कोल्हापूरच्या सिद्धार्थ देसाईने दुसऱ्या सत्रात केलेल्या निर्णायक चढाईच्या जोरावर यू मुम्बाने, दबंग दिल्लीला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं आहे. महत्वाचं म्हणजे पहिल्या सत्रात सूर गमावलेल्या यू मुम्बाने दुसऱ्या सत्रात जोरदार कमबॅक केलं, सिद्धार्थ देसाईने सामन्यात चढाईमध्ये 19 गुणांची कमाई केली. 41-34 च्या फरकाने सामन्यात बाजी मारत यू मुम्बाने अ गटात पुन्हा एकदा आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे.

घरच्या मैदानावर सामने खेळणाऱ्या दबंग दिल्लीने पहिल्या सत्रात दणक्यात सुरुवात केली. नवीन कुमार आणि चंद्रन रणजीत यांनी पहिल्या सत्रात केलेल्या चढायांमुळे यू मुम्बाचा संघ दोनदा सर्वबाद झाला. बचावफळीकडून झालेल्या क्षुल्लक चुकांचा फायदा दिल्लीच्या चढाईपटूंनी घेतला. या आक्रमक खेळाच्या जोरावर दिल्लीने पहिल्या सत्रात यू मुम्बाला बॅकफूटवर ढकलत 22-13 अशी भक्कम आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रामध्ये यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने एकहाती सामन्याचं चित्र पालटवलं. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये सिद्धार्थ आणि रोहित बालियानने 1-1 गुण मिळवत दिल्लीची आघाडी कमी केली. एका क्षणानंतर दिल्लीचे 3 खेळाडू मैदानात उरलेले असताना सिद्धार्थ देसाईने एकाच चढाईत 3 जणांना बाद करत यू मुम्बाला सामन्यात बरोबरी साधून दिली. यानंतर पुढची काही मिनीटं सामना बरोबरीत सुरु होता. अखेर सिद्धार्थनेच दिल्लीच्या बचावफळीला खिंडार पाडत एका चढाईत 4 गुणांची कमाई केली. या धक्क्यातून दिल्लीचा संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. अखेर मुम्बाने 7 गुणांच्या फरकाने सामना जिंकत आपलं अव्वल स्थान पुन्हा एकदा मिळवलं.