अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत सहाव्या हंगामात मैदानात उतरलेल्या यू मुम्बाच्या खेळाडूंनी आतापर्यंत सर्वांना आश्चर्यचकीत करत आपली दखल घ्यायला भाग पाडली. मात्र घरच्या मैदानावर खेळत असताना यू मुम्बाला आज दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरयाणा स्टिलर्सने यू मुम्बावर 35-31 अशी मात केली.

पहिल्या सत्रापासून दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देऊन खेळत होते. गुजरातविरुद्धच्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही यू मुम्बाचा बचाव चांगली कामगिरी करु शकला नाही. विकास कंडोलाने हरयाणाच्या चढाईची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत 15 गुणांची कमाई केली. यू मुम्बाच्या बचावफळीतला कच्चा दुवा हेरत हरयाणाच्या खेळाडूंनी चांगल्या गुणांची कमाई केली. प्रत्युत्तरादाखल यू मुम्बाकडून सिद्धार्थ देसाई, रोहित बालियान यांनीही आक्रमक खेळ करत हरयाणाचं पारडं जड होऊन दिलं नाही. मध्यांतरापर्यंत यू मुम्बाचा संघ सामन्यात नाममात्र आघाडी घेण्यात यशस्वी ठरला होता.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीचा अष्टपैलू खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत

मात्र दुसऱ्या सत्रात हरयाणाने खेळाचं चित्रच पालटलं. विकासने एकामागोमाग एक गुण घेण्याचा सपाटा सुरुच ठेवला. त्याला मोनू गोयतनेही चांगली साथ दिली. नवीन आणि सुनील या खेळाडूंनीही अष्टपैलू खेळ करत हरयाणाला आघाडी मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. मात्र दुसरीकडे यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई एकटा लढताना दिसला. अन्य खेळाडूंची सिद्धार्थला हवीतशी साथ मिळाली नाही. मोक्याच्या क्षणी यू मुम्बाला सामन्यात बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र या संधीचा फायदा घेणं यू मुम्बाच्या बचावपटूंना जमलं नाही. अखेर 4 गुणांच्या फरकाने यजमान संघावर मात करत हरयाणाने सामन्यात विजय संपादन केला.