News Flash

वसुधव कुटुम्बकम्।

मे १५ हा दिवस युनेस्कोतर्फे जगभर ‘परिवार दिन’ म्हणून साजरा केला जातो.

45-lp-manaliमे १५ हा दिवस युनेस्कोतर्फे जगभर ‘परिवार दिन’ म्हणून साजरा केला जातो. आम्ही आमच्या समविचारी स्नेह्य़ांसोबत सहकुटुंब सहपरिवार हा दिवस गेली अनेक वष्रे साजरा करीत आहोत, या वर्षीसुद्धा केला. हा विशिष्ट दिवस घोषित करण्यामागची युनेस्कोची प्रेरणा ही गांभीर्याने विचार करण्यासारखी आहे.

‘कुटुंब’ ही मानवी समाजाची पायाभूत संस्था आहे. इतर सर्व नाती या संस्थेतूनच जन्माला येतात. पण आज एकविसाव्या शतकात ती काहीशी डळमळू लागलेली दिसते. तरुण पिढीला प्रेमापेक्षाही आपले स्वातंत्र्य प्रिय वाटू लागले आहे. त्यासाठी लग्न, कुटुंब यांसारखी बंधने झुगारून देण्याची त्यांची तयारी आहे. लग्नातून येणारे इतर पाश नकोत म्हणून ‘लिव्हइन’चा पर्याय स्वीकारण्याचे प्रमाणही वाढत आहे. एका बाजूला भौतिक प्रगती-आíथक सुबत्ता, पण दुसऱ्या बाजूला मानसिक अस्थर्य, भावनिक दिवाळखोरी अशा कात्रीत आज सर्वच जग विशेषत: तरुण पिढी अडकलेली आहे. यातून बाहेर पाडून त्यांना कुटुंबाचे, त्यातील सदस्यांच्या प्रेमाचे महत्त्व उमजावे यासाठी ‘जागतिक परिवार दिना’ची घोषणा युनेस्कोने केली आहे.

‘तुम्हाला तर असले प्रसंग म्हणजे आनंदाची पर्वणीच नाही का! गर्दी जमवायची आणि धुमाकूळ घालायचा. अहो, आज घरातील चार माणसं एकत्र भेटणं इतकं मुश्कील आहे. एका खोलीत चौघे बसले असतील तर जो तो आपल्या मोबाइलवर बिझी असतो. आपल्या ग्रुपशी मुलांना काही देणंघेणं नसतं. मुलांच्या फ्रेंड्समध्ये आपण आऊटडेटेड. चुकून घरात आजी किंवा आजोबा असले तर त्यांची गणना ‘डस्टबिन’मध्ये केली जाते. एक दिवस परिवार दिन साजरा करून हे चित्र बदलणार आहे का?’

त्यांचा उद्वेग अगदी पराकोटीला गेला होता आणि ते अगदी खरंच बोलत होते. जणू समाजाचा आरसाच दाखवत होते.

‘अहो, वर्षांतला एक दिवस सर्वाना एकत्र आणायचे तर त्यात एवढं..’

‘तुम्हाला ते एवढं सोपं वाटतं का? कोणीतरी आपले कार्यक्रम बदलायला तयार होतं का?मला सांगा, तुमचा नवरा..’

‘हां हां एक मिनिट. आमच्या या मित्रमंडळीच्या मोठय़ा परिवाराचा एक नियम आहे. कुठल्याही जोडप्यातील नवऱ्याचा उल्लेख ‘पतिपरमेश्वर’ म्हणून करायचा व बायकोचा उल्लेख ‘सर्वमंगला’ किंवा ‘लक्ष्मी’ म्हणून करायचा.’

‘त्याने काय होणार? ते लगेच लक्ष्मीनारायणाचा जोडा होणार का?’

‘का नाही? आपल्या विवाह विधीचा आदर्श तोच आहे ना?त्यांनी परस्परांकडे त्या भावनेने बघितले तरच त्या आदर्शाची प्राप्ती होईल.’

‘हे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत.’

‘अहो, हे शब्द आपल्या मनातल्या स्वप्नांना मूर्तरूप देणारे आहेत. कोणीही लग्न करताना निराश मनाने करतं का? प्रत्येक जण आपल्या जोडीदारामध्ये स्वप्नातला राजकुमार किंवा राजकन्या शोधत असतो. प्रत्येकालाच आपली ‘रबने बनादी जोडी’ असावी असं वाटतं. त्या स्वप्नाकडे नेण्याचा हसतखेळत केलेला प्रेमाचा प्रयोग म्हणजे परिवार दिन.’

आपल्या भारतात ‘कुटुंब’ ही संकल्पना जरा व्यापक आहे. केवळ पती-पत्नी व त्यांची मुले एवढेच नव्हे, तर अशा कमीत कमी दोन-तीन पिढय़ांचे कुटुंब बनत असते. याच्याबरोबर घरात कामाला असणाऱ्या नोकर-चाकरांच्याही दोन-तीन पिढय़ा असत. याव्यतिरिक्त शिक्षणासाठी राहणारी नात्यातील गरीब मुलं पाळीव पशुपक्षी, अतिथी-अभ्यागत असा मोठा पासारा असे. कालौघात हे चित्र बदलले, कुटुंब सुटसुटीत झाले. ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ हे धोरण लोकप्रिय झाले व सर्वानी अगदी मनावर घेतले. आज आपले कुटुंब अगदी छोटे, म्हणजे तिघांचे क्वचित जाणीवपूर्वक दोघांचेही झाले आहे. आत्या, मावशी, मामा, काका ही सर्व भूतकालीन नाती ठरत चालली आहेत. आपल्या आनंदाच्या प्रसंगी जवळ घेणारं, अगदी निखळ प्रेमाने गोडधोड करणारं किंवा दुखाच्या, अपयशाच्या प्रसंगी मूकपणे हात हातात घेणारं असं आपल्या जवळचं कुणी नसतंच. असतात ते व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर शुभेच्छा संदेश किंवा शोक संदेश. त्यांनी आपली प्रेमाची, प्रेमळ स्पर्शाची भूक भागते असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल.

‘मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की, आपण पुन्हा आपल्या विशाल, अतिविशाल कुटुंबपद्धतीकडे जावं!’ – खोचक प्रतिक्रिया.

‘तुम्ही निष्कर्ष काढण्याची फारच घाई करता बुवा. अहो, काळाचं चक्र उलट फिरवता येत नाही, हे आपल्याला सर्वानाच माहीत आहे. पण त्याच्या गतीने पुढे जात असताना आपण नवीन गोष्टी सुंदर पद्धतीनेही करू शकतो. आपल्या कुटुंबाचा विस्तार करायचा तो फक्त रक्ताच्या नात्यांनीच करायला पाहिजे असं नाही. आपल्या संस्कृतीचा दृष्टिकोन अतिशय विशाल आहे. ‘वसुधव कुटुम्बकम्।’ ही आपली शिकवण आहे. इतरांशी शुद्ध मत्रीचे संबंध जोडणे, इतरांच्या सुखदुखात मनापासून सहभागी होणे आणि हा पारिवार वाढवणे या दिशेने आपण आपल्या स्तरावर त्याची सुरुवात करू शकतो. मात्र त्यामध्ये कंपूशाही आणि अपेक्षा या राहू-केतूंना दूर ठेवायला हवे.’

‘म्हणजे?’

‘अनेक कुटुंबांचा मिळून एक विशाल परिवार झाला की त्यामध्ये नव्यांना सामावून घेण्यास काहींची हरकत असू शकते. ही नकारात्मक भावना म्हणजे कंपूशाही. तिचा प्रवेश झाला तर कुटुंबविस्ताराच्या उदात्त कल्पनेलाच हरताळ फासला जातो. तसेच या कुटुंबात जर सर्वानी एकमेकांकडून कुठल्याही अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंगाचे दुख सास-बहू मालिकांसारखी कारस्थाने सुरू होऊ शकतात. म्हणून हे राहू-केतू जवळपासही नकोत.’

खरं तर अशा मोठय़ा परिवारात लोभस अनौपचारिकता हवी. धर्म, भाषा, जात, वय, िलग, देश या सर्वाच्या पलीकडे जाऊन माणसामाणसांमध्ये जेव्हा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होईल व सर्व जग निरपेक्ष प्रेमाच्या धाग्यांनी बांधलं जाईल, तो खरा जागतिक परिवार दिन ठरेल.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:07 am

Web Title: family
टॅग : Premache Prayog
Next Stories
1 तृतीय नेत्र
2 शांततामय क्रांती
3 चिरंतन कोडे
Just Now!
X