X

आम्ही दोघेही कल्याणचे; गिरीशला बाद करणं मला जमतं ! तेलगू टायटन्सच्या निलेश साळुंखेचा आत्मविश्वास

अटीतटीच्या लढतीत तेलगूची पुण्यावर मात

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात महाराष्ट्राचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. त्यामुळे राज्याकडून खेळत असताना आपल्या सहकाऱ्याविरुद्ध प्रो-कबड्डीत खेळण्याची वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. मुंबईच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणचा गिरीश एर्नाक आणि तेलगू टायटन्सचा निलेश साळुंखे हे समोरासमोर आले. दोघांनाही महाराष्ट्राकडून खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यात निलेश सरस ठरतो का गिरीश याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात निलेशने गिरीशवर मात केली. निलेश साळुंखेने चढाईत 6 गुणांची कमाई केली, मात्र पुण्याच्या गिरीश एर्नाकला अवघा 1 गुण कमावता आला.

अवश्य वाचा – मैदानात उतरलो की फक्त खेळाकडे लक्ष देतो – सिद्धार्थ देसाई

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश साळुंखेला याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “गिरीश आणि मी दोघेही कल्याणचे आहोत. क्लबच्या मॅचेसमध्येही आम्ही एकत्र खेळतो. बोनस हा माझा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे मी बोनस घेताना तो माझा अँकल होल्ड करेल याची मला खात्री होती. मात्र या सामन्यासाठी मी गिरीशला थोडीशी हुलकावणी दिली. बोनस पॉईंट घेत असल्याचं दाखवून मी किक मारुन त्याचा तोल बिघडवण्याचा प्रयत्न केला, आणि मला याच्यात यश मिळालं. याआधीही मी त्याला अशा पद्धतीने बाद केलं आहे.”

मंगळवारी पुण्याविरुद्धच्या सामन्यात तेलगू टायटन्सने सांगलीच्या कृष्णा मदनेला संघात स्थान दिलं. कृष्णाने डाव्या कोपऱ्यावर खेळताना 4 पकडी केल्या. त्याच्या या खेळीवर तेलगूचे प्रशिक्षक खूश झाले आहेत. आम्ही ज्या विश्वासाने कृष्णावर जबाबदारी टाकून त्याला संघात स्थान दिलं होतं, ती जबाबदारी त्याने पार पडली आहे. मी त्याच्या खेळावर समाधानी आहे, तेलगू टायटन्सच्या प्रशिक्षकांनी कृष्णाच्या खेळाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – पुण्याचा संघ नितीन तोमरवर अवलंबून; कर्णधार गिरीश एर्नाकची कबुली

  • Tags: Girish ernak, Pro Kabaddi 6, telgu-titans,