News Flash

तेलंगणमधील भीषण अपघात ’

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर शालेय बसला रेल्वेने दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थी ठार तर १५ जण जबर जखमी झाल्याची भीषण घटना गुरुवारी सकाळी तेलंगणमधील मेडक जिल्ह्य़ात घडली.

| July 25, 2014 04:33 am

मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर शालेय बसला रेल्वेने दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थी ठार तर १५ जण जबर जखमी झाल्याची भीषण घटना गुरुवारी सकाळी तेलंगणमधील मेडक जिल्ह्य़ात घडली. शालेय बसला रेल्वेने दिलेली धडक एवढी जबरदस्त होती की, बस कित्येक फूट फरफटत गेली.
नांदेड-हैदराबाद पॅसेंजर गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास मेडक जिल्ह्य़ातील कामारेड्डी या स्थानकावर आली. गाडीला आधीच उशीर झाला असल्याने रेल्वेचालकाने कामारेड्डी स्थानक सोडताच गाडीचा वेग वाढवला. गाडी भर वेगात असतानाच मसाईपेट या गावानजीकच्या रेल्वे क्रॉसिंगवर आली. त्याचवेळी एक शालेय बस रेल्वेमार्ग ओलांडत होती. तुफान वेगात असलेल्या रेल्वेने शालेय बसला उडवले. त्यात २५ विद्यार्थी जागीच ठार झाले तर १५ जण जबर जखमी झाले.
जखमी विद्यार्थ्यांना हैदराबादेतील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मात्र, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. शालेय बस तुपराण या गावातील काकतीय टेक्नो स्कूलची होती. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४० ते ५० विद्यार्थी होते. सर्व विद्यार्थी कामारेड्डी इस्लामपूर व झाकीरपल्ली या गावातील आहेत.
दरम्यान, या बसचा चालक हा बदली चालक होता आणि त्याने केवळ ‘शॉर्टकट’चाच केलेला वापर या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात रेल्वेची रक्षकसहित लेव्हल क्रॉसिंग असताना चालकाने त्यांचा वापर टाळून केवळ वेळ वाचविण्यासाठीच मनुष्यविरहित लेव्हल क्रॉसिंगचा केलेला वापर २५ जणांचे बळी घेण्यास कारणीभूत ठरला. चालकाचे हे दु:स्साहस त्याच्याही जीवावर बेतले आहे.
आरोप-प्रत्यारोप
अपघातानंतर लगेचच आरोपप्रत्यारोप झाले. रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा कर्मचारी नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
 तर रेल्वे क्रॉसिंगवर सुरक्षा कर्मचारी नसल्यास रेल्वेमार्ग ओलांडताना रेल्वेगाडी येत नसल्याची खात्री करून घेतल्यानंतरच रेल्वेमार्ग ओलांडला जाणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करत रेल्वे प्रशासनाने आरोप फेटाळून लावला. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले. मात्र त्याकडे रेल्वेने दुर्लक्ष केले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
मदतीची घोषणा
रेल्वेगाडी-शालेय बस अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतनिधी देण्याची घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल, असेही त्यांनी सांगितले.
‘रेल्वेचीच अक्षम्य दिरंगाई’..
वार्ताहर, नांदेड : क्रॉसिंगवर स्कूल बसला धडक देणारी नांदेड-हैदराबाद ही पॅसेंजर गाडी नियोजित वेळेनंतर तब्बल चार तास उशिराने येथील स्थानकातून सुटली होती. ही गाडी वेळेत सोडली असती तर हा अपघात झाला नसता. मात्र, लांब पल्ल्याची ही गाडी गेल्या काही दिवसांपासूनच कोणतेही संयुक्तिक कारण न देता उशिरानेच सोडली जात आहे. त्याचा हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नांदेड-हैदराबाद प्रवासी गाडी बुधवारी रात्री नियोजित वेळेत म्हणजे ११ वाजून ३० मिनिटांनी नांदेडहून सुटायला हवी होती.  ही रेल्वे बुधवारी रात्री तब्बल चार तास उशिरा सोडण्यात आली.  रेल्वेचा हा अक्षम्य हलगर्जीपणा निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवितावर घाला घालणारा ठरला. नांदेडचे व्यापारी गोविंद क्षीरसागर यांनी सांगितले की, ९ वाजून २० मिनिटांनी शाळेची बस रस्त्याने जाताना दिसली. पण ती आमच्याच रेल्वेच्या ट्रॅकवरून जाणार आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, क्षणात होत्याचे नव्हते झाले. आमची रेल्वे स्कूल बसला धडकली.

“तेलंगणमध्ये शालेय बसला रेल्वेगाडीची धडक बसून झालेला अपघात ही दुर्दैवी घटना आहे. या अपघाताबाबत सविस्तर माहिती शुक्रवारी देण्यात येईल.”
सदानंद गौडा, रेल्वेमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2014 4:33 am

Web Title: %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a1 %e0%a4%b9%e0%a5%88%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a6 %e0%a4%aa%e0%a5%85%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%9a
Next Stories
1 बांधकामांचा मलिदा
2 लोणावळ्याच्या पर्यटनात बेशिस्त अन् उन्मादाचे बळी!
3 एक दिवसाआड पाण्याचा निर्णय रद्द
Just Now!
X