प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वातील दुसऱ्या इंटरझोन चॅलेंज स्पर्धेला आजपासून मुंबईतल्या NSCI मैदानात सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्सने पुणेरी पलटणचं आव्हान २८-२५ ने परतवून लावलं. चढाईत राहुल चौधरी आणि निलेश साळुंखेने केलेला आक्रमक खेळ व बचावफळीत कृष्णा मदने व अबुझार मेघानीने दिलेली उत्तम साथ या जोरावर तेलगू टायटन्सने सामन्यात बाजी मारली. पुण्याच्या बचावपटूंनी आज निराश केलं नसलं तरीही नितीन तोमरच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेला पुण्याचा संघ चढाईत अगदीच फिका वाटला.

नितीन तोमरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या पुणेरी पलटण संघाची सुरुवात खराब झाली. राहुल चौधरी आणि निलेश साळुंखे या जोडीने पहिल्या काही मिनीटांमध्येच पुण्याला ऑलआऊटच्या दिशेने ढकललं. मात्र अक्षय जाधवने राहुल चौधरीची पकड करत संघाचं पहिलं ऑलआऊट लांबवलं. दुसरीकडे तेलगू टायटन्सच्या बचावफळीनेही आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत पुण्यावर दबाव वाढवायला सुरुवात केली. मात्र पहिल्या दहा मिनीटांच्या आत अक्षय जाधव-संदीप नरवाल जोडीने दोनदा सुपर टॅकल करत पुण्याचं आव्हान कायम राखलं. मात्र अक्षय जाधवची पकड करुन तेलगू टायटन्सने पुण्याला निर्णायक धक्का दिलाच. गिरीश आणि संदीप नरवालला बाद करत तेलगू टायटन्सने पुण्याला ऑलआऊट करत सामन्यात पहिल्यांदा मोठी आघाडी घेतली. तेलगू टायटन्सकडून चढाईमध्ये निलेश साळुंखे, राहुल चौधरी तर बचावफळीत कृष्णा मदनेने आश्वासक कामगिरी करत आपल्या संघाचं पारडं जड ठेवलं. या खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्सने मध्यांतरापर्यंत १७-११ अशी ६ गुणांची आघाडी कायम ठेवली.

दुसऱ्या सत्रात ३ खेळाडू शिल्लक असताना पुणेरी पलटणने अनावश्यक खेळाची गती कमी केली. याचा फायदा घेत तेलगू टायटन्सने पुण्याला सामन्यात पुन्हा एकदा ऑलआऊट केलं. बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या क्षुल्लक चुका यावेळी पुण्याला चांगल्याच भोवल्या. दुसऱ्या सत्रात दुखापतग्रस्त अक्षय जाधवला विश्रांती देत पुण्याने गुरुनाथ मोरेला संघात स्थान दिलं. मात्र गुरुनाथही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तेलगू टायटन्सच्या बचावपटूंनी आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. मधल्या काही वेळात मोनू आणि गिरीशने काही गुणांची कमाई करत पुण्याची झुंज कायम सुरु ठेवली. मात्र चढाईत पुण्याचा संघ पुन्हा गुण गमावताना दिसला. सामन्यात शेवटची ४ मिनीटं शिल्लक असताना पुण्याने गुण मिळवण्याचा सपाटा लावत आपल्या पराभवाचं अंतर ७ पेक्षा कमी गुणांचं करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. अखेरचं मिनीटं शिल्लक असेपर्यंत पुण्याने तेलगू टायटन्सला पहिल्यांदा ऑलआऊट करत आपली पिछाडी २४-२७ अशी कमी केली. दुसऱ्या सत्रात पुण्याचं वर्चस्व कायम राखण्यात मोनूने मोठा वाटा उचलला. मात्र तेलगू टायटन्सने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत २८-२५ ने सामन्यात बाजी मारली.