News Flash

ईद मुबारक!

येत्या आठवडय़ात आपले मुस्लीम बांधव ‘रमजान ईद’ साजरी करतील.

येत्या आठवडय़ात आपले मुस्लीम बांधव ‘रमजान ईद’ साजरी करतील. महिन्याभराच्या उपवासानंतर ते मशिदीत नमाज पढून परस्परांना ईदच्या शुभेच्छा देतात; मिठाई खिलवतात, एकत्र येऊन इफ्तार पार्टी साजरी करतात. अशा वेळी आपल्या मुस्लीम बंधू-भगिनींचा हा सणाचा आनंद आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही.

आपण नेहमी पाहतो की एखाद्या महामार्गावर प्रवास करत असताना तिथून चाललेली सर्व वाहने वेगात, वाऱ्याशी स्पर्धा करत एका दिशेने म्हणजेच एकमेकांना समांतर पद्धतीने पुढे जात असतात. वास्तविक पाहता या वाहनांतील प्रवाशांचा परस्परांशी कोणताच संवाद नसतो किंवा खरं सांगायचं तर त्यांची तिथे त्यावेळी एकमेकांशी साधी नजरानजरही होत नसते, पण तरीही सर्व जण एकाच वेळी महामार्गावर प्रवास करण्याच्या त्या गतीच्या आनंदाची अनुभूती घेत असतात. आपल्या नेहमीच्या आयुष्यातही आगदी तसंच होत असतं. म्हणून महामार्गावरील त्या प्रवासाच्या अनुभवाप्रमाणे आपल्या मुस्लीम बंधू-भगिनींचा ईदचा आनंद आमच्यापर्यंतही पोहोचावा आणि तो अधिक व्यापकपणे सर्वत्र पसरावा असे आम्हाला वाटते.

आमच्या नेहमीच्या विचारानुसार ईदनिमित्त आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधील रुग्णांना, विशेषत: कनिष्ठ आर्थिक श्रेणीतील रुग्णांना फळे वाटतो. आमच्यापकी काही जण रुग्णांची सविस्तर माहिती काढून अत्यंत गरजू रुग्णांना पशांचीही मदत करतात. ही मदतही ते मजेदार रीतीने करतात. फळवाटपासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर गरजू रुग्णांच्या उशाखाली ते त्यांना कळणार नाही अशा पद्धतीने पशाचे पाकीट सरकवतात. या हाताने केलेली मदत त्या हाताला कळू नये; पण मदत योग्य जागी पोहोचावी, हा आपला संस्कारच आहे ना!

याव्यतिरिक्त आम्ही आपल्या मुस्लीम बांधवांचे मोबाइल फोन स्वच्छ करून देतो. ही आमची आधुनिक युगाशी सुसंगत अशी विज्ञानाधारित सेवा आहे. ईदच्या दिवशी मशिदींमध्ये मोठय़ा संख्येने मुस्लीम बांधव जमा होतात, त्या सर्वाचे मोबाइल फोन आम्ही विशिष्ट द्रावणाने र्निजतुक करून देतो व तेही विनामूल्य!

काही काळापासून असे सारखे मनात येत होते की, हे जे काही आपण करत आहोत, हे चांगले आहे नि:संशय, पण सामान्य आहे. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाच्या वा सणाच्या निमित्ताने हे करता येईल, पण त्यामध्ये ‘ईद’शी सुसंगत असे किंवा त्याच्याशी संबंधित असे विशेष काही नाही. आपल्याला जर ‘ईद’चा आनंद शतगुणित करायचा असेल, तर आपण यापेक्षाही वेगळे काहीतरी खास केले पाहिजे.

सुज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच की या विचाराला आपल्या समाजाच्या इतिहासाची पाश्र्वभूमी आहे. नाना प्रकारच्या संस्कृती, धार्मिक श्रद्धा या भारतभूमीवर गुण्यागोिवदाने नांदत आाल्या आहेत आणि तरीही लोकांमधील धार्मिक तेढ हेही एक दु:खद सामाजिक वास्तव आहे. आज धार्मिक मूलतत्त्ववाद व दडपशाही, धर्मातर, घरवापसी अशा उच्चश्रेणीतील लोकांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांचा काथ्याकूट करण्यापेक्षा सामान्य माणसाच्या जीवनात काय बदल घडवता येईल, त्याला आनंदाचे चार क्षण कसे मिळतील, हा आमच्या विशेष आस्थेचा विषय आहे. त्यामुळे धर्मामुळे सामान्य मनुष्याच्या आयुष्यात काय फरक पडतो, याचा आम्ही विचार करू लागलो. एक उदाहरण अगदी लगेच समोर आले. समजा, एखाद्या नोकरीच्या ठिकाणी गुलाब पाटील व गुलाब शेख अशा दोन व्यक्ती मुलाखतीसाठी उपस्थित असतील व त्या दोघांपकी एकाची निवड व्हायची असेल तर मुलाखत घेणाऱ्यांचा निर्णय काय असेल? केवळ पात्रतेच्या आधारावर निवड केली जाईल, असे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. व्यक्तीच्या नावामुळे समोरच्याच्या मनात जे काही प्राथमिक विचार येतात, त्यांचा या निर्णयात वाटा असू शकतो, नव्हे असतोच.

हे केवळ एक उदाहरण आहे, पण अशा असंख्य घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि विशिष्ट नावांमुळे निर्माण होणाऱ्या पूर्वग्रहांना लोकांना तोंड द्यावे लागते. हा विषारीपणा कमी करायचा असेल तर व्यक्तिनामे व धर्म यांची घातली जाणारी सांगड दूर करायला हवी. आमच्या मित्रमंडळींनी असे ठरवले की आता आपल्या कुटुंबातील नवजात बालकांना उर्दू नावे द्यायची. अकबर, हुमायून, शमा, बेनझीर अशी अनेक सुरेख व अर्थपूर्ण नावे त्यांनी शोधली व नवजात अर्भकांना दिली.

‘‘अरे वा! आपल्याकडची सर्व सुरेख व अर्थपूर्ण नावं संपलीच का? तुम्हाला अगदी उर्दू नावे शोधावी लागली ती?’’ – अपेक्षित खोचक प्रतिक्रिया.

‘‘अहो, आपल्याकडची नावे संपली म्हणून हा शोध घेतलेला नाही. नाव व धर्म यांची अनाठायी गुंफण होऊ नये म्हणून हा खटाटोप.’’

पूर्वी ब्रिटिश काळात उच्चभ्रू लोकांमध्ये मुलांना ख्रिश्चन नावे ठेवण्याची फॅशन होती. ब्रिटिशांची सत्ता गेल्यावर ती मागे पडली. आज असे ऐकण्यात आहे की चीनमध्ये मुलांना ख्रिश्चन नावे देण्याची लाट आहे. बाहेरच्या प्रगत जगात आपण मागास वा गावंढळ वाटू नये म्हणून नावांमध्ये ‘स्मार्टनेस’ आणण्याचा हा प्रयत्न.

पण आम्हाला उर्दू नावे ठेवण्यातून अशी कुठली व्यावहारिक लाभांची प्राप्ती नको आहे. एखादे नाव कानावर पडल्यावर त्यातून, त्या व्यक्तीला न पाहताच, प्रथमक्षणी निर्माण होणारे पूर्वग्रह टाळण्याचा आमचा उद्देश आहे. समाजात जर सुसंवाद हवा असेल तर, लोकांची मने स्वच्छ हवीत; पूर्वग्रहदूषित नकोत. असा सुसंवाद निर्माण करणारे एक साधन म्हणजे व्यक्तीचे नाव.

आम्ही त्याबाबतीत एक लहानसा प्रयोग सुरू केला आहे. विशिष्ट नाव म्हणजे विशिष्ट धर्म हे समीकरण खोडून काढण्याचा हा प्रयत्न आहे. येणारा काळ तरुण पिढीचा व मोकळया मनांना उत्तेजन देणारा असल्यामुळे हा केवळ प्रयोग न राहता सर्वसामान्य बाब होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

सर्वाना ‘रमजान ईद’च्या हार्दिक शुभेच्छा!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:18 am

Web Title: eid mubarak
Next Stories
1 लष्करच्या भाकऱ्या?
2 बाबांचा दिवस
3 जागतिक सागरी दिन
Just Now!
X