News Flash

ओवाळणी

हे सूत्र मनात ठेवून आम्ही दिवाळीच्या सणाचा आनंद या मुलांच्या सहवासात लुटण्याचे ठरवले.

16-lp-minal‘ओवाळीते मी लाडक्या भाऊराया। वेडय़ा बहिणीची रे वेडी माया।।’ कुठल्याही वयाच्या भाऊबहिणींमधील हृदयनाते उलगडणाऱ्या या काव्यपंक्ती आणि दिवाळीच्या आनंदोत्सवाची सांगता करणारी भाऊबीजेची ओवाळणी यांचा अतूट संबंध आहे. शाळेची दिवाळीची सुट्टी संपली की पहिल्या दिवशी आपल्याला मिळालेली भाऊबीज मैत्रिणींमध्ये मिरवण्याची उत्कंठा असायची. तेव्हाची ओवाळणीसुद्धा चिमुकली असायची. खडय़ांच्या बांगडय़ा, कानातले डूल किंवा नवीन कंपास बॉक्स, रंगीत खडूपेटी वगैरे; पण ती फारच मौल्यवान वाटायची. एखाद्या मैत्रिणीला भाऊ नसेल तर तिचे अगदी निरागस सांत्वन केले जायचे, आपली ओवाळणी आपापल्या दप्तरात जायची की विषय संपला.

ओवाळणी न मिळालेल्या मैत्रिणीचा विचार थोडा काळ मनाला कुरतडायचा; पण यापेक्षा व्यापक प्रश्न पडण्याचे किंवा ओवाळणीचे प्रतीकात्मक रूप समजण्याचे ते वय नव्हते. आज असे व्यापक प्रश्न पडू लागले आहेत आणि ओवाळणीत मिळणाऱ्या वस्तूपेक्षाही त्यातून निर्माण होणारे नात्यांचे बंध अनमोल असतात, याचेही भान आले आहे.

या जराशा परिपक्व झालेल्या जाणिवेच्या कक्षेत आपल्या समाजात दुर्दैवाने मोठय़ा संख्येने असलेली अनाथ मुले, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांची मुले सामावत गेली आणि यांचे सण कसे साजरे होत असतील, हा धगधगता प्रश्न मनाला जाळू लागला. ज्यांचे दैनंदिन जीवनच इतक्या खाचखळग्यांनी भरलेले असते आणि सुख, आनंद या कल्पनाही त्यांच्या जवळपास फिरकण्याची शक्यताच नसते, त्यांच्या बाबतीत सण-उत्सव यांविषयी प्रश्न तरी पडावेत का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे; पण तो प्रश्न गैरलागूही ठरवता येत नाही, कारण ही मुले आपल्या समाजातली आहेत, एका अर्थी आपल्या घरातील आहेत. त्यांना चांगले, सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे.

अनाथपण ज्यांच्या वाटय़ाला ते येते, त्यांचे सामाजिक स्थान, मनोवस्था, विचारपद्धतीही आमूलाग्र बदलते. तशीच काहीशी परिस्थिती पालक असून नसल्यासारखे असणाऱ्या म्हणजे शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांची असते.  ‘ऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये’, हे या मुलांनाही पूर्णत: लागू पडते; कारण सत्य इतके कठोर असते की, ते उघड झाल्यास या मुलांच्या भावविश्वाच्या चिंधडय़ाच उडण्याची शक्यता अधिक! आणि आपल्या विचारांची दिशा भूतकाळात गुंतण्यापेक्षा वर्तमान सुधारण्याकडे व भविष्य घडवण्याकडे असणे उचित.

हे सूत्र मनात ठेवून आम्ही दिवाळीच्या सणाचा आनंद या मुलांच्या सहवासात लुटण्याचे ठरवले. ‘बंधुभाव’ हा शब्द आज वापरून अति गुळगुळीत झाला आहे. आम्ही तो प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले व त्यासाठी भाऊबीजेचा सण मुक्रर केला. अनाथ मुलांना वर्षांतील किमान एक दिवसासाठी तरी कौटुंबिक सुख, भावंडांचे प्रेम देण्याचा प्रयत्न करावा, असा निश्चय करून कामाला लागलो.

शहरातील अनाथाश्रम, अनाथ विद्यार्थिगृहे आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या इतर स्वयंसेवी संस्था यांच्याशी संपर्क साधून आमच्या हेतूची व उपक्रमाची त्यांना विस्तृत कल्पना दिली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दिवाळीनंतरचा रविवार कार्यक्रमासाठी निश्चित केला. मुलांच्या निवासी संस्थांपासून कार्यक्रम स्थळांपर्यंत मुलांना घेऊन येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली. मुले आल्यानंतर त्यांना स्वागतपेय व खाऊ देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व वयोगटांच्या मुलांना आवडतील असे नृत्य, गायन, जादूचे प्रयोग, माहितीपर मनोरंजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले.  आमंत्रित मुलांपैकी मुलींकडून आमच्या पुरुष वर्गाने ओवाळून घेतले तर मुलांना आमच्या स्त्रीवर्गाने ओवाळले. त्यांना उपयुक्त वस्तू ओवाळणीत घातल्या. प्रीतीभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यातला एक गमतीचा भाग म्हणजे पांजरपोळातील प्राण्यांनादेखील कार्यक्रमात आणून आम्ही त्यांना औक्षण करतो. कुत्री, ससे, घुबड, बकऱ्या, गाढव इत्यादींच्या उपस्थितीमुळे आबालवृद्धांना फारच मौज वाटते.

गेल्या एक तपाहून अधिक काळ आमचा हा पहिला प्रयोग सुरू आहे. लहान स्तरावर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा विस्तार झाला आहे आणि तो शहरपातळीपासून देशपातळीपर्यंत पोहोचला आहे. प्रारंभी आम्ही फक्त शहरातील संस्थांनाच आमंत्रित करीत होतो, तर आता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या तसेच ईशान्य भारतातील संस्थांशी संपर्क साधून त्यांना यात सामील होण्याचे आवाहन करतो. बऱ्याच लांबून मुले येत असल्यामुळे कार्यक्रमही तीन दिवसांचा झाला. त्यानुसार राहण्या-जेवण-खाण्याची जबाबदारी विस्तारली. तीन दिवसांपैकी एक दिवस मुलांसाठी शहरदर्शन आयोजित केले जाते. त्यात वस्तुसंग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र अशा ठिकाणी मुलांना आवर्जून नेतो. एक दिवस त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशा कार्यशाळांचे आयोजन व आमच्या स्नेहमंडळींच्या घरी गटागटाने फराळाचा कार्यक्रम ठेवतो. तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व ओवाळणी. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमामध्ये आमंत्रित मुलांचाच सिंहाचा वाटा असतो. मुलांना आनंद देण्यासाठी जे जे शक्य ते सर्व करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

पूज्य साने गुरुजींचे शब्द आहेत :

‘करी मनोरंजन जो मुलांचे

जडेल नाते प्रभुशी तयाचे’

आमचे परमेश्वराशी नाते जोडले जात आहे का, याबद्दल आम्हाला काहीच सांगता येणार नाही, किंबहुना तो उद्देश डोळय़ासमोर ठेवून आम्ही कामही करत नाही; पण एक मात्र खरे, ही मुलेच आमच्यासाठी परमेश्वररूप आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून आणि त्यांच्या सहवासात निर्माण होणारे आपुलकीचे बंध अनुभवून मनात येणाऱ्या भावनांचे शब्दांत वर्णन करता येणार नाही. एका दृष्टीने पाहिल्यास अनाथ मुलांची व पर्यायाने अनाथाश्रमांची वाढती संख्या हे आपल्या समाजाचे अपयश आहे. ते मिटवण्याची ताकद आम्हा पामरांमध्ये आहे का, ते माहीत नाही; पण या मुलांना आनंद देण्यासाठी व प्रेमाची ओवाळणी घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हे निश्चित!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2016 2:31 pm

Web Title: diwali celebration with orphans
Next Stories
1 आधुनिक ‘शस्त्र’पूजन!
2 त्वमेव जननी परा!
3 ‘ऐकावे’ ते नवलच!
Just Now!
X