घरच्या मैदानावर आपला दुसरा सामना खेळत असलेल्या यू मुम्बाला गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. अखेरच्या मिनीटांपर्यंत हा सामना अपेक्षेप्रमाणे चांगलाच रंगतदार झाला. अनेकदा विजयाचं पारडं हे कधी मुम्बा तर गुजरातच्या दिशेने झुकत होतं. मात्र मोक्याच्या क्षणी यू मुम्बाच्या बचावफळीने केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे गुजरातला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. गुजरातच्या महेंद्र राजपूतने एका चढाईत यू मुम्बाचे ५ गडी बाद करत एका क्षणात आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. अखेरीस ३८-३६ अशा दोन गुणांच्या फरकाने सामना जिंकत गुजरातने सामन्यात बाजी मारली.

प्रो-कबड्डीत यू मुम्बा आणि गुजरात फॉर्च्युनजाएंट या दोन सख्ख्या शेजाऱ्यांचं द्वंद्व सुपरिचीत आहे. सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत खेळ केला. यू मुम्बाने सिद्धार्थ देसाईला संघात स्थान दिल्यामुळे मैदानात उपस्थित प्रेक्षकांचाही यू मुम्बाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होता. सिद्धार्थ देसाईने ही पहिल्या सत्रात काही चांगल्या गुणांची कमाई केली. गुजरातच्या डाव्या आणि उजव्या कोपऱ्यातल्या खेळाडूच्या खालून सिद्धार्थने बोनस पॉईंटची कमाई केली. मधल्या काळात विनोद कुमारने अष्टपैलू खेळ करत यू मुम्बावर आलेलं ऑलआऊटचं संकट टाळलं. मात्र यू मुम्बाची बचावफळी भेदण्यात गुजरातचे खेळाडू यशस्वी ठरलेच.

सचिन तंवर, डाँग जिऑन ली यांनी महत्वाचे गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र पहिल्याच सत्रात बाद होऊनही यू मुम्बाने तणाव न घेता सामन्याच चांगलं पुनरागमन केलं. मध्यांतरापर्यंत गुजरातचा संघ १८-१४ अशी ४ गुणांची आघाडी कायम राखण्यात यशस्वी ठरला. चढाईपटूंच्या तुलनेत बचावपटूंचं न चालणं हे यू मुम्बाच्या पहिल्या सत्रातील पिछाडीचं मोठं कारण ठरलं.

मात्र दुसऱ्या सत्रात यू मुम्बाने सामन्याचं चित्र क्षणार्धात पालटवलं. मध्यांतरापर्यंत गुजरातकडे असणारी ४ गुणांची आघाडी यू मुम्बाने भरुन काढली. सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान, अभिषेक सिंह यांनी आक्रमक चढाई करत गुजरातच्या बचावफळीला खिंडार पाडलं. या खेळाच्या जोरावर यू मुम्बाने गुजरातला सर्वबाद करत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात यू मुम्बाने घेतलेली आघाडी भरुन काढण्यासाठी गुजरातने के. प्रपंजनला संघात स्थान दिलं. याचा गुजरातला फायदाही झालेला दिसला, मात्र बचावफळीत खेळाडूंनी केलेल्या चुकांमुळे गुजरात सामन्यात आपली पिछाडी भरुन काढू शकला नाही. मात्र सामना संपायला अवघी ४ मिनीटं शिल्लक असताना गुजरातच्या महेंद्र राजपूतने आक्रमक चढाई करत यू मुम्बाचे ५ गडी बाद केले. या आक्रमक चढाईमुळे सामन्यचं पारडं गुजरातच्या दिशेने फिरवलं.शेवटच्या एक मिनीटांमध्ये यू मुम्बाने सामन्यात दमदार पुनरागमन करत गुजरातला टक्कर दिली. मात्र गुजरातने आपली नाममात्र आघाडी कायम राखत ३८-३६ ने सामन्यात बाजी मारली.