X

Pro Kabaddi Season 6 Final : बंगळुरु बु्ल्सची गुजरातवर मात, पवन शेरावत चमकला

गुजरातवर ३८-३३ ने केली मात

मुंबईच्या NSCI मैदानात झालेल्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वाच्या अंतिम फेरीत बंगळुरु बुल्सने गुजरात फॉर्च्युनजाएंट संघावर मात करत विजेतेपद पटकावलं आहे. बंगळुरुने गुजरातची झुंज ३८-३३ ने मोडून काढत प्रो-कबड्डीचं पहिलं विजेतेपद मिळवलं. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यावर पवन शेरावतने दुसऱ्या सत्रात सामन्याचं चित्र पालटवलं. गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला सलग दुसऱ्या पर्वात उप-विजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरातवर अंतिम फेरीत मात केली होती.

अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघ सावध पवित्रा घेऊन खेळत होते. पहिली १५ मिनीटं दोन्ही संघांनी एकमेकांना मोठी आघाडी घेऊ दिली नाही. गुजरातकडून सचिन आणि प्रपंजन तर बंगळुरुकडून पवन शेरावतने चढाईमध्ये गुण कमावण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही संघातल्या बचावपटूंनीही आपला चांगला खेळ करत प्रतिस्पर्धी संघाला आघाडी घेऊ दिली नाही. मात्र शेवटच्या पाच मिनीटात गुजरातच्या खेळाडूंनी ही कोंडी फोडली. प्रपंजनने बंगळुरुच्या बचावफळीला खिंडार पाडत गुजरातला आघाडी मिळवून दिली. बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या काशिलींग अडकेने एका चढाईत बंगळुरुवरचं संकट टाळलं, मात्र प्रपंजनने एका चढाईत दोन खेळाडूंना बाद करत गुजरातला १५-९ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत गुजरातने सामन्यात १६-९ अशी आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

दुसऱ्या सत्रात बंगळुरु बुल्सने सामन्याचं चित्र पालटलं. सहाव्या पर्वात चढाईत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर असलेल्या पवन शेरावतने गुजरातच्या गोटात खळबळ माजवत एक-एक गुण घेण्याचा सपाटा सुरु ठेवला. पवनच्या खेळाच्या जोरावर बंगळुरुने दुसऱ्या सत्रात ९ मिनीटं शिल्लक असताना गुजरातला सर्वबाद करत सामन्यात पहिल्यांदा २३-२२ अशी एका गुणाची आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या रोहित गुलियाने पुन्हा एकदा गुजरातच्या दिशेने सामन्याचं पारडं झुकवलं. आपल्या एकाच चढाईत रोहितने ३ गुण मिळवत गुजरातला पुन्हा आघाडी मिळवून दिली. यानंतर बंगळुरुच्या बचावपटूंनी पुन्हा एकदा क्षुल्लक चुका करत संघाला पिछाडीवर ढकललं. सामना संपायला शेवटी २ मिनीटं शिल्लक असताना पवन शेरावतने पुन्हा एकदा गुण मिळवत बंगळुरुला आघाडी मिळवून दिल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला. अखेरच्या मिनीटात गुजरातचा बचाव क्षुल्लक चुका करायला लागल्यामुळे बंगळुरुचा आत्मविश्वास वाढलेला पहायला मिळाला.

शेवटच्या दीड मिनीटात पवन शेरावतने गुजरातच्या बचावफळीला आणखी खिंडार पाडलं. सामन्यात गुजरातचा संघ दुसऱ्यांदा सर्वबाद झाल्याने बंगळुरुने ३६-२९ अशी मोठी आघाडी घेतली. शेवटच्या मिनीटात प्रपंजन, सचिन तवंरने काही झटपट गुण मिळवत गुजरातकडून झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र पवन शेरावतने पुन्हा एकदा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करत बंगळुरु बुल्सची आघाडी कायम राखली. अखेरीस शेवटच्या काही सेकंदात आपली आघाडी कायम राखत बंगळुरु बुल्सने ३८-३३ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.

First Published on: January 5, 2019 9:15 pm
  • Tags: bengaluru-bulls, Gujrat Fortunegiants, Pro Kabaddi 6,