20-lp-minalसर्व जगभरात आठ जून हा दिवस ‘सागरी दिन’ म्हणून साजरा करावा, अशी संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ साली घोषणा केली. त्यानुसार ‘दी ओशन प्रोजेक्ट’ व ‘दी वर्ल्ड ओशन नेटवर्क’ या संघटना संयुक्तपणे आठ जून या दिवशी जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ‘सागरी दिना’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. आपण भूतलावर ज्या सहजपणे वावरतो, तशाच सहजपणाने समुद्राकडेही आपण पाहावे, त्याबाबत गंभीरपणे विचार करावा, असा ढोबळमानाने या दिवसाचा उद्देश सांगता येईल.

‘‘गुढी पाडव्याला तुम्ही सागरी संस्कृतीची आपल्या सर्वाना ओळख व्हावी म्हणून कार्यक्रम केला होतात ना? मग आता पुन्हा सागरी दिनाच्या निमित्ताने काय करणार?’’

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

‘‘अहो, दोन कार्यक्रमांच्या उद्देशात मूलभूत फरक आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आपला धार्मिक सांस्कृतिक उत्सव व वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगी आपल्या सागरी बांधवांच्या ज्ञानाचा वापर करून त्यांना कॅन्सरग्रस्तांच्या हृदयात प्रेमाची गुढी उभारता यावी, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले. जागतिक सागरी दिनाच्या आपल्या धार्मिक सांस्कृतिक संदर्भाशी काही संबंध नाही. तो जागतिक पातळीवरील कार्यक्रम आहे.’’

‘‘मग तो साजरा करण्यासाठी तुम्ही काहीतरी भन्नाट कल्पना वापरली असेल?’’

‘‘भन्नाट होती का ते माहीत नाही, पण अभिनव मात्र नक्की होती. आमची सर्व समविचारी मित्र मंडळी आठ जून रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या काळात कच्छ, कोचीन, कलकत्ता व पुढे मिझोरामपर्यंत प्रत्येक ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यावर जमली आणि आपल्या चिरंतन सख्याला, सागराला, त्यांनी प्रणाम केला. त्याच्या पाण्यात पाय बुडवले व ओंजळभर पाणी आपल्या तोंडावरून फिरवले. आपल्या भारतमातेच्या सागरकिनाऱ्यावर ही प्रेममाला वाहण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. असा प्रयोग प्रथमच झाला. भारतातील प्रत्येक सागरतीरावर त्या कालावधीत आमची स्नेहीमंडळी व स्थानिक एकत्र जमून सागराला वंदन करतील, याचे आम्ही व्यवस्थित नियोजन केले होते.’’

‘‘याने काय साध्य झाले? एक दिवसाच्या नमस्काराने चाचेगिरी, समुद्री दहशतवाद, स्मगलिंग थांबणार आहे का? की समुद्रातील प्रदूषण एकदम थांबणार आहे?’’

‘‘तुम्ही तर एक दिवसाच्या नमस्काराकडून चमत्काराची अपेक्षा करू लागतात. जगात जर असे चमत्कार घडायचे असतील तर, ज्ञान आणि विज्ञान कशाला पाहिजे? लोक सिद्धी प्राप्त करतील व चमत्कारांच्या बळावर हवं ते मिळवतील. पण असं घडताना दिसत नाही ना? सातत्यपूर्ण प्रगती करायची असेल तर चिकित्सक ज्ञान व वैज्ञानिक संशोधन या दोन्हींची कास धरायला हवी. पण आपण इतिहास, पुराणे यांच्याकडे शोधक बुद्धीने बघत नाही आणि त्यांच्यातून काहीही धडे घेत नाही.’’

‘‘आता यात पुराणांचा काय संबंध?’’

‘‘तुम्हाला समुद्रमंथनाची गोष्ट आठवते? आपण सर्वानी ही गोष्ट बालवयात ऐकली आहे. देवदानवांनी मेरू पर्वताची रवी करून समुद्राचे मंथन केले व त्यातून चौदा रत्ने बाहेर काढली. त्यावरून समुद्राला रत्नाकर असे नाव पडले. पण आपण त्या रत्नांना वैज्ञानिक परिभाषेत भाषांतरीत करण्याचा प्रयत्नही केला नाही.’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘समुद्रमंथनातून अमृत मिळाले, हे लक्षात आहे ना? आता ‘अमृत’ याचा शब्दश: अर्थ घेण्यापेक्षा ‘दुर्धर रोगावरील औषध’ असा अर्थ घेऊन सागरी वैद्यक शास्त्राचा विकास करण्याएवढी वैज्ञानिक प्रगल्भता आपण का अंगी बाणवू शकत नाही? पण त्यासाठी एकूणच सागराकडे गांभीर्याने बघायला हवे. मध्यंतरी मुंबईत ‘मेरिटाईम इंडिया समिट’ हे प्रदर्शन भरले होते. त्यामध्ये परदेशी लोकांनी केलेली समुद्राशी संबंधित अद्ययावत प्रगती बघायला मिळाली. कोरियासारख्या लहानशा देशात संशोधकांनी समुद्रावर तरंगती घरं बांधण्याचं कौशल्य विकसित केलं आहे. समुद्री शेती, सागरी वैद्यक यांवर विविध प्रयोग विविध सागरविज्ञान विद्यापीठांमध्ये सुरू आहेत, हे सर्व पाहून आपल्या मागासलेपणाची बोच अजूनच तीव्र झाली. आपण अजून मासेमारी, पर्यटन यांमध्येच रांगत आहोत.’’

‘‘अहो, हे आपले पारंपरिक  व्यवसाय आहेत.’’

‘‘बरोबर आहे. पण इतर क्षेत्रांत आपण परंपरा ओलांडून आधुनिक झालो की नाही? मग समुद्राच्या संदर्भातच मागे का? एक साधं उदाहरण घ्या. आज सबंध भारत दुष्काळाच्या झळांनी होरपळत आहे. पण त्यावरचा मार्ग म्हणजे ‘पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन’ हाच पारंपरिक विचार आपण करतो. ते नियोजन महत्त्वाचं आहेच, पण त्याबरोबरच आपला जो सनातन सखा समुद्र, त्याच्याकडे आपण अक्षय जलस्रोत म्हणून का बघू शकत नाही? एवढा विशाल सागरकिनारा लाभूनही आपल्याला त्याचे मोल नाही, हे दुर्दैवी आहे.’’

हा दूरदृष्टीचा व संशोधक वृत्तीचा अभाव पुढच्या पिढय़ांपर्यंत पाझरू नये, त्यांना ज्ञानाच्या विशाल दिशांची व क्षेत्रांची ओळख व्हावी म्हणून आम्हाला ‘सागरी दिना’च्या कार्यक्रमाचे  विशेष महत्त्व वाटते. पण आमचा कार्यक्रम हा केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित नाही. मनुष्याची वाईट खोड आहे. एखादी नवीन गोष्ट हाती लागली की त्याचा अगदी चावून चोथा करायचा. तसे समुद्राच्या बाबतीत होऊ नये, म्हणून समुद्राविषयी आत्मीयता आपल्या मनात रुजवावी लागेल. वैज्ञानिक झेपेला हे प्रेमाचे अस्तर लावणे, भूमातेइतकाच सागराविषयी आदर व प्रेमभाव बाळगणे, आम्हाला महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मस्तकात वैज्ञानिक प्रगतीचे विचार व हृदयात अथांग सागराबद्दलचे प्रेम घेऊन आम्ही ‘सागर दिन’ साजरा केला.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com