प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर पहिल्यांदाच सामने खेळणाऱ्या दबंग दिल्लीने दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात दिल्लीने गुणतालिकेत तळाशी असलेल्या जयपूर पिंक पँथर्सचा 48-35 ने पराभव केला. दबंग दिल्लीकडून मिराज शेखने चढाईत तब्बल 15 गुणांची कमाई केली.

अवश्य वाचा – अनुप कुमार प्रो-कबड्डीला रामराम करण्याच्या तयारीत?

सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून दबंग दिल्लीने आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. मिराज शेख, नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत या त्रिकुटाने जयपूरच्या कमकुवत बचावाचा पुरेपूर फायदा उचलला. या तिन्ही खेळाडूंनी एकामागोमाग एक गुण घेण्याचं सत्र सुरुच ठेवल्यामुळे जयपूरचा संघ पहिल्या सत्रात पुरता बॅकफूटवर गेला. दिल्लीने मध्यांतरापर्यंत सामन्यात 29-10 अशी भक्कम आघाडी घेतली होती. दिल्लीकडून नवीन आणि चंद्रन रणजितने चढाईत प्रत्येकी 9-9 गुणांची कमाई केली.

दुसऱ्या सत्रात जयपूरच्या खेळाडूंना सामन्यात प्रतिकार करण्यास सुरुवात केली. दिपक निवास हुडाने जयपूरकडून आक्रमणाची धुरा सांभाळात दुसऱ्या सत्रात धडाकेबाज खेळ केला. दबंग दिल्लीच्या भक्कम बचावाला दिपकने खिंडार पाडत आपल्या संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. दिपकने सामन्यात तब्बल 20 गुणांची कमाई केली. त्याला अजिंक्य पवारनेही 6 गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र मोक्याच्या क्षणी बचावपटूंना आपल्या इतर खेळाडूंना साथ देता आली नसल्यामुळे दिल्लीने सामन्यात बाजी मारली.