवर येतील..

हे अदृश्य सरकार आपले नेते आणि माध्यमे यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचत असते. ते कसे हे पाहायचे असेल, तर बर्नेज यांच्याच काही प्रचारमोहिमांकडे जावे लागेल. त्यातून आपल्याला समजेल, की एखादी फॅशन कशी तयार केली जाते, एखादी वाईट गोष्टही कशी लोकप्रिय केली जाते, एखादा नेता मसीहा म्हणून आपल्यासमोर कसा ठेवला जातो.. फार काय, एखादे सरकारसुद्धा कसे पाडले जाते. बर्नेज यांनी ते करून दाखविले होते. एका अमेरिकी कंपनीसाठी त्यांनी ग्वाटेमालात बंड घडवून आणले होते..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com