मुंबईच्या NSCI मैदानात झालेल्या सामन्यात इंटरझोन चॅलेंज स्पर्धेत पुणेरी पलटण संघाला तेलगू टायटन्सकडून अटीतटीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 28-25 च्या फरकाने तेलगू टायटन्सने सामन्यात बाजी मारली. नितीन तोमरच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या पुणेरी पलटण संघाने तेलगू टायटन्सविरुद्ध चढाईमध्ये निराशाजनक कामगिरी केली. अक्षय जाधवने अष्टपैलू कामगिरी करत 5 गुणांची कमाई केली. मात्र दुखापतीमुळे त्याला काहीकाळ मैदानाबाहेर जावं लागलं. दुसऱ्या सत्रात मोनूने चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुणेरी पलटणचे प्रशिक्षक आणि कर्णधार गिरीश एर्नाक यांनी नितीन तोमरची अनुपस्थितीत जाणवल्याचं मान्य केलं. पुणेरी पलटणचा संघ अ गटात सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र चढाईमध्ये आपला संघ नितीन तोमरवर अवलंबून असल्याचं दोघांनीही मान्य केलं. “होय, एका अर्थाने आम्ही नितीनवर अवलंबून आहोत. नितीनला पोटाचा विकार झालेला आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र आमचे इतर चढाईपटू त्याच्या तोडीची कामगिरी करु शकत नाहीयेत. अक्षय जाधव, गुरुनाथ मोरे चांगली कामगिरी करतायत मात्र त्यांच्या खेळात सातत्य नाहीये.” लोकसत्ता.ऑनलाईने विचारलेल्या प्रश्नावर गिरीश एर्नाकने उत्तर दिलं.

सध्या अ गटात 38 गुणांसह पुणेरी पलटणचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेत पुण्याचा पुढचा सामना 17 नोव्हेंबरला बंगाल वॉरियर्स संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यापर्यंत नितीन तोमर दुखापतीमधून सावरल्यास पुण्यासाठी ही आश्वासक बाब ठरेल. मात्र नितीनच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास पुण्याला इतर चढाईपटूंच्या फौजेसह मैदानात उतरण गरजेचं आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : अटीतटीच्या सामन्यात तेलगू टायटन्सची बाजी