पुणे : करोनामुळे सॅनिटायझरला मागणी वाढलेली असताना शहरात बनावट सॅनिटायझर तयार क रून त्याची सामान्यांना विक्री करण्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेने बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या उत्पादकाच्या कारखान्यावर छापा टाकून २७ लाखांचे बनावट सॅनिटायझर जप्त केले. या कारवाईत सहाजणांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी कुणाल उर्फ सोनू शांतिलाल जैन (वय ३३,रा. पाश्र्वनगर सोसायटी, कोंढवा), चेतन माधव भोई (वय २६, सध्या रा.गंगाधाम, मार्केटयार्ड, मूळ रा. फैजपूर, जि. जळगाव), इरफान इक्बाल शेख (वय ३२, रा.सुरमा रेसिडन्सी, युनिटी पार्कमागे, कोंढवा), असीम अरिफ मणियार (वय २७, रा. युनिटी टॉवर, कोंढवा), स्वप्नील शिवाजी शिंदे (वय ३१, रा. निंबाळकर तालीमीजवळ, सदाशिव पेठ), महेश रामचंद्र टेंबेकर (वय ३१, रा. कमला हेरीटेज, पुणे-सातारा रस्ता) यांना अटक करण्यात आली. मार्केटयार्ड भागात एकजण बनावट सॅनिटायझर भरलेल्या बाटल्या घेऊन येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना खबऱ्याने दिली. त्यानंतर उपायुक्त बच्चन सिंह यांनी त्वति दोन पथके तयार करून तेथे सापळा लावण्याच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी जैन आणि भोई यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या सॅनिटायझर बाटल्यांची पाहणी करण्यात आली. तेव्हा बाटलीवर सॅव्हिअर हँड सॅनिटायझर असे लिहिल्याचे आढळून आले. तपासात जैन, भोई, मणियार, शेख बनावट सॅनिटायझरची विक्री करत असल्याचे उघडकीस आले. सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे

शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहाय्यक निरीक्षक संतोष तासगावकर, सोमनाथ शेंडगे, दत्ता काटम, प्रवीण शिंदे, भरत रणसिंग, अमजद पठाण, सचिन घोलप, महेश वाघमारे, अंकुश जोगदंडे, संजय दळवी, स्नेहल जाधव यांनी ही कारवाई केली.

कर्वेनगर भागात छापा

  •  या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी स्वप्नील शिंदे याच्या मालकीची कर्वेनगर भागातील नवसह्य़ाद्री सोसायटीत जागा आहे.
  •  या जागेत बनावट सॅनिटायरझचे उत्पादन करण्यात येत होते. तेथून २७ लाखांच्या सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • या बाटल्यांवर मेड इन नेपाळ आणि मेड इन तैवान असे लिहिण्यात आल्याचे आढळून आले. शिंदे आणि त्याचा साथीदार टेंबेकर यांनी भागीदारीत बनावट सॅनिटायझरचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी पुणे शहर तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागांत बनावट सॅनिटायझरची विक्री केल्याचा संशय आहे.