19 November 2017

News Flash

अफवा – एक अग्निशस्त्र

युद्धकाळात अफवांना ऊत येतच असतो.

रवि आमले | Updated: May 1, 2017 2:58 AM

लंडन, मे १९१५. जर्मन दुकानांवर हल्ला करणारा जमाव. त्यातील मुले आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे.

युद्धकाळात अफवांना ऊत येतच असतो. आपल्याकडे भारत-पाक युद्धाच्या वेळी एक बडा अभिनेता पाकिस्तानचा हेर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याच्या घरात गुप्त संदेश पाठविण्याचे यंत्र आहे, हे जणू आपण आताच पाहून आलो अशा आविर्भावात सांगितले जात होते. ब्रिटनमध्येही तेच घडत होते..

दंगली का होतात हा वेगळा विषय झाला. त्यांमागे अनेक कारणे असतात. मराठीतील समर्थ लेखक भाऊ  पाध्ये यांनी त्याबाबत वेगळाच सिद्धान्त मांडला होता. चरबी सिद्धान्त. दोन्ही गटांना चरबी चढते. मग ते दंगली करतात. त्यात चरबी ओसरते. मग शांत होतात. पण हळूहळू ती पुन्हा चढू लागते. तो काळ किती लहान वा मोठा यावर पुढची दंगल अवलंबून असते, असा तो सिद्धान्त. वरवर हे विचित्र वाटेल. पण ही चरबी धार्मिक वा जातीय अस्मितेची, सत्ताकांक्षेची, आर्थिक वर्चस्वाची असते हे लक्षात घेतले की त्यातील मर्म लक्षात येते. दंगलींची अशी विविध कारणे सांगता येतात. पण त्या सर्वाचा लसावि एकच असतो. तो म्हणजे तिरस्कार आणि भय. माणसे यातून आक्रमक बनतात. प्रोपगंडाचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार सांगण्यात येतात. त्यातील वाईट प्रोपगंडा या भावना भडकावण्याचे काम करतो. आपणांस ते समजतही नसते. पहिल्या महायुद्धात शेरलॉक होम्सचा वापर प्रोपगंडासाठी करण्यात आला होता, हे आपल्याला कुठे माहीत असते?

आर्थर कॉनन डॉयल हे शेरलॉकचे जनक. मोठे साहित्यिक. युद्धकाळात ते वॉर प्रोपगंडा ब्युरोचे सदस्य होते. १९१७ मध्ये स्ट्रँड मासिकात त्यांची एक कथा प्रसिद्ध झाली. ‘द लास्ट बो’ नावाची. तिचे कथानक युद्धाने खचलेल्या वाचकांच्या भावना सुखावणारे असेच होते. शेरलॉक होम्स आणि डॉ. वॉटसन एका जर्मन हेराला शिताफीने पकडून देतात, असे. मग यात कुठे आला प्रोपगंडा? त्या कथेच्या शेवटी होम्स म्हणतात- ‘पूर्वेकडून वारं येतंय.. असं वारं इंग्लंडमध्ये यापूर्वी कधी आलंच नव्हतं. ते थंड असेल, बोचरं असेल. आणि वॅटसन, त्या वाऱ्याच्या फटकाऱ्यांनी आपल्यातले अनेक चांगले लोक नष्ट होतील. पण काहीही झालं तरी ते देवाने पाठविलेलं वारं आहे. एकदा का ते वादळ शांत झालं, की मग एक अधिक स्वच्छ, अधिक चांगली, अधिक बलशाली अशी भूमी आपल्याला पुन्हा उन्हात चमकताना दिसेल.’

होशेन वँग हे प्रोपगंडाचे अभ्यासक. ते सांगतात, या संवादातून लंडनकरांच्या मनात विश्वास, टिकून राहण्याची ऊर्मी जागवण्याचाच डॉयल यांचा प्रयत्न होता. परंतु त्यामागे एक कुटिल संदेशही होता. तो म्हणजे : शेरलॉक आणि वॅटसन यांच्यासारख्या चतुर, धाडसी व्यक्तींनी त्या क्रूर जर्मनांचा बीमोड केला, तरच ही ब्रिटिश भूमी ‘अधिक स्वच्छ, अधिक चांगली, अधिक बलशाली’ राहू शकेल. अशा प्रकारे या कथेतून डॉयल यांनी अत्यंत प्रभावी असा जर्मनविरोधी संदेश वाचकांच्या नेणिवेपर्यंत पोहोचविला.

खरे तर तेव्हाचे सारे वातावरणच जर्मनविरोधी गंडाने काळवंडलेले होते. त्याला कारणीभूत होता तो अर्थातच सरकारी प्रोपगंडा आणि अफवांचा बाजार. हे युद्ध सुरू झाले त्या वर्षी ५० हजारांहून अधिक जर्मन ब्रिटनमध्ये राहत होते. समाजजीवनात मिसळून गेले होते. पण युद्धानंतर सारेच बदलले. कालपर्यंत ज्याच्या दुकानातून मटण आणले जात होते, जो आपला शेजारी होता, शिक्षक वा डॉक्टर होता, तो अचानक ‘क्रूर हूणवंशी’ झाला. ब्रिटनमध्ये पिढय़ान्पिढय़ा राहणाऱ्या जर्मन नागरिकांकडे आता संशयाने पाहिले जाऊ  लागले. युद्धकाळात अफवांना ऊत येतच असतो. आपल्याकडे भारत-पाक युद्धाच्या वेळी एक बडा अभिनेता पाकिस्तानचा हेर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याच्या घरात गुप्त संदेश पाठविण्याचे यंत्र आहे, हे जणू आपण आताच पाहून आलो अशा आविर्भावात सांगितले जात होते. ब्रिटनमध्येही तेच घडत होते. अफवा म्हणजे आग भडकावणारे शस्त्रच. वर्तमानपत्रांतूनही त्यांना बळ दिले जात होते. ‘मिथ्स अँड लिजंड्स ऑफ द फर्स्ट वर्ल्ड वॉर’ या पुस्तकात जेम्स हेवर्ड यांनी अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यातील मॅगी सूपच्या जाहिरातीची कहाणी जेवढी हास्यास्पद तेवढीच गंभीर आहे. लंडनमधील एका दैनिकाच्या बातमीदाराने बेल्जियममधून ही बातमी पाठविली होती. तेथे घुसलेले जर्मन सैनिक मॅगी सूप वगैरेच्या जाहिरातफलकाचे पत्रे उचकटून त्यांमागे महत्त्वाच्या सूचना लिहून ठेवतात. नंतर येणाऱ्या सैनिकांना त्याचा उपयोग व्हावा हा हेतू. अशा त्या बातमीने लंडनमध्ये खळबळ उडाली. काही टोळ्या रस्तोरस्ती फिरून मॅगीच्या जाहिराती उचकटून पाहू लागल्या. ‘स्क्रूड्रायव्हर  पार्टीज’ म्हणून त्या ओळखल्या जातात. हे भय आणि संशयाचे वातावरण जर्मनांबद्दलचा तिरस्कार वाढवीत होते. ‘डेली मेल’ने एक आवाहन प्रसिद्ध केले होते, की हॉटेलमध्ये जर्मन वा ऑस्ट्रियन वेटरकडून सेवा घेण्यास सर्व विवेकी नागरिकांनी नकार द्यावा. याचे कारण एका वेटरच्या मेन्यू कार्डवर एका ग्राहकाला लंडनचा नकाशा सापडला. त्याने पोलिसांत तक्रार केली. त्याची चौकशी झाली. यातील खरी गंमत वेगळीच होती. ती म्हणजे तो नकाशा लंडनचा नव्हता, तर हॉटेलातील बैठक व्यवस्थेचा होता. पण अशा बातम्यांतून जर्मन नागरिक म्हणजे हेर, देशाचे शत्रू अशी एकसाची प्रतिमा तयार होत होती. त्यातूनच लंडनमध्ये जर्मन नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना वाढू लागल्या. ऑक्टोबर १९१४, मे १९१५, जून १९१६ आणि जुलै १९१७ मध्ये तर मोठय़ा दंगली झाल्या. या दंगलींना ‘फूड रायट’ – अन्नासाठीच्या दंगली – असे म्हटले जात असले, तरी त्यांचे लक्ष्य होते ते जर्मन नागरिकच. हा जर्मनविरोधी प्रोपगंडाचा परिणाम होता.

या प्रचारात आघाडीवर होती लॉर्ड नॉर्थक्लिफ यांच्या मालकीची ‘डेली मेल’, ‘डेली मिरर’, ‘टाइम्स’, ‘द संडे टाइम्स’ यांसारखी दैनिके. ते स्वत: ‘मिनिस्ट्री ऑफ एनिमी प्रोपगंडा’चे प्रमुख होते. या दैनिकांतून जर्मन अत्याचाराच्या क्रूर कहाण्या तिखटमीठ लावून प्रसिद्ध करण्यात येत होत्या. ब्राइस रिपोर्टने त्यांना बळ दिले होते. वस्तुत: येथे जर्मनांना झुकते माप देण्याचे काहीच कारण नाही. जर्मन आक्रमणात अडीच लाख बेल्जियन नागरिक मृत्युमुखी पडले होते. पण ब्रिटिश सैन्याचे वर्तनही त्यांहून वेगळे नव्हते. महायुद्धात असेच घडत असते. परंतु प्रोपगंडाचे वैशिष्टय़ हे असते, की त्यात कधीही दुसरी बाजू गृहीत धरली जात नाही. किंबहुना कोणत्याही गोष्टीला तेथे असते ती एकच बाजू. आपली बाजू. त्यात तर्कबुद्धीला स्थानच नसते. ब्रिटनमध्ये जर्मनविरोधी गंड कुठल्या पातळीला पोहोचला होता हे पाहिले की हे लक्षात येईल. जेम्स हेवर्ड यांच्या पुस्तकात एक किस्सा दिला आहे. ते सांगतात, ब्रिटनमध्ये जेथे कुठे डाशहंट जातीचा कुत्रा दिसेल तेथे त्याला ठेचून मारण्यात येत होते. हे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घडत होते, की ब्रिटनमधून ते नामशेषच झाले. कुत्र्यांवर हा हिंस्र राग का? तर डाशहंट श्वान हे जर्मनीचे प्रतीक म्हणून वृत्तपत्रांतील व्यंगचित्रांतून रंगविले जात होते म्हणून.

जर्मनविरोधी गंड केवळ एवढय़ावरच थांबला नव्हता. आता ब्रिटनमध्ये नामांतराची चळवळ सुरू झाली होती. रस्ते, इमारती, चौक यांची जर्मन नावे बदलण्यात येत होती. जर्मन नाव असलेल्या व्यक्ती जनरोषास बळी पडत होत्या. त्याचा धसका खुद्द राजघराण्यानेही घेतला होता. या घराण्याचे रक्तसंबंध जर्मनीशी होते. पण भडकलेली लोकभावना लक्षात घेऊन राजघराण्याने आपले जर्मन नाव टाकून दिले आणि विंडसर हे कुळनाम धारण केले. २५ एप्रिल १९१७च्या ‘टाइम्स’मध्ये तशी बातमीही प्रसिद्ध झाली होती. अशा भडकलेल्या वातावरणात जर्मनांचे नाव घेणे हेही पाप ठरू लागले होते. युद्ध करून त्यांची नामोनिशाणी मिटवून टाकणे हे प्रत्येक ब्रिटिश नागरिकाचे कर्तव्य बनले होते. अशा प्रोपगंडाने भारलेल्या वातावरणात कोणी शांततेचे आवाहन करीत असेल, तर तो देशद्रोहीच ठरणार. आपल्याकडील याचे ताजे उदाहरण म्हणजे युद्धाला विरोध करणारी गुरमेहर कौर ही तरुणी. तिला ब्रेनवॉश झालेली पाकवादी ठरविण्यात आले होते. तिच्या चारित्र्यावर संशय घेणारी खोटी ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्यात आली होती. ब्रिटनमध्ये अगदी असेच घडले होते. तेथे तर भावी पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड हेच त्या प्रोपगंडाचे बळी ठरले होते..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

First Published on May 1, 2017 2:57 am

Web Title: marathi articles on wars and rumors his last bow arthur conan doyle