सहाव्या हंगामात आपल्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या पुणेरी पलटणने जयपूर पिंक पँथर्सचा पराभव करत विजयी श्रीगणेशा केला आहे. 29-25 च्या फरकाने सामना जिंकत पुणेरी पलटणने गुणतालिकेत पहिलं स्थान राखलं आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंचा अष्टपैलू खेळ हा पुण्याच्या विजयाचं प्रमुख कारण ठरला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : तेलगू टायटन्सचा अष्टपैलू खेळ, पाटणा पायरेट्सचा पराभव

पहिल्या सत्रापासून दोन्ही संघ सावध पवित्रा घेऊन खेळताना दिसले. महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्याच्या संघाकडून आज मोनू आणि रवी कुमार यांनी चांगला खेळ केला. मोनूने 7 गुण मिळवले तर रवी कुमारने 6 गुण मिळवत त्याला चांगली साथ दिली. एरवी नितीन तोमर, राजेश मोंडल यांच्यावर अवलंबून असणारा पुण्याचा संघ आजच्या सामन्यात वेगळ्या रणनितीने मैदानात उतरला होता, ज्याचा पुरेपूर फायदा पुण्याच्या संघाला झाला. मोक्याच्या क्षणी गिरीश एर्नाक, अक्षय जाधव आणि संदीप नरवाल यांनी काही चांगल्या पकडी करत संघाची आघाडी कायम राखली.

दुसरीकडे जयपूर पिंक पँथर्स संघाच्या कामगिरीत सातत्य दिसलं नाही. भरवशाचा नितीन रावलही आज फारशी चमक दाखवू शकला नाही, कर्णधार अनुप कुमारनेही बॅकसिटवर राहणं पसतं केलं. दिपक हुडाने चढाईमध्ये 8 गुणांची कमाई केली. बचावफळीत मोहीत छिल्लर, संदीप धुल यांनी 4-4 गुण मिळवले, मात्र मोक्याच्या क्षणी पुण्याच्या चढाईपटूंवर नियंत्रण ठेवणं त्यांना जमलं नाही. उद्या पुण्याचा सामना यू मुम्बाशी होणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम