News Flash

सांस्कृतिक गुंतवणूक

सांस्कृतिक गुंतवणूक हे काय प्रकरण आहे?

16-lp-minalपुढील पिढय़ांच्या भविष्यासाठी  स्थावर-जंगम मालमत्ता जमा करणे, इतर काही आधुनिक प्रकारच्या तरतुदी करणे गुंतवणूक करणे ही मानवाची सहजप्रवृत्ती असते. यामध्ये पुढील काळात पैशाची चणचण भासू नये, आरामाचे जीवन जगता यावे, हा मुख्य उद्देश असतो. यात सर्वाधिक महत्त्व आर्थिक तरतुदींना दिले जाते.

आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवले व त्यांनी काय करायला हवे होते, यावर आपण तासंतास चर्चा करू शकतो. जितकी आस्था आपल्याला आर्थिक-भौतिक संचिताबद्दल असते, तितकीच किंबहुना अधिकच अनास्था सांस्कृतिक गुंतवणुकीबद्दल असते. आता सांस्कृतिक गुंतवणूक हे काय प्रकरण आहे?

सरळ आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो सांस्कृतिक ठेवा दिला आहे, ती त्यांनी आपल्यासाठी केलेली सांस्कृतिक गुंतवणूक. त्यांनी वापरलेली वस्त्रे- प्रावरणे, शस्त्रास्त्रे, दस्तावेजीकरणाच्या पद्धती, शोभेच्या व इतर वस्तू, वाहने व त्यांचे वैविध्य, दागदागिने, आभूषणे, त्यांची जीवनपद्धती दाखवणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे सांस्कृतिक गुंतवणूकच. मानवी संस्कृतीचा प्रवास कुठपासून कुठपर्यंत झाला आहे हे दाखवणारा चलत्चित्रपटच जणू. आपण कोणाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याकडे वाटचाल करतो आहोत, याचे मोजमाप करणारी यंत्रणा म्हणजे सांस्कृतिक गुंतवणूक.

आज या सांस्कृतिक गुंतवणुकीबद्दल एवढा ऊहापोह करण्याचे कारण म्हणजे १८ मे या दिवशी सर्वत्र साजरा झालेला ‘जागतिक वस्तुसंग्रहालय दिन.’

आपल्याकडे एकूणच वस्तुसंग्रहालयाविषयी, म्युझियम्सविषयी कुचेष्टेच्या सुरात बोलण्याची पद्धत आहे. ‘त्यांचं घर म्हणजे अगदी म्युझियम आहे’ किंवा ‘अगदी म्युझियममध्ये ठेवण्याच्या योग्यतेचा आहे तो’ हे अगदी सर्रास कानावर येणारे उद्गार.

म्हणजे, बाबाआदमच्या काळातील जुन्यापुराण्या वस्तू टाकून देण्याची जागा म्हणजे वस्तुसंग्रहालय असे आपण समजतो. आणि तरीही आपल्या काही द्रष्टय़ा पूर्वसुरींच्या प्रयत्नांनी आपल्याकडे छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, राजा केळकर म्युझियम, डॉ. विश्वेश्वरैया म्युझियम, सालारजंग म्युझियम अशी अप्रतिम वस्तुसंग्रहालये उभी राहिली व ती आपले इतिहास संवर्धनाचे व सांस्कृतिक ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहेत.

वस्तुसंग्रहालयाची उभारणी, त्यांचे जतन व संवर्धन याबाबत युरोपियन लोकांचा दृष्टिकेन अगदी अनुकरणीय व प्रशंसनीय आहे. आपल्याला ऐतिहासिक ठेव्याला अद्ययावत् ठेवण्यासाठी त्यांनी केलेला विज्ञानतंत्रज्ञानाचा वापरही लाजवाब. लहान लहान देशांमध्ये प्रत्येक गावात, शहरात वस्तुसंग्रहालये आहेत. अगदी सॉक्रेटिसच्या काळातील ‘अगोरा’ जसेच्या तसे उभे केले आहे. पर्यटक तेथे मोठय़ा संख्येने भेटी देतात, अभ्यास करतात. स्थानिक आपल्या या सांस्कृतिक वारशाबद्दल डोळस अभिमान (गर्व नव्हे हं!) बाळगतात.

वस्तुसंग्रहालयांच्या अस्तित्वाचे महत्त्व त्यांनी खरोखरच जाणले आहे. आपला वर्तमान कधीही रिकाम्या अवकाशात आकाराला येत नाही. त्याचा एक धागा भूतकाळाशी जोडलेला असतो व दुसरा भविष्यकाळाचा वेध घेत असतो. ती साखळीच असते व तिच्यातील प्रत्येक दुवा इतर दोन दुव्यांशी नाते राखून असतो. केवळ भविष्याकडे नजर लावणे ही आपल्या दृष्टिकोनातील अपूर्णता आहे. त्यासाठी भूतकालीन वारशाचे ज्ञान आवश्यकच आहे. ज्ञानेश्वरीसारखा अलौकिक ग्रंथदेखील ‘भाष्यकारांते वाट पुसत’च जन्माला येतो. मग आपण आपल्या प्राचीन वारशाचे मोल जाणण्यात कमीपणा का मानायचा? त्याचे आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनातील स्थान समजावे यासाठी ‘जागतिक वस्तुसंग्रहालय दिन’ विशेष महत्त्वाचा ठरतो.

आमच्या सर्व स्नेही मंडळींनीदेखील हा दिवस साजरा करण्याचे ठरवले, पण अर्थात आमच्या खास पद्धतीने. आपल्या शहरातील सर्व वस्तुसंग्रहालयांची माहिती काढून तेथील कर्मचारीवर्गासाठी खास शुभेच्छापत्रे बनवून घेतली. भारताबाहेरील देशांच्या वस्तुसंग्रहालयांनादेखील १८ मे या दिवशी ही कार्डे मिळतील अशा बेताने कार्डे पाठवली. शालेय गटातील व तरुण वर्गातील आपल्या सर्व मुलामुलींना घेऊन गटागटांने शहरातील सर्व वस्तुसंग्रहालयांना भेटी दिल्या. तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याला शुभेच्छापत्र, फूल व मिठाई दिली. त्यांच्याबरोबर हिंडून त्यांना तेथील वस्तू विशेष प्रकारच्या द्रावणाने स्वच्छ करून दिल्या. सर्व वस्तुसंग्रहालय पाहिले, नवीन गॅलऱ्या व उपक्रम यांची माहिती करून घेतली व त्यांच्या महान कार्याबद्दल धन्यवाद दिले.

सर्वसामान्य लोक वस्तुसंग्रहालयाबद्दल उदासीन असतील तर तेथील कर्मचाऱ्यांनाही आपण भूतकाळाचा हिस्सा असल्याची निराशाजनक भावना घेरून टाकू शकते. वस्तुत: ते करत असलेल्या कामाचे सांस्कृतिक योगदान महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन व धन्यवाद दोन्ही देणे ही आपल्यासारख्या सुसंस्कृत नागरिकांची प्रेमाची जबाबदारी आहे.

उमलत्या वयातील मुलामुलींना येथे घेऊन जाण्याचे कारण अगदी उघड आहे. त्यांची मने पूर्वग्रहरहित व संस्कारक्षम असतात. आपला इतिहास  व संस्कृती यांबद्दल त्यांच्या मनात कुतूहल जागृत करण्याचे हे योग्य वय आहे.

आमचा हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे अगदी आनंदात सुरू आहे. यावर्षी त्यात एक उल्लेखनीय भर पडली. मुंबईजवळील मनोरी बेटावर एक दुर्लक्षित व अप्रसिद्ध असे ईस्ट इंडियन म्युझियम आहे. त्याचे विश्वस्त व चालक यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालय दिनाचे औचित्य साधून एका कार्यक्रमाचे आयोजन केले व इतिहासतज्ज्ञ, पुरातत्त्ववेत्ते, ग्रामस्थ व आमचा तरुण परिवार यांच्या उपस्थितीत या वस्तुसंग्रहालयाचे ‘‘काका बाप्तिस्ता ईस्ट इंडियन म्युझियम’’ असे नामकरण केले.

राजकीय किंवा इतर कशाहीपेक्षा यातील सांस्कृतिक संदर्भ सर्वाधिक महत्त्वाचा आहे. ब्रिटिशांनी आणलेली ईस्ट इंडियन संस्कृती ही आता भारतीय संस्कृतीचाच भाग आहे. या वस्तुसंग्रहालयाने केलेल्या सांस्कृतिक गुंतवणुकीचे आपण एक साक्षीदार होणे, हा आमच्या वाटचालीतील आनंदक्षण होता.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:19 am

Web Title: international museum day
टॅग : Museum,Premache Prayog
Next Stories
1 वसुधव कुटुम्बकम्।
2 तृतीय नेत्र
3 शांततामय क्रांती
Just Now!
X