गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघाने यंदाच्या हंगामातही आपली घौडदौड कायम राखली आहे. पाटणा पायरेट्सने आजच्या सामन्यात तामिळ थलायवाजचचा 45-27 ने पराभव करत स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखलं आहे. चढाईपटूंचा आक्रमक खेळ व त्यांना बचावपटूंनी दिलेली उत्तम साथ या जोरावर पाटणाने आजच्या सामन्यात बाजी मारली.

पाटणा पायरेट्सकडून प्रदीप नरवाल, दिपक नरवाल आणि मनजीत यांनी आक्रमक चढाया रचत तामिळ थलायवाजचा बचाव मोडून काढला. प्रदीप व दिपकने सामन्यात चढाईत सुपर 10 ची कमाई केली. मनजीतने 8 गुण मिळवत त्यांना चांगली साथ दिली. तामिळ थलायवाजचा एकही बचावपटू या त्रिकुटाला रोखू शकला नाही. तामिळ थलायवाजच्या अजय ठाकूरने 8 गुणांची कमाई केली मात्र संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.