सहाव्या हंगामातील हरयाणा शहरात खेळवल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने बाजी मारली आहे. पुणेरी पलटणचा ३४-२८ ने पराभव करत गुजरातने आपल्या खात्यात आणखी एका विजयाची नोंद केली आहे. चढाईपटू आणि बचावपटूंनी केलेल्या एकसंध खेळामुळे गुजरात सामन्यात विजयी ठरलं. दुसरीकडे पुणेरी पलटणच्या बचावपटूंनी आज पुरती निराशा केली, ज्याचा फटका संघाला बसला.

पुणेली पलटणकडून नितीन तोमरने चढाईत १३ गुण कमावले, मात्र दुर्दैवाने एकही चढाईपटूने त्याला साथ दिली नाही. राजेश मोंडल, संदीप नरवाल, गुरुनाथ मोरे हे सर्व खेळाडू आजच्या सामन्यात आपली छाप पाडू शकले नाहीत. बचावफळीत गिरीश एर्नाकचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंनी खराब खेळ केला, ज्यामुळे गुजरातने सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं.

दुसरीकडे गुजरातच्या संघाने आज अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. युवा सचिन तवंरने चढाईत १२ गुण कमावले, त्याला के. प्रपंजन आणि अजय कुमार यांनी उत्तम साथ दिली. याचसोबत बचावफळीतल्या प्रत्येक खेळाडूने आपल्या परीने सर्वोत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. शुक्रवारपासून प्रो-कबड्डीचे सामने पुणेरी पलटण संघाचं घरचं मैदान असलेल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवले जाणार आहेत.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : हरयाणा स्टिलर्सची दबंग दिल्लीवर मात