News Flash

चिरंतन कोडे

‘वृद्धांना काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब करून यमसदनी धाडणे’

35-lp-manaliको हं? हा मानवाचा शोध एक आदिम ध्यास आहे. देहभावनेच्या पलीकडे जाऊन अमृतत्वाचा अनुभव घेण्याचा छंद मानवाने प्राचीन काळापासून जोपासला आहे आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावाही केला आहे. त्या देहातीततेच एकदा प्रचीती आली की शरीराचे येणे-जाणे म्हणजे केवळ जुने कपडे बदलून नवीन कपडे चढवल्यासारखेच वाटू लागते. भारतीय माणसाचा हा विचार भगवद्गीतेत ‘‘वासांसी जीर्णानि.’’ या श्लोकात अगदी स्पष्टपणे व्यक्त झाला आहे.

साने गुरुजींनी आपल्या ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथात या बीज कल्पनेला ‘मृत्यूचे महाकाव्य’ असे संबोधले आहे आणि अनेक वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधारे मृत्यूकडे पाहण्याचा भारतीय परंपरेतील सकारात्मक दृष्टिकोन उलगडून दाखवला आहे. मृत्यू म्हणजे नवीन प्रारंभासाठी आधीचे जुनाट आयुष्य संपवण्याचे निसर्गाने दिलेले वरदानच जणू!

विलक्षण विचार आहे की नाही? पण तुम्हा- आम्हांसारख्या सर्वसामान्यांना तो कसा पचनी पडायचा? आपल्याला मृत्यू ही आयुष्याची अखेरच वाटते ना! बरं, हादेखील काही आधुनिक किंवा बाहेरून आयात केलेला विचार नाही. भारतीय परंपरेतील दर्शने ज्याप्रमाणे अनादि-अनंत तत्त्वाची कास धरतात, त्याचप्रमाणे लोकायतांसारखे इहवादी दर्शन ‘भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?’’ असे जाहीर करून अमरत्व, देहातीतता वगैरे सर्व नाकारते. खरंच काय आहे हे मृत्यूचं कोडं?

आत्ताच हे कोडं पडण्याचं कारण म्हणजे मृत्यूबद्दल अचंबित करणारी माहिती आमच्या हाती आली आहे. ही माहिती तमिळनाडूच्या दक्षिण भागात प्रचलित असलेल्या ‘थलाईकूठल’ या प्रथेविषयी आहे. थलाईकूठल म्हणजे ‘वृद्धांना काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब करून यमसदनी धाडणे’. एक प्रकारचे लादलेले दयामरणच!

ही प्रथा बऱ्याच काळापासून अस्तित्वात आहे. त्यानुसार वृद्ध व्यक्तीला भल्या पहाटे भरपूर तेलाने मालिश केले जाते. त्यानंतर पेलेच्या पेले भरून शहाळ्याचे पाणी पाजले जाते. त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला प्रचंड ताप येतो, फिट्स येतात आणि एक दोन दिवसांत ती हमखास मृत्यू पावते. याचाच वेगळा प्रकार म्हणजे वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला अतिथंड पाण्याने मसाज करणे. यामुळे शरीराचे तापमान अत्यंत कमी होऊन खात्रीने हृदयक्रिया बंद पडते. अजूनही काही पद्धती आहेत आणि हे बेकायदेशीर असले तरी सर्रास चालते. घरातील कुटुंबीय इतर नातेवाईकांना याची आगाऊ कल्पना देतात, म्हणजे यात लपवाछपवीचा मामला नसतो. कदाचित त्यांना वेळेवर मरण देणे ही त्यांच्याविषयीचे प्रेम व्यक्त करण्याची न्यारी रीत असावी. याविरुद्ध कोणी पोलिसांत तक्रारही केल्याचे ऐकिवात नाही, उलट अनेक वृद्ध व्यक्ती स्वत:हूनच अशा मरणाची मागणी करतात.

काय असेल यामागची मनोभूमिका? मृत्यू ही एक अटळ घटना आहे. मग का लोकांना जाणूनबुजून मृत्यूला कवटाळावेसे वाटते? पुढच्या पिढीसाठी जागा रिकामी करायची असते का? की आपल्या आयुष्याचा इतका कंटाळा आलेला असतो? की यानंतर पुढे काय असेल याचे अनावर कुतूहल चैन पडू देत नाही? की आणखी काही? पण यातले काहीही कारण असले, तरी यापद्धतीने मृत्यूला आमंत्रित करणे म्हणजे आत्महत्याच नाही का? ती करण्याचा अधिकार मनुष्याला कोणी दिला? आपला जन्म आपल्या हातात नाही, तर आपला मृत्यू ठरवण्याचा हक्क आपल्याला कसा काय प्राप्त होतो? किंवा एका मनुष्याच्या वतीने इतर लोक हे कसं काय ठरवू शकतात? मृत्यूमध्ये इतकं आकर्षित करण्यासारखं काय असतं?

पण असं सरसकट विधान करावं, तर जीवनाची आसक्तीही तेवढीच प्रभावी असते.

थलाईकूठलची प्रथा निर्विघ्नपणे सुरू राहिली असती; पण २०१० मध्ये एका ८० वर्षे वयाच्या गृहस्थाने या मृत्यूच्या सापळ्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, आपल्या नातेवाईकांच्या घरात आश्रय घेतला व पोलिसांत आपल्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार नोंदवली.

मानवाची जीवनेच्छा ही अशी प्रबळच असते आणि ती मनुष्याला सर्व शारिरिक दुर्बलतेवर मात करून जिवंत राहण्याची प्रेरणा देते.

जन्म व मृत्यू, जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकीला झाकावे दुसरी समोर येते. त्यांचं अटळपण आपण तटस्थपणे स्वीकारू शकत नाही असेच दिसते. जगण्याची आसक्ती वाढली की आपण मृत्यूला दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो; आणि मृत्यूचे आकर्षण वाढले की आहे ते जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. मानवी मन कायम या दोन बिंदूंमध्येच हेलकावे खात राहणार का? या दोन बिंदूंपासून एकसमान अंतर राखणे आपल्याला कधी जमणार नाही का?

प्राचीन दार्शनिकांनी या प्रकारच्या प्रश्नांसाठी विपुल मार्गदशन केलेले दिसते. त्यांना जन्म मृत्यू या शारिरिक घटनांपेक्षा अमृतत्वासारख्या शरीरात अवस्थेमध्ये विशेष रस होता. जन्म किंवा मृत्यू यांत मानवाला साध्य करण्यासारखे काही नसते; आणि जे साध्य करण्यासारखे असते त्याचा जन्म किंवा मृत्यू यांपैकी कशाशीच संबंध नसतो. ज्यांना मानवी जीवनाच्या या सत्याचे दर्शन घडले, त्यांनी इतर कशाही पेक्षा कृतार्थ जीवन जगण्याचा ध्यास घेतला व तोच आदर्श मानला. याच भावनेने तुकोबांनी ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ असे उद्गार काढले असावेत. येथे आपल्याला हे सहज लक्षात येईल की तुकोबा ज्याला ‘मरण’ म्हणत आहेत ते थलाईकूठलवाल्या मरणापेक्षा अगदी निराळे आहे. सर्व प्रकारच्या हीनतेचा, अहंकाराचा व देहभावनेचा अंत व आत्मिक रात्रीचा अंधकार दूर झाल्याचा तो आनंद आहे, ‘अनुपम सुखसोहळा’ आहे. याच अवस्थेला उद्देशून ‘जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो’ असे बाकीबाव बोरकर म्हणाले असावेत.

अशा कृतार्थ व्यक्ती मानवतेच्या सहवेदनेने ओतप्रोत भरलेल्या असतात, त्यात आपला देह चंदनासारखा झिजवतात.

ही सहजावस्था आल्यावर शरीराचे जगणे मरणे काय महत्त्वाचे? कोडेच आहे नाही? शरीरात राहून शरीरभाव टाकून द्यायचा?  बघा, तुम्हाला हे कोडे सुटते का?
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:17 am

Web Title: thalaikoothal
टॅग : Premache Prayog
Next Stories
1 णमो अरिहन्ताणम्
2 विश्वशाही
3 येशूला वंदन!
Just Now!
X