11 August 2020

News Flash

‘महाअसत्य’मेव जयते..

‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र.

हिटलरच्या निमलष्करी सेनेने पकडलेले दाम्पत्य. त्यातील महिलेच्या गळ्यातील पाटीवर लिहिलेले आहे - ‘मी आहे एका ज्यूकडे आकर्षित झालेली डुकरीण.’ आणि पुरुषाच्या गळ्यातील पाटी म्हणते - ‘मी आहे जर्मन मुलींना बहकविणारा ज्यू.’ ज्यूंविरोधातील प्रोपगंडा कोणत्या थराला गेला होता, त्याचे हे एक उदाहरण.

‘सत्यमेव जयते’. मुण्डकोपनिषदातील तिसऱ्या मुण्डकातला हा मंत्र. तो आपण राष्ट्रीय विधान म्हणून स्वीकारला. पण सहसा तो राष्ट्रीय बोधचिन्हावरच राहतो. एरवी सर्वकाळ असत्याचाच बोलबाला असतो. हिटलर आणि त्याच्या प्रोपगंडा खात्याचा मंत्री जोसेफ गोबेल्स यांना हे चांगलेच माहीत होते. या गोबेल्सचे एक विधान आहे –

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सतत सांगत राहिलात, की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते. लोकांचा त्यावर विश्वास बसू लागतो. राजकीय, आर्थिकआणि वा किंवा लष्करी खोटारडेपणाच्या परिणामांपासून राज्यव्यवस्था जोवर लोकांना वाचवीत नाही, सुरक्षित ठेवू शकत नाही, तोवरच हे असत्य कायम ठेवले पाहिजे. कारण सत्य हा असत्याचा जीवघेणा शत्रू असतो. तेव्हा हाच युक्तिवाद पुढे नेऊन असे म्हणता येते, की सत्य हा राज्यव्यवस्थेचा सर्वात मोठा शत्रू असतो.’

स्वत:ला सत्याचा मोठा पुरस्कर्ता म्हणून पेश करणाऱ्या गोबेल्सचे हे मत. अनेक ग्रंथांतून त्याच्या नावावर ते उद्धृत करण्यात आले आहे. पण यात एक खाशी मौज आहे. ती म्हणजे- गोबेल्सच्या नावावर खपविण्यात येणारे हे विधान त्याचे नाही. मिशिगनमधील केविन कॉलेजचे प्रो. रॅण्डल बेटवर्क हे नाझी प्रोपगंडाचे अभ्यासक. त्यांच्या मते हे विधान गोबेल्सचे नाही. आणि तरीही ते गोबेल्सचेच असल्याचे आज सारे जग मानते. असेच एक आपल्या परिचयाचे उदाहरण आहे, ते फ्रान्सच्या सोळाव्या लुईची पत्नी मेरी अँतोनेतचे. दुष्काळात अन्नान्नदशा झालेल्या आपल्या प्रजेबद्दल ती म्हणाली होती, की पाव मिळत नसेल, तर त्यांनी केक खावा. या एका विधानाने कुख्यातीस पावली ती. पुढे तिचा शिरच्छेद करण्यात आला. तिच्या चरित्रकार अँतोनिया फ्रेझर सांगतात, हे विधान मुळात या मेरीचे नाहीच. तिच्याआधी १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेली, चौदाव्या लुईची पत्नी मेरी-थेरेस तसे म्हणाली होती. पण आज ते मेरी अँतोनेतचे विधान म्हणूनच. तेव्हा हे खरेच आहे, की खोटे सतत सांगितले, की खरे वाटू लागते! परंतु हिटलर आणि गोबेल्स बोलत आहेत, ते अशा किरकोळ खोटय़ा गोष्टींबद्दल नव्हे, तर महाअसत्याबद्दल – ‘बिग लाय’बद्दल.

‘माइन काम्फ’मध्ये हिटलर सांगतो  ..हे एक स्वयंप्रकाशी सत्य आहे, की महाअसत्यामध्ये नेहमीच एक जोरकस विश्वासार्हता असते. कारण लोकांचा भावनिक गाभा सहज भ्रष्ट होऊ  शकतो. अत्यंत आदिम साधी मने असतात त्यांची. ही मने छोटय़ा खोटय़ापेक्षा मोठय़ा असत्याला हसतहसत बळी पडतात. याचे कारण म्हणजे ते स्वत: नेहमीच लहान लहान खोटेपणा करीत असले, तरी मोठय़ा प्रमाणावरील खोटारडेपणा ते करू शकत नाहीत. शरम वाटत असते त्यांना त्याची. एखादी मोठय़ा प्रमाणावरील खोटी गोष्ट तयार करावी, हे कधी त्यांच्या डोक्यातच येत नाही. आणि त्यामुळे दुसऱ्या कोणामध्ये अशा प्रकारे सत्य विकृत करण्याचे धारिष्टय़ असू शकेल असेही त्यांना वाटू शकत नाही. त्यांच्यासमोर सगळी तथ्ये ठेवली, तरी ते त्याबद्दल शंका घेतील. दोलायमान होईल मन त्यांचे. ते म्हणतील, कदाचित आपल्याला जे सांगण्यात येतेय त्याचे काही वेगळेही स्पष्टीकरण असेल.

हे सारे हिटलर सांगत होता, ते ज्यूंच्या संदर्भात. ‘अशी महाअसत्ये सांगण्याची ‘अक्षम क्षमता’ त्यांच्यात आहे. खोटे आणि बदनामी यांचा नेमका वापर कसा करायचा हे ज्यूंइतके अन्य कोणालाही माहीत नाही. त्यांचे अवघे अस्तित्वच एका महाअसत्यावर आधारलेले आहे. ते स्वत:ला एक धार्मिक गट म्हणवितात. परंतु खरे तर ज्यू हा एक वंश आहे,’ असे हिटलर रेटून सांगतो. वस्तुत: ज्यूंबद्दलचा हा हिटलरी प्रचार हेच महाअसत्याचे मोठे उदाहरण आहे. आता प्रश्न असा येतो, की शोपेनहॉरसारख्या तत्त्वज्ञानेही ज्यूंवर हा आरोप केला आहे. त्याने ज्यूंना ‘ग्रेट मास्टर्स ऑफ लाईज’ म्हटलेले असल्याचे हिटलर सांगतो. मग त्याच्या या आरोपांना महाअसत्य कसे म्हणायचे?

हे तंत्र नीट समजून घेतले पाहिजे. ज्यूंबद्दल जर्मन तत्त्वज्ञ शॉपेनहॉर जे सांगतो आणि हिटलर जे म्हणतो ते तेव्हाच्या जर्मन समाजात लोकप्रिय असलेले समज होते. एखादी जात कंजूष असते, एखादा धर्म क्रूर असतो असे समज हा प्रोपगंडाचाच भाग असतो. विरोधकांची एकसाची टाकसाळी प्रतिमा तयार करण्याच्या तंत्राची ती उपज असते. या प्रोपगंडामुळे त्या जातीचे, वंशाचे वा धर्माचे जे रूप उभे राहते, तेच सत्य असा समज समाजात दृढ होतो. त्यासाठी मग कोणतेही बाह्य़ पुरावे असण्याची आवश्यकता नसते. ते गैरसमज हेच स्वयंप्रकाशी सत्य असते. हिटलर त्याच्या महाअसत्यातून हेच ‘सत्य’ सांगत होता. येथे तो प्रोपगंडा हा पूर्णत: असत्यावर कधीच आधारलेला नसावा, या नियमाचेच पालन करीत होता!

‘महाअसत्या’च्या, ‘राक्षसीकरण – डेमनायझेशन’च्या प्रोपगंडा तंत्रांतून हिटलरने एकीकडे ज्यू धर्मीयांची क्रूर, कंजूष, कपटी, कारस्थानी अशी प्रतिमा तयार केली. इस्लामचा ज्यूंना विरोध. त्याचाही त्याने या प्रतिमानिर्मितीत वापर केला. इस्लाम हा ‘पौरुषत्वाचा धर्म’ आहे. तो ‘हायजेनिक’ – स्वास्थ्यकारक – धर्म आहे. ‘इस्लामच्या सैनिकांना योद्धय़ांचा स्वर्ग’ लाभतो. हा असा इस्लाम ‘जर्मन प्रवृत्ती’शी खूपच मेळ खाणारा आहे असे हिटलर म्हणतो, ते त्यामुळेच. त्याची संपूर्ण प्रोपगंडा यंत्रणा हे महाअसत्य लोकांच्या मनावर बिंबवीत असतानाच, दुसरीकडे तो जर्मन नागरिकांत वंशश्रेष्ठत्वाची भावनाही जागवीत होता. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या, अत्यंत शुद्ध रक्ताच्या या महान आर्यवंशीय जर्मनांचा पहिल्या महायुद्धात पराभव झाला, त्यांना मानहानीकारक तहाची कलमे स्वीकारावी लागली, ती या लोभी ज्यूंच्या कारस्थानांमुळेच. आजही हे ज्यू बोल्शेविक ब्रिटन, अमेरिका आणि रशियामध्ये राज्य करीत आहेत. जर्मनांना नामशेष करणे हे त्यांचे ध्येय आहे. आज जर्मनीमध्ये जे जे वाईट घडत आहे, जी जी संकटे येत आहेत, त्या सर्वाना हेच ज्यू कारणीभूत आहेत. जर्मनांचा वंशविच्छेद करण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले आहे. त्यांच्यातील काही ‘ज्यू राष्ट्रीयते’चा उद्घोष करीत आहेत, असे तो सांगत होता. यासाठी ते काय करतात, त्यांचे वर्तन कसे असते याचे, ‘माईन काम्फ’मधील ‘रेस अ‍ॅण्ड पीपल’ या प्रकरणात त्याने जे उदाहरण दिले आहे ते पाहण्यासारखे आहे. तो सांगतो- ‘हे काळ्या केसांचे ज्यू तरुण साध्याभोळ्या जर्मन मुलींवर तासन् तास नजर ठेवून बसलेले असतात. सैतानासारखे निरखीत असतात त्यांना. हेरगिरी करीत असतात त्यांची.’ कशासाठी? तर ‘त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे रक्त नासवण्यासाठी, त्यांना त्यांच्या स्वत:च्या माणसांच्या काळजापासून तोडण्यासाठी..’  या अशा लोकांपासून आपला वंश आणि राष्ट्र वाचवायचे असेल, तर पहिल्यांदा त्यांचे शिरकाण केले पाहिजे, असे तो सांगत होता. आणि ते सारे जर्मन जनतेला मनापासून पटत होते! किंबहुना हिटलरचे जे विचार आहेत, ते मुळातच आपले विचार आहेत आणि आपण आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या विचारशक्तीने ते तयार केलेले आहेत, असा त्यांतील अनेकांचा समज झालेला होता. परिणामी असंख्य जर्मन नागरिक ‘स्वत:च्या मना’ने ज्यूंना विरोध करू लागले होते. म्हणजे आपण स्वत:च्या मनाने हे करतो आहोत असे त्यांना वाटत होते. हे सारे नाझी प्रोपगंडाचे यश होते. हा प्रोपगंडा एवढा यशस्वी आणि सर्वव्यापी ठरला होता, की सर्वसामान्य पापभिरू जर्मन जनताही ज्यूंचा नरसंहार उघडय़ा डोळ्यांनी पाहात होती. ते क्रूर आहे, अनैतिक आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. संपूर्ण राष्ट्रच्या राष्ट्र हिटलरी महाअसत्याला बळी पडले होते.

आता प्रश्न असा येतो, की हे त्याने नेमके साधले कसे? महाअसत्य – बिग लाय, राक्षसीकरण – डेमनायझेशन, बदनामीकरण – नेम कॉलिंग, चमकदार सामान्यता – ग्लिटरिंग जनरॅलिटी, द्वेषमूर्ती वा शत्रू तयार करणे ही प्रोपगंडाची तंत्रे त्याने उपयोगात आणली, हे आपल्याला ठाऊक आहे. याकरिता त्याने सर्व प्रकारच्या प्रचार-प्रसार माध्यमांचा वापर केला, हेही आपल्याला माहीत आहे. पण ही साधने वापरण्यापूर्वी त्याने आपल्या विरोधकांकडील तशीच साधने आधी निकामी केली होती. त्याची सुरुवात त्याने केली ती तेव्हाच्या वृत्तपत्रांपासून. त्यासाठी त्याने जे केले, ते आजही – किंबहुना आज तर अधिकच – लक्षणीय आहे..

 

रवि आमले

ravi.amale@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2017 2:16 am

Web Title: the success of adolf hitler
Next Stories
1 हिटलरचा प्रचार-विचार
2 ‘प्रोपगंडा-पंडित’ हिटलर!
3 प्रतिमांचे भ्रमजाल!
Just Now!
X