53-lp-dr-manaliअलीकडेच पार पडलेला एक मे हा दिवस जागतिक व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवर महत्त्वाचा आहे. स्थानिकदृष्टय़ा त्याचे महत्त्व म्हणजे तो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस आहे. मराठी भाषीकांचे स्वतंत्र राज्य, मराठी अस्मिता, प्रागतिकता, सुसंस्कृतता या सर्व घटकांना नकाशावर स्वत:चे स्थान मिळवून देणारा दिवस म्हणजे एक मे. समर्थ रामदासांनी काही शतकांपूर्वी लिहून ठेवले आहे- ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा॥’ या वचनाची भौतिक पूर्तता म्हणजे महाराष्ट्र दिन.

एक मेचे जागतिक महत्त्व म्हणजे तो कामगार दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जगाच्या इतिहासाला आमूलाग्र बदलून टाकणाऱ्या आणि जगाच्या नकाशावर लाल रंगाची व्याप्ती वाढवणाऱ्या कार्ल मार्क्‍सच्या कामगार लढय़ाचा सन्मान म्हणून एक मे हा युनेस्कोच्या जाहीरनाम्यानुसार जगभरात ‘कामगार दिन’ म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत साजरा केला जातो.

श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या श्रमांना मिळालेल्या या वैश्विक पाठबळाला वर्गसंघर्षांची गडद किनार आहे. कारखानदार, गिरणीमालक इत्यादींचा समावेश असणारा ‘आहे रे’ गट व त्यांच्या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा ‘नाही रे’ गट यांच्यामध्ये वेतन, नफ्यातील हिस्सा आणि एकूणच श्रमांची प्रतिष्ठा यावरून सुरू असणाऱ्या प्रदीर्घ रस्सीखेचीमध्ये बराच काळ भांडवलदारांचे, ‘आहे रे’ गटाचे पारडे जड होते. पण ‘जगभरातील कामगारांनो, एक व्हा’ या कार्ल मार्क्‍सच्या बुलंद हाकेने गरीब कष्टकरी वर्गाला बरेच पाठबळ मिळाले, त्यांना वाली मिळाला आणि पुढचा इतिहास म्हणजे जगाच्या इतिहासाचे एक खुले पानच आहे. मॅक्झिम गॉर्कीच्या ‘आई’ या कादंबरीत या इतिहासाचे रोमांचक व हृदयस्पर्शी चित्रण वाचायला मिळते.

‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यातील या कडवट संघर्षांमुळे आमच्या मनात एका प्रश्नाचा किडा वळवळला; कुठल्याही दोन गटांमध्ये नेहमी संघर्षच का असतो? जेथे जेथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गट असतील, तेथे तेथे ईष्र्या, स्पर्धा, मत्सर, पिळवणूक, हेवेदावे यांच्या बंदुका परस्परांवर रोखलेल्याच असतात. आपल्यासमोर उभा असलेला कायम आपला ‘शत्रुपक्ष’च असतो, असे का? पालक मुले, शिक्षक विद्यार्थी, व्यवस्थापन कर्मचारीवर्ग, रिक्षा-टॅक्सीचालक प्रवासी, दुकानदार ग्राहक अशी किती उदाहरणे द्यावीत? यातील प्रत्येक गट दुसऱ्या पक्षाकडे आपला शत्रुपक्ष म्हणून पाहतो.

पूर्वी वाचलेली एक गोष्ट आठवली. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास खोली तयार केली व तेथे ‘हिट मी’सारखी काही खेळणी ठेवली. आपल्याला ज्याचा खूप राग येतो किंवा तत्सम नकारात्मक भावना ज्याच्याबद्दल निर्माण होतात तो आपल्यासमोर उभा आहे अशी कल्पना करून त्या ‘हिट मी’ बाहुलीला जोरजोरात गुद्दे मारायचे, आपला राग शमवायचा व रागमुक्त मनाने परत काम सुरू करायचे, अशी ती खास सुविधा होती.

व्यवस्थापनाची पण कमाल आहे. कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी काय काय करतील! पण त्यांपकी एकालाही असे वाटले नाही की, समजा, एखाद्याला दुसऱ्याची स्तुती करायची असेल किंवा ‘थँक यू’ म्हणायचे असेल तर त्या बाहुल्यांना प्रेमाने आलिंगन देण्याचे सुचवावे.

आपल्या मनात सहजपणे इतरांबद्दल सद्भावना येणे कठीणच दिसते. आपल्या शंका-कुशंका, संशयी वृत्ती किंवा अशाच प्रकारच्या घटकांमुळे ‘पेला अर्धा रिकामा आहे’ अशा छापाचे विचार आपल्या मनात उद्भवतात. भारतीय तत्त्वपरंपरेतील आद्य मानसशास्त्र म्हणजे पातंजल योगदर्शन. त्यामध्ये एक सूत्र आहे ‘वितर्क बाधने प्रतिपक्षभावनम्।’. सोप्या शब्दांत याचा अर्थ सांगायचा तर वर उल्लेखलेले सर्व प्रकारचे वितर्क किंवा कुविचार हे आपले शत्रू आहेत अशी दृढ भावना ठेवून त्यांच्या विरोधी विचारांचे, म्हणजे अर्थात सद्विचारांचे चिंतन मनुष्याने करावे.

जैन दर्शनाच्या अनेकान्तवादाने हा संघर्ष कमी करण्याची एक युक्ती सांगितली आहे. आपल्याला विरोधी वाटणारा विचार हा मूलत: विरोधी नसून तो आपल्या विचारापेक्षा फक्त भिन्न दृष्टिकोनावर आधारित आहे, हे समजून घेतले तर शत्रुत्वाची भावना बोथट होते.

अरे वा! ‘आहे रे’ व ‘नाही रे’ यांच्यातील संघर्षांची धार कमी करण्यासाठी आपल्या दार्शनिक प्रज्ञेची व प्रेमाच्या मार्गाची मदत घेता येईल का?

आमच्या समविचारी स्नेह्य़ांनी जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने असा प्रयोग करून बघण्याचे ठरवले.

पगारवाढीसाठी संप, आंदोलने करून कुठल्याही उद्योग आस्थापनांमध्ये शांतता सुसंवाद निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे कामगारकपात व व्यवस्थापनाची इतर धोरणेही शांतता सुसंवाद आणू शकत नाहीत. ‘मी या उद्योगाचा मालक आहे, तेव्हा माझाच शब्द खरा’ ही ‘आहे रे’ वर्गाची भाषा जितकी उद्दाम आहे, तितकीच ‘आमच्यामुळे उद्योगधंदे चालतात, तेव्हा आम्हीच निर्णय घेणार’ ही ‘नाही रे’ वर्गाची भाषाही एकांगीच आहे. कुठलेही व्यावसायिक आस्थापन हे एक सामूहिक कार्य असते व त्यात प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका असते.

या शांतताप्रिय भावनेने यापुढे एक मे या दिवशी व्यवस्थापन व कामगारवर्ग यांच्या प्रतिनिधींनी आस्थापनांच्या मुख्यालयात एकत्र यायचे, उद्बत्ती लावायची, फुले वाहायची व परस्परांना अत्यंत शांततेने शुभेच्छा देऊन तोंड गोड करायचे. भाषणे नाहीत की इतर औपचारिकता नाही.

यामुळे काय होईल?

एकमेकांविषयीच्या तीव्र भावना हळूहळू सौम्य व्हायला प्रारंभ होईल. हे एका दिवसात घडणार नाही. कदाचित आज ज्याची सुरुवात झाली त्याची फळे आपल्या हयातीत दिसणार नाहीत. पण बदल घडेल, हे निश्चित!

आमच्या स्नेही मंडळींनी ठिकठिकाणी जावून ही कल्पना पटवून दिली व आज हा कार्यक्रम अनेक आस्थापनांमध्ये केला जातो.

शांतता व सुसंवाद ही पुढाऱ्यांची मक्तेदारी नाही. आपण जनसामान्यही लहानशा कृतींमधून त्याचे बीजारोपण करू शकतो. एके काळी लाल क्रांतीने जगाचा इतिहास बदलवला. आम्हाला खात्री आहे, या प्रकारची शांततामय क्रांती जगात निश्चित परिवर्तन घडवून आणेल.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com