आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणाऱ्या गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने हरयाणा स्टिलर्स संघाची झुंज मोडून काढत, शेवट गोड केला आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळामुळे गुजरातचे सामन्यात 40-31 अशी बाजी मारली. हरयाणाच्या चढाईपटूंनी सामन्यात चांगला खेळ केला, मात्र बचावपटू मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावू न शकल्यामुळे गुजरात सामन्यात विजयी ठरलं. या विजयासह गुजरातने अ गटात यू मुम्बाला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे.

गुजरातला यंदा घरच्या हंगामात दबंग दिल्ली संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. याव्यतिरीक्त सर्व सामन्यांमध्ये गुजरातच्या खेळाडूंनी आपलं पारडं जड ठेवलं होतं. हरयाणाविरुद्ध सामन्यात सचिन तवंर, महेंद्र राजपूत, प्रपंजन यांनी हरयाणाच्या दुबळ्या बचावफळीचा चांगला फायदा घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरातच्या बचावफळीनेही त्यांना चांगली साथ दिली. सचिनने चढाईत 10 गुणांची कमाई केली, तर बचावफळीत परवेश भैंसवालने 6 गुण मिळवले.

दुसरीकडे हरयाणाच्या चढाईपटूंनीही गुजरातला चांगली टक्कर दिली. मात्र बचावपटू मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावू शकले नाहीत. मोनू गोयत, विकास कंडोला यांनी मिळून चढाईत 16 गुण मिळवले. मोनू आणि विकासच्या खेळामुळे काही क्षणांसाठी सामना चांगलाच रंगतदार झाला होता, मात्र बचावपटूंनी मोक्याच्या क्षणी आपल्या खेळात सुधारणा केली नाही. गुजरातच्या चढाईपटूंवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यामुळे अखेर गुजरातने सामन्यात बाजी मारली.