प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात दबंग दिल्ली संघाने अनपेक्षित कामगिरीची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला दबंग दिल्लीने 29-26 अशा फरकाने मात केली. गेल्या दोन हंगामांमध्ये गुजरातचा संघ आपल्या घरच्या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. मात्र अटीतटीच्या सामन्यात दबंग दिल्लीने शेवटच्या चढाईत गुजरातच्या खेळाडूची यशस्वी पकड करत सामन्यात बाजी मारली.

दोन्ही संघातील बचावपटूंनी कालच्या सामन्यावर आपलं वर्चस्व गाजवलं. चढाईपटूंना काल फारसे गुण कमावण्याची संधी मिळाली नाही. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दबंग दिल्लीचा कर्णधार जोगिंदर नरवालने या विजयाचं श्रेय आपल्या सर्व खेळाडूंना दिलं. “आम्ही मैदानात तिघेच राहिलो तर त्यांचा संयम सुटेल असा माझा अंदाज होता. 3 खेळाडू शिल्लक राहिल्यामुळे आम्हाला सुपरटॅकल करुन दोन गुण मिळवण्याची संधी होती. म्हणून चढाईमध्ये आम्ही फक्त बोनस पॉईंट घेण्याकडे भर दिला. ज्यावेळी गुजरातची अखेरची चढाई आली त्यावेळी सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक होती, आणि याचा फायदा घेत आम्ही पकड करुन बाजी मारली. ही कामगिरी आम्ही करु असा आत्मविश्वास आम्हाला होता व आम्ही तसं करुनही दाखवलं.”

दबंग दिल्लीचे प्रशिक्षक किशन कुमार हुडा यांनीही आपल्या खेळाडूंचं कौतुक केलं. “सर्व खेळाडू सामन्यात चांगले खेळले. या विजयामुळे आमचे पाठीराखे खूश होतील. गुजरातविरुद्ध सामन्यात आमच्या बचावपटूंनी कमाल केली. मी संघाच्या कामगिरीवर खूश आहे.” आज गुजरात फॉर्च्युनजाएंटला यू मुम्बाशी दोन हात करायचे आहेत. यू मुम्बानेही आतापर्यंत गुजरातला हरवलेलं नाहीये, त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.