‘‘घराचं अगदी मैदान करून टाकलं आहे मुलानं. नुकताच फुटबॉल सीझन संपला, विम्बल्डन आटोपलं, कबड्डी सुरू आहे आणि ऑलिम्पिकचं वारं सुरू झालं आहे. मधूनच तोंडी लावायला कुठे कुठे क्रिकेट असतंच. हा घरी आला की रिमोट ह्यच्या ताब्यात. आमच्या नेहमीच्या मालिका, बातम्या बघूच देत नाही. या खेळानं कुणाचं कधी कल्याण केलं आहे का? जिंकणारे करोडपती आणि त्यांच्या विजयावर फेटे उडवणारे हे रोडपती..’’

मामला जरा गंभीर होता. बरेच दिवसांची मालिकांची उपासमार अगदी तळमळून व्यक्त होत होती. आम्हाला काही सुचेना. त्यांचा राग खेळावर आहे की त्या उपासमारीच्या कारणावर, हे नीटसे स्पष्ट होत नव्हते, पण एकदम धागा सापडला.

‘‘अहो, तुम्ही तुमच्या कॉलेजचे बॅडिमटन चॅम्पियन होतात ना? आणि तुमच्या फॅनक्लबमधूनच तुमच्या संसाररथाला सुरुवात झाली ना?’’

त्यांच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव पालटले. भूतकाळाच्या सुखद स्मृती जाग्या झाल्यासारख्या वाटल्या. पण त्यांच्या पुढच्या बोलण्याने एकदम धक्का बसला.

‘‘हो, त्या काळात डोक्यात बॅडिमटनशिवाय दुसरं काही नव्हतं, पण तो काळही वेगळा होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी आणि पुढची गाडी सुरळीत सुरू व्हायची. त्यात मी कायम सेकंड क्लास पॅसेंजर. माझ्याकडून इतरांना काय मला स्वत:लाही फार अपेक्षा नव्हत्याच. त्यामुळे बॅडिमटनमध्ये वेळ घालवल्याने फार नुकसान झालं नाही. आता असं करून कसं परवडायचं? शाळेपासूनच आम्ही त्याला अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं आहे आणि सर्व प्रकारच्या खेळांपासून त्याला अगदी कौशल्याने दूर ठेवलं आहे. उगाच मोठं झाल्यावर नसती भानगड नको.’’

का बरं त्यांच्यासारख्या क्रीडापटूने असं करावं? काळ खरंच इतका बदलला आहे की आपल्या समजुतीत आमूलाग्र परिवर्तन झालं आहे? त्यांच्या मुलाबद्दल आम्हाला जरा सहानुभूती वाटू लागली.

‘‘अहो, तुम्ही एवढे पट्टीचे खेळाडू; तुमच्याशिवाय जीवनातलं खेळाचं महत्त्व कोणाला चांगलं कळणार? आणि आपल्या बालपणीच्या केवढय़ा तरी आठवणी खेळाशीच निगडित असतात. मग तुमच्या मुलाला..’’

आम्हाला एकदम मध्येच थांबवून विजयी स्वरात ते बोलू लागले, -‘‘तेच तर! खेळ आणि त्यातली भांडणे, मारामाऱ्या. कोणी सांगितलंय याच्या फंदात पडायला. खेळायला बाहेर गेला की तासन्तास तेथेच रमणार, वेळ वाया घालवणार, नवनव्या शिव्या शिकून येणार (?), हायजिनची पूर्ण- वाट लागणार (??)..’’

त्यांच्या एकेका शब्दाबरोबर आम्ही अधिकाधिक अचंबित होत होतो. खेळांचे हेसुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात याची तर आम्ही कल्पनाच केली नव्हती. आम्हाला भाबडेपणाने असे वाटत होते की खेळांमुळे आपली शारीरिक तंदुरुस्ती राहते, खिलाडूवृत्ती वाढीस लागते, इ. इ. त्यांचं बोलणं ऐकून आमची जवळपास खात्रीच पटली की आम्ही अत्यंत बुरसटलेल्या विचारांचे आहोत.

‘‘आणि एवढा वेळ वाया घालवून या खेळांच्या मदानांवर काय सचिन तेंडुलकर आणि सानिया मिर्झा घडताहेत का? तर नाही. आपली मुले केवळ छंदच जोपासत बसणार. व्यावसायिक खेळाडू होण्याचे नावच नको. मग कुणी सांगितलंय त्याच्या वाटेला जायला?’’

‘‘का बरं? केवळ तेंडुलकर किंवा सानिया घडले तरच तो खेळ महत्त्वाचा का? खेळाला खेळ म्हणून काहीच महत्त्व नाही का?’’

‘‘तुम्ही सांगा, फक्त टाइमपासव्यतिरिक्त त्याला काय महत्त्व आहे?’’

‘‘खरं तर हे तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडलं असतं, पण ठीक आहे. खेळांमुळे आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहतं, मुलं संघभावना शिकतात, एकमेकांशी सहकार्य करून एखादं उद्दिष्ट सहजपणे गाठता येतं हे शिकतात, पराभव पचवायला शिकतात, खिलाडूवृत्ती जोपासली जाते, एखादी गोष्ट निर्हेतुकपणे करूनही त्यातून निखळ आनंद मिळतो, हे खेळांमुळेच मनावर िबबते.’’

‘‘हे सर्व निबंधात वाचायला छान आहे, पण प्रत्यक्षात खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय. आणि खिलाडूवृत्तीचं काय घेऊन बसलात? आजचा जमाना कििलग स्पिरिटचा आहे, स्पोर्ट्समन स्पिरिटचा नाही.’’

‘‘हो तर, प्रत्येक गोष्ट कििलग स्पिरिटने करायची, आणि त्यात काही कारणाने यश आलं नाही तर डिप्रेशनमध्ये जायचं, नाही का? तुमचा मुलगादेखील अशी चिडचिड, नराश्य यांचा अनुभव घेतो ना?’’

त्यांना एकदम काय बोलावं ते सुचेना. आम्ही नकळत त्यांच्या वर्मा-वर बोट ठेवले. पण हे केवळ त्यांच्या बाबतीत नाही, तर स्पर्धेच्या युगात बालपण हरवलेल्या सर्वच मुलांच्या बाबतीत खरं आहे. पूर्वी खेळण्या-बागडण्याच्या वयात मुलामुलींच्या अंगावर जबाबदारीचं ओझं पडलं की त्यांचं ‘बालपण हरवलं’ असं म्हणत. पण आज सर्वच मुलांचं बाल्य हरवलेलं दिसतं. बालपण व खेळणं, किंबहुना मानवी जीवन व खेळ यांचा अविभाज्य संबंध आहे. भोंडल्याचे खेळ, मंगळागौरीचे खेळ, दहीहंडी, रंगपंचमी.. वेगवेगळ्या सणांशी सर्व वयांच्या स्त्री-पुरुषांना खेळता येतील, असे नाना प्रकारचे खेळ आपण जोडले आहेत.

असे म्हणतात की परमेश्वराला एकटे राहण्याचा कंटाळा आला म्हणून त्याने विश्व निर्माण केले आणि ते कसे केले? ‘लीलया एव’-खेळासारख्या सहजतेने. संत तुकारामांनी पंढरपूरला वारीसाठी जमलेल्या भाविकांचे इतके सुंदर वर्णन केले आहे, -‘‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई। नाचती वैष्णव भाई रे।’’ हे वरवर पाहता वारीचे वर्णन असले तरी जग आणि जगातील लोक यांच्यावर केलेले सुरेख रूपकच आहे. जग म्हणजे क्रीडाभूमी आणि आपण त्यात खेळणारे सवंगडी! कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे यांचे शब्द वापरायचे तर ‘ बघता बघता दिनमान, खेळता खेळता आयुष्य’ अशी भावना सर्वानी बाळगली तर सर्वाच्याच आयुष्यातील निरागसता दीर्घकाळ टिकून राहील, नाही?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com