Untitled-58‘‘काय, मागचा सबंध आठवडा कुठे होता? एका मफिलीची आमंत्रणपत्रिका द्यायची होती.’’ स्नेही अगदी उत्साहाने सळसळत होते.
‘‘मागचा आठवडा धामधुमीचा होता! तीन-तीन कार्यक्रम करायचे होते ना, त्यामध्ये व्यस्त होतो.’’
‘‘कसले कार्यक्रम? मागच्या आठवडय़ात तर काही सणवार नव्हते!’’ स्नेही कॅलेंडरकडे बघून विचारू लागले.
‘‘अहो, आमचे कार्यक्रम नेहमी सणवारांच्या दिवशीच नसतात ना. युनेस्कोने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय दिनसुद्धा आम्ही साजरे करतो. मागच्या आठवडय़ात असे तीन दिवस साजरे करायचे होते. २० मार्चला जागतिक चिऊ दिन, २१ मार्चला जागतिक वसुंधरा दिन आणि २३ मार्चला जागतिक हवामान दिन.’’
‘‘हे काय कार्यक्रम आहेत का?’’
‘‘हे युनेस्कोने जाहीर केलेले दिवस आहेत. आणि सुजाण नागरिकांनी त्याचा उद्देश लक्षात घेऊन त्यांचे पालन केले पाहिजे.’’
‘‘म्हणजे नेमके काय?’’
‘‘जरा विचार करा, जागतिक चिऊ दिन साजरा करण्याची वेळ का यावी? आपण अनेकदा ऐकतो की मोबाइल टॉवर्समुळे चिमण्यांची संख्या रोडावत चालली आहे. हे कारण असेल किंवा इतर काही कारणे असतील, पण चिमण्या फारच कमी संख्येने आढळतात, हे खरे ना?’’
‘‘हे जरी खरे असले तरी आपण आता या युगात मोबाइल टॉवर्सची संख्या कमी करू शकत नाही ना?’’
‘‘हे करायची गरजही नाही. पण चिमण्या या आपल्या बालवयातील सवंगडी होत्या. त्या काळातील चिऊकाऊंच्या गोष्टी आपल्याला निसर्गाच्या निव्र्याज प्रेमाचा परिचय करून देणाऱ्या होत्या. लोक प्राणी पाळतात आणि त्यांच्याकडून लहानशी का होईना अपेक्षा असते. पण सर्वत्र सहजपणे आढळणाऱ्या चिमण्यांकडून आपल्याला किंवा इतर कुणालाही कसली अपेक्षा असते का? चिमण्यांशी हितगुज हे आपण व निसर्ग यांच्यातील निरपेक्ष प्रेमाचे उदाहरण आहे. चिऊ दिनाच्या निमित्ताने ह्य नाजूक नात्याचे स्मरण करावे, ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काही प्रयत्न करावेत, एवढीच अपेक्षा. आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला झालेली नात्याची जाणीव स्वत:पुरती सीमित न ठेवता इतरांपर्यंत पोहोचेल हे बघावे. आम्ही त्यामध्येच तर व्यस्त होतो!’’
‘‘चिमण्या खरंच किती गोड असतात ना! पण त्यांच्या घरटय़ांना आता जागाच नसते कुठे.’’
‘‘काही जणांनी चिमण्यांसाठी आपल्या बाल्कन्यांमध्ये घरे ठेवायला सुरुवात केली आहे.’’
‘हाऊ स्वीट! चिमण्यांशी पुन्हा गप्पा मारायला खरंच आवडेल.’’
‘‘आणि आपल्या भूमातेच्या कुशीत खेळायला?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘वसुंधरा दिन साजरा करायचा तो आपल्या पृथ्वीमातेविषयी आपल्या मनात काही जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी. आपण या पृथ्वीतलावर वावरतो, पण आपल्या व भूमातेच्या या अतूट नात्याची किती जाणीव आपल्या मनात असते? मानवाच्या बेबंद वागण्यामुळे या पर्यावरणाचा जो अपरिमित ऱ्हास झाला आहे, त्यात ह्य पृथ्वीवरील अत्याचारांचा समावेशही आहेच. इतकेच नाही, आपण सर्व या भूमातेचीच लेकरे आहोत. कुठल्याही आईला आपली सर्व मुले गुण्यागोिवदाने राहिलेली आवडतात. पण आपण सर्वजण सलोख्याने राहत आहोत का? आपला परस्परांशी व्यवहार शत्रुत्वाचा, संशयाचा, तिरस्काराचाही आहे. पृथ्वीमातेला या सर्व घटनांमुळे किती वेदना होत असतील याचा विचार आपण कधीच करत नाही. तिची लेकरे म्हणून या वेदना दूर करण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून आम्ही वसुंधरा दिनाला सकाळी लवकर उठून जवळच्या पटांगणात जातो व पृथ्वीमातेला साष्टांग नमस्कार घालतो.’’
‘‘त्याने काय होणार?’’
‘‘विज्ञान असे सांगते की पृथ्वी ही उत्तम विद्युतवाहक आहे. जी विजेच्या लहरींचे वहन करते, ती प्रेमाच्या लहरींचे निश्चित वहन करेल. साष्टांग नमस्कार घालण्याचे आवाहन आम्ही सर्व शालेय विद्यार्थ्यांना आणि जमेल तेवढय़ा सर्वाना करतो. सर्वाची ही लहानशी कृती आपल्या अंत:करणातील प्रेमाच्या लहरी इतरांपर्यंत निश्चित पोहोचवेल, असा आमचा विश्वास आहे.’’
‘‘आणि हवामान दिनाचे काय?’’
‘‘होय. तोही एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. जसे पृथ्वीशी आपले अतूट नाते आहे, तसेच हवामानाशीही निकटचा संबंध आहे. त्यातील चढउतार आपल्या जीवनावर कायमस्वरूपी परिणाम घडवून आणतात. या चढउतारांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या वेधशाळांना भेट देणे, हा आमचा या दिवसाचा उपक्रम असतो.’’
‘‘या वेधशाळा म्हणजे त्याच ना, ज्या ‘पाऊस पडेल’ असे सांगतात त्या दिवशी कडक ऊन पडते?’’
‘‘हो, त्याच. आणि हे चित्र केवळ भारतात नाही तर जगभर आहे. पण ह्यमध्ये वेधशाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा काय दोष? ते अंदाज सांगतात म्हणून पाऊस पडत नसतो, तर त्यांना हवामानाच्या ज्या खुणा आढळतात त्यावरून ते जमेल तितका अचूक अंदाज बांधत असतात.
२३ मार्चला आम्ही वेधशाळांमध्ये जाऊन या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्यासाठी मिठाई, फुले घेऊन जातो. आपली टवाळी न करता आपल्याबद्दल सहृदयपणे विचार करणारी माणसे आहेत, हे पाहून त्यांनाही आनंद होतो. जगापासून दूर राहून आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या त्या लोकांना आपणही जगाचा भाग असल्याची सुखद जाणीव होते.’’
‘‘या तिन्ही कार्यक्रमांबद्दल आम्ही प्रथमच ऐकले. आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या.’’
‘‘वेळ जरूर घ्या, पण पृथ्वीमातेला नमस्कार करण्यासाठी व चिऊताईशी पुन्हा गप्पा सुरू करण्यासाठी पुढील वर्षीच्या मुहूर्ताची वाट बघण्याची गरज नाही, खरे ना?’’
response.lokprabha@expressindia.com