पाच सप्टेंबर हा दिवस भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या परंपरेत गुरू व शिक्षक या दोन स्वतंत्र कल्पना आहेत. गुरूचे स्थान केवळ शिक्षणक्षेत्रात नाही, तर ते आपल्या सर्व जीवनाला व्यापून उरणारे आहे. तसेच गुरू केवळ अध्यापनाच्या माध्यमातून शिष्याला घडवत नाही, तर आपले व्यक्तित्व, वर्तन व मौन यांतूनही शिष्याला आकार देतो. गुरू हा पेशा नव्हे; पण शिक्षक हा अत्यंत उदात्त पेशा आहे.  शिक्षक हा संपूर्ण शिक्षणव्यवस्थेचाच आधारस्तंभ असतो. अध्यापन हे त्याचे प्रमुख माध्यम असते. सर्व प्रकारची आधुनिक ज्ञानसाधने वापरून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे पवित्र कार्य शिक्षक करत असतो. त्या पेशाला अत्यंत उच्च स्थान प्राप्त करून देणाऱ्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींचा, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिन आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन् म्हणजे शिक्षकी पेशाचा मूर्तिमंत सन्मान! म्हणूनच या व्यवसायात असणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल व शिक्षक दिनाबद्दल आत्मीयता वाटायला हवी.

मात्र शिक्षकीपेशाला प्रसिद्धीचे वलय नाही. आज ‘आदर्श शिक्षक पुरस्कार योजना’ वगैरे सुरू झाल्या असल्या, तरी ‘आपण अमुक एका शिक्षकाचे विद्यार्थी आहोत’ असे कोणी अभिमानाने सांगणे हाच त्या संबंधित शिक्षकाला मिळणारा सर्वोच्च पुरस्कार असतो. म्हणूनच शिक्षक असणे हा सर्वसामान्य व्यवसाय नव्हे, तो ध्यास आहे, ती साधना आहे.

Ramnavami 17th April 2024 Panchang & Rashi Bhavishya
रामनवमी, १७ एप्रिल पंचांग: मेष- मीन, प्रभू श्रीराम कुणाला पावणार? कुणाच्या कुंडलीत प्रेम, पद, पैसे प्राप्तीचा योग?
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
Aditya Thackeray
‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका
Vikramsingh Sawant
मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय – आमदार सावंत

‘‘काय हो, सध्याच्या शिक्षकांकडे बघूनसुद्धा तुम्हाला असं म्हणायचं धाडस होतं? तुमच्या डोळ्यांवर आदर्शाची पट्टी बांधलेली असली तरी त्यामुळे वास्तव बदलत नाही.’’

‘‘आम्ही आदर्शाना कवटाळून बसलेलो नाही. आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत ते केवळ आम्हाला घडवणाऱ्या शिक्षकांमुळेच, अशी आमची रास्त भावना आहे आणि आम्हाला खात्री आहे की, तुम्हालाही असेच वाटत असेल.’’

‘‘त्याबद्दल वादच नाही. आपल्या शिक्षकांचे आपल्यावरील ऋण कधीच फिटणार नाही. पण तो भूतकाळ झाला. आम्ही वर्तमानाबद्दल बोलत आहोत आणि ज्यांना आदराने नमस्कार करावा असा एकही शिक्षक आज विद्यार्थ्यांच्या समोर नाही, हे आजचे वास्तव आहे.’’

‘‘पण हा एकतर्फी मामला नाही. आज शिक्षकांसमोरही चिकाटीने घडवावं असा एकही विद्यार्थी नाही.’’

‘‘असं कसं म्हणता? विद्यार्थी शाळेत जातात ते शिकायलाच ना?’’

‘‘हो, पण ज्या शाळेत ते जातात, त्या शाळेबद्दल, तेथील शिक्षकांबद्दल घरात किती आदराने बोललं जातं? आपल्या शिक्षकांबद्दल आपण आदर बाळगायला हवा, हा संस्कार घरात त्यांच्या मनावर होतो का?’’

‘‘आदर असा मागून मिळवायचा नसतो.’’

‘‘मान्य! आणि तो धाकाने वसूलही करायचा नसतो. पण आमचा मुद्दा मूलभूत आहे. ‘आदरभावना’ मुलांच्या मनातून समूळ नष्ट झाली आहे. त्यामुळे ज्यांच्या मनात आपल्याबद्दल यत्किंचितही आदर नाही त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कडवे आव्हान आज शिक्षकांसमोर आहे.’’

कटू असले तरी हेच आजचे वास्तव आहे. शिक्षक आज अध्यापनाव्यतिरिक्त इतर अनेक कामांना जुंपलेले असल्यामुळे आपला व्यासंग वाढवण्याइतका वेळ व बळ त्यांच्याकडे शिल्लक नाही. अर्थात, ज्यांना स्वत:च्या प्रगतीची तीव्र आस असते ते या अडचणींवरही मात करतात. पण दुसरे आव्हान अतिशय गंभीर आहे. आज तंत्रज्ञानाच्या सहज सार्वत्रिक उपलब्धतेमुळे अद्ययावत् माहितीसंकलनात विद्यार्थी शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत, आणि नवीन संशोधनाच्या बाबतीत शिक्षकांजवळील माहिती जुनी आहे, असे चित्र बघायला मिळत आहे. आणि यामुळेही कदाचित शिक्षकांविषयीच्या अनादरात भर पडत आहे.

यासाठी एक चांगला उपाय म्हणजे ‘शिक्षक दिन’ अर्थपूर्णरीत्या साजरा करणे. तसा तो पाच सप्टेंबरला सर्वच शाळांमध्ये साजरा करतात. त्या दिवशी विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत असतात व वेळापत्रक आखणे, वर्ग सांभाळणे, तास घेणे, मुख्याध्यापकांच्या जबाबदाऱ्या सांभाळणे अशी सर्व कामे हौसेने करतात. पण ते एक दिवसाचे नाटक असते व त्याचा खेळ संपला की पुन्हा मागील पाढे पंचावन्न! यामध्ये थोडा बदल करावा म्हणून आमच्या समविचारी मित्रांनी शिक्षक दिनाला शाळेत जाऊन शिक्षकांना शुभेच्छा देण्याचे ठरवले. त्या दिवशी आपल्या जवळपासच्या सर्व शाळांमध्ये जायचे, मुख्याध्यापकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा, सर्व शिक्षकांना फूल व मिठाई देऊन सर्वाना पायावर मस्तक ठेवून नमस्कार करायचा; हे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसमोर करायचे.

हा उपक्रम गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या गावांतील व शहरांतील आमचे समविचारी स्नेही करीत आहेत. याने काय साध्य होईल? ज्या शिक्षकांना आपण रोजच भेटतो, ते आदरणीय आहेत, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबायला मदत होईल. आईवडील हे आपल्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात, यात वादच नाही. पण आता गंमत अशी आहे की आईवडील हे मित्रमैत्रिणीच्या भूमिकेत शिरले आहेत आणि त्या नात्यातील अनौपचारिकता वाढली आहे. त्या तर्कशास्त्राने मुलांचे शिक्षकांप्रती असणारे गांभीर्यही कमी झाले आहे. परंतु आईवडिलांची व शिक्षकांची तुलना करता येणार नाही. शिक्षक एकावेळी अनेक आईवडिलांच्या मुलामुलींशी जोडलेले असतात. प्रेम, शिस्त, धाक व शिक्षा अशा सर्व आयुधांचा गरजेनुरूप वापर करून ते ज्ञानदानाचे कार्य करतात. मुलांकडे माहितीचा साठा भरपूर असेल, पण त्या साठय़ाचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य देऊन शिक्षक मुलांना आयुष्यभराची ठेव देतात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचं सर्वात मोठं बक्षीस म्हणजे त्यांच्या व विद्यार्थ्यांमधील आत्मीयतेचे बंध. विद्यार्थी व शिक्षकांमधील सुदृढ नाते हा प्रगतिशील समाजजीवनाचा पाया आहे. आज काही कारणाने त्यांच्यातील नाते वाळवंटासारखे रखरखीत झाले असले तर तेथे प्रेमांकुराचे बीज आपण पेरायला हवे. हा प्रेमाचा प्रयोग आहे. त्याला यश यायला किती काळ लागेल ते माहीत नाही, पण शिंपलेल्या प्रेमाला अंकुर नक्की येतील, हा आमचा विश्वास आहे.

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अत्यंत आदरपूर्वक प्रणाम!
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com